मुंबई, : (Flex-Free Mumbai Campaign) मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्समुळे होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ अभियानाला सुरुवात झाली आहे. केवळ आवाहन न करता स्वतः कृतीतून आदर्श घालून देत महापौर रितू तावडे यांनी बुधवार, दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या नगरसेवक प्रभागात रस्त्यावर उतरून अनधिकृत जाहिरात फलक हटवले. ‘शाडू बाप्पा दहा दिवस', 'फ्लेक्स मुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहराला अनधिकृत फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.(Flex-Free Mumbai Campaign)
घाटकोपर पूर्वेतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागांतर्गत येणाऱ्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स महापौरांनी स्वतः हटविले. तसेच, भविष्यात पुन्हा अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी अनुज्ञापन, परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांसह संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(Flex-Free Mumbai Campaign)
मुंबईचे सौंदर्य आणि पर्यावरण जपण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता अनधिकृत फलकांविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी प्रशासनाला पत्र पाठवून ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, यासाठी महापौरांकडून विविध पक्षांच्या प्रमुखांना आणि नेत्यांना पत्र पाठविण्यात येत आहे.(Flex-Free Mumbai Campaign)
या धोरणांतर्गत अधिकृत जाहिरात फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना आणि एजन्सींना काळ्या यादीत टाकणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे जास्तीत जास्त ७२ तासांत निवारण करणे, अशा उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.
या मोहिमेचा संदेश देताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन आपण पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला. त्याचप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवणे, हे प्रत्येक नागरिकाचे आणि लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.” मुंबईचे सौंदर्य आणि शिस्त टिकवण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी आपापल्या परिसरात पुढाकार घ्यावा, तसेच या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही महापौरांनी केले.(Flex-Free Mumbai Campaign)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.