ठाण्यातील जांभूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

    14-Oct-2026   
 

Dr Babasaheb Ambedkar Memorial Jambhul
 
मुंबई, :(Dr Babasaheb Ambedkar Memorial Jambhul) ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर त्यांचे स्मारक विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
 
जांभूळ येथील संबंधित सुमारे ५० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे येथील डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. त्याअनुषंगाने विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे व विशेष सहाय्य विभाग सचिव हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव प्र. बा. मिसाळ, समाज कल्याण (मुंबई विभाग) प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, कल्याण उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह अन्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Dr Babasaheb Ambedkar Memorial Jambhul)
 
सध्या ही जमीन महिला व बालविकास विभागाच्या ताब्यात असून, तिचा स्मारकासाठी उपयोग करण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अण्णा बनसोडे यांनी दिले. ते म्हणाले की, "जांभूळ येथील या जमिनीचा प्रश्न प्रशासकीय समन्वयातून मार्गी लागल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने प्रथम जमीन मागणीचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे सादर करावा आणि त्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी."(Dr Babasaheb Ambedkar Memorial Jambhul)
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर