दिव्यात मध्यरात्री अग्नितांडव! २३ वाहने जळून खाक

साबेगावात रस्त्यालगत पार्क केलेल्या रिक्षा-दुचाकींना आग; परिसरात खळबळ, सुदैवाने जीवितहानी नाही

    14-Oct-2026
 

Diva Fire 
 
ठाणे,: (Diva Fire) दिव्यात मध्यरात्री आगीच्या भीषण घटनेने एकच खळबळ उडाली. साबेगाव परिसरात रस्त्यालगत पार्क केलेली एक ऑटोरिक्षा आणि तब्बल २२ दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता इतकी होती की, सर्व २३ वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
 
मंगळवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे २.०२ वाजण्याच्या सुमारास आदर्श विद्यालयासमोर, दिवा नॅशनल इंग्लिश स्कूलच्या हॉलमागे असलेल्या साबेगाव परिसरात वाहनांना आग लागल्याची वर्दी मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने फायर आणि रेस्क्यू वाहनांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.(Diva Fire)
 
अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर पहाटे ३.१६ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत रस्त्यालगत उभी असलेली वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.(Diva Fire)
 
आग लागली कशी? घातपाताचा संशय..
 
एकाच वेळी इतक्या वाहनांना आग लागल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, वाहनांना आग अपघाताने लागली की अन्य काही कारणामुळे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगीचे नेमके कारण तपासानंतरच समोर येणार आहे. घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली कीघातपाताची शक्यता आहे, या दोन्ही बाजूंनी तपास सुरू आहे. अद्याप आगीचे निश्चित कारण समोर आलेले नाही.(Diva Fire)
 
दरम्यान, दिवा परिसरातील अनेक इमारतींमध्ये पुरेशा पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने नागरिकांना आपली वाहने रस्त्यालगत उभी करावी लागतात. या घटनेमुळे दिव्यातील पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Diva Fire)
 
 
 




संबंधित मजकूर