कसारा ब्लॉकचा लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांना फटका; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

    14-Oct-2026
 
 
Kasara Rail Block October 2026
 
ठाणे (Kasara Rail Block October 2026): आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मध्य रेल्वेने कसारा येथे १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकबाबत अद्यावत माहिती देताना १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान उपनगरीय लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे..आसनगाव-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, काही लोकल आसनगाव स्थानकापर्यंतच धावतील. तसेच दोन दुरंतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. (Kasara Rail Block October 2026)
 
आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद
 
१४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते सायंकाळी ७.३५, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ६ आणि दुपारी ३.३५ ते सायंकाळी ७.३५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव-कसारा दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
 
सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या दुपारी १.१०, २.१७, २.४६ आणि ४.५० वाजताच्या लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येतील. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या दुपारी ३.३५, ४.१६, ५.०२ आणि ६.१७ वाजताच्या लोकल आसनगावहून अनुक्रमे ४.१२, ४.५४, ५.३९ आणि ६.५४ वाजता सुटतील.
 
ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल सायंकाळी ६.२८ वाजता, तर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल रात्री ८.१५ वाजता सुटणार आहे. (Kasara Rail Block October 2026)
 
दुरंतो एक्स्प्रेस रद्द; अनेक गाड्यांना विलंब
 
ब्लॉकमुळे १३ ऑक्टोबरला प्रवास सुरू करणारी हावडा-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेस (१२२६२) आणि १४ ऑक्टोबरला सुटणारी सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्स्प्रेस (१२२६१) रद्द करण्यात आली आहे. मात्र, १५ ऑक्टोबरची सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्स्प्रेस नियोजित सायंकाळी ५.१५ ऐवजी १६ ऑक्टोबरला मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल.
 
१४ ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी गोरखपूर, सीतापूर आणि धनबाद एक्स्प्रेस अनुक्रमे १ तास १५ मिनिटे, १ तास १० मिनिटे आणि १ तास १० मिनिटे उशिराने सुटणार आहेत. १५ ऑक्टोबरलाही गोरखपूर, राणी कमलापती आणि छपरा एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
 
कामायनी आणि राजगीर एक्स्प्रेस तसेच सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. राजधानी एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑक्टोबरला सायंकाळी ४ ऐवजी ५.१५ वाजता सुटेल. (Kasara Rail Block October 2026)
 
काही गाड्यांचे मार्ग वळवले
 
सीएसएमटी-गोरखपूर अंत्योदय, दादर-बलिया, सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ, दादर-गोरखपूर आणि सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या नियोजित तारखांना कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड मार्गे वळवण्यात येणार आहेत.
याशिवाय पुष्पक, गीतांजली, तुलसी, अमृत भारत यांसह अनेक गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. काही गाड्या इगतपुरी, भुसावळ, खर्डी आणि आटगाव येथे थांबवण्यात येतील. तर पंचवटी, तपोवन, वंदे भारत, विदर्भ, पंजाब मेल आणि अन्य गाड्यांना १५ ते २५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. (Kasara Rail Block October 2026)
 
प्रवाशांनी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन
 
आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम हे कसारा-कल्याणदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्पाचा भाग आहे. या कामामुळे भविष्यात मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून, मार्गाची क्षमता वाढवता येईल. १७ आणि १८ ऑक्टोबरच्या ब्लॉकची माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. (Kasara Rail Block October 2026)
 
 




संबंधित मजकूर