मुंबई, : (Keshav Upadhye on Rahul Gandhi) गेल्या १२ वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वारंवार पराभवाला सामोरे गेलेले राहुल गांधी आता ‘दिमागी नक्षलवादाचा’ चेहरा बनून देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. काल त्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयावर काढलेला मोर्चा हा त्याचाच प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘दिमागी नक्षल’ हा शब्दप्रयोग वापरला होता. त्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे राहुल गांधी, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "नक्षलवाद्यांची कार्यपद्धती, त्यांची मार्गदर्शन पुस्तिका किंवा नक्षल चळवळीत काम करणाऱ्यांची धोरणे पाहिली तर त्याला ‘नक्षली शिकवण’ असे म्हटले जाते. आंदोलनाचा उद्देश जनतेचे प्रश्न सोडवणे नसून राज्यसंस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करणे हा त्याचा पहिला नियम आहे. कालचा मोर्चा आणि गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, ते पाहता हे लक्षात येते."(Keshav Upadhye on Rahul Gandhi)
हा बेजबाबदारपणा कळस
"एसआयआरवर बिनबुडाचे आरोप करताना त्यासाठी काही पुरावे द्यावे लागतात, याचे साधे भानही राहुल गांधींना नाही. त्यांनी काल सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आणि याचिका दाखल केली. मात्र, ती याचिकाही अपुरी होती आणि त्यासोबत पुरेशी कागदपत्रे जोडलेली नव्हती. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी राष्ट्रपतींनी त्यांची मागणी मान्य केल्याचे तसेच त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आल्याचे निखालस खोटे सांगितले. राष्ट्रपतींसारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीच्या नावाने खोटे बोलणे आणि केवळ खोटे बोलणेच नव्हे, तर पुरावे सादर करण्यास सांगितले असतानाही ते पुरावे दिले का, असे विचारल्यावर ‘आम्ही नंतर देऊ’, असे म्हणणे, हा बेजबाबदारपणा कळस आहे," असेही ते म्हणाले.(Keshav Upadhye on Rahul Gandhi)
काँग्रेसला संसद मान्य नाही
ते पुढे म्हणाले की, "विद्यमान व्यवस्था आणि सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण करायचा आणि त्या निमित्ताने लोकशाहीबद्दलच लोकांचे मत प्रदूषित करण्याचा प्रयत्न करायचा. हा या नक्षल शिकवणीचा दुसरा नियम आहे आणि राहुल गांधी तेच करत आहेत. भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांना समर्थन देणाऱ्या संघटना राहुल गांधींसोबत होत्या. तेव्हापासून एकप्रकारे या कार्यपद्धतीच्या दिशेने राहुल गांधींची वाटचाल सुरू झाली आहे. संसद आणि शासन हे जनविरोधी असल्याचे चित्र निर्माण करणे ही तिसरी नक्षल शिकवण आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसची भूमिका आणि टीका पाहिली, तर त्यांना संसद मान्य नाही, असे दिसते. संसदेत ते चर्चा होऊ देत नाहीत किंवा चर्चेसाठी तयार नसतात. यापूर्वी पोलिसांवर झालेले हल्ले आणि धक्काबुक्कीही आपण सर्वांनी पाहिली आहे. सरकारच्या विविध घटनात्मक संस्थांवर हल्ले करायचे, त्यांना अपमानित करायचे आणि सरकारविरुद्ध अविश्वास व असंतोष निर्माण होईल, अशी परिस्थिती तयार करायची. राहुल गांधी नेमके तेच करू पाहत आहे."(Keshav Upadhye on Rahul Gandhi)
"चौथा नियम म्हणजे सामाजिक फूट निर्माण करणे. समाजात आधीच असलेली फूट आणखी वाढवून, सर्व बाजूंनी असंतोषाचा आगडोंब निर्माण करायचा. समाजातील विविध घटकांमध्ये आणखी असंतोष निर्माण करून, वर्षानुवर्षे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे आपली सत्तेची पोळी भाजली जात नाही, असा विचार करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करायचा. जगातील अनेक देशांमध्ये अशाच पद्धतीने उठाव घडवून आणले गेले आहेत."
"राहुल गांधींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी देशविरोधी शक्तींच्या बाजूने बोलतात. देशविरोधी भूमिकांशी सूर मिसळतात," याची चार उदाहरणे उपाध्ये यांनी दिली. डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने उभे होते, त्याचवेळी राहुल गांधी चिनी दूतावासात जाऊन चर्चा करत होते. हे कोणते देशप्रेम? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, त्यावेळी राहुल गांधींनी पाकिस्तानला अनुकूल अशी वक्तव्ये केली आणि भूमिका घेतल्या. हे कोणते भारतप्रेम, जे नेहमी भारतविरोधी भूमिकांशी सूर मिसळते? अलीकडेच एलॉन मस्क यांनी भारतविरोधात भूमिका मांडली आणि त्यासंदर्भात केलेल्या ट्वीटला समर्थन देणारे किंवा त्याला एकप्रकारे पुष्टी देणारे ट्वीट राहुल गांधींनी केले. मस्क भारताच्या धोरणांविरोधात बोलत होते. याच मस्कला काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनेही विरोध केला होता. मात्र, असे असतानाही केवळ देशाच्या विरोधात ट्वीट केले म्हणून राहुल गांधींनी त्यांच्या सुरात सूर मिसळणे, हे संतापजनक आहे," असेही ते म्हणाले.(Keshav Upadhye on Rahul Gandhi)
राहुल गांधींचे दुहेरी धोरण
"एकीकडे देशात असंतोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे, वाटेल ते खोटे बेमालूमपणे बोलायचे आणि नक्षली शिकवणीची शंभर टक्के अंमलबजावणी करायची, तर दुसरीकडे देशविरोधी शक्तींपैकी जे कोणी आवाज उठवतात किंवा बोलतात, त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सुरात सूर मिसळायचा हे राहुल गांधींचे दुहेरी, दुटप्पी आणि ढोंगी धोरण आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.(Keshav Upadhye on Rahul Gandhi)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....