दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने निवडणूक लढवावी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे स्वप्न

    14-Oct-2026   

 Chandrashekhar Bawankule 
नागपूर : विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळात पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचाराच्या कामाला लागतील. मात्र, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीत अनावश्यक बडेजाव टाळून साधेपणाने प्रचार केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे आवाहन महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "निवडणुकीत भाजपच्या मतदारांनी पूर्ण ताकदीने उतरावे आणि पक्ष संघटनेने एकजुटीने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपचे सहसंघटनमंत्री सतीश धोंड हे नागपूर मुख्यालयात राहून संघटनात्मक कामकाज पाहणार आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.
 
"नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून अनिल सोले यांनी माघार घेण्याच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, "पक्षहितासाठी आणि संघटनेच्या दृष्टीने अनिल सोले यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. अनिल सोले आणि गिरीश व्यास यांनी मांडलेल्या सूचना व भूमिका पक्षाने ऐकून घेतल्या आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची भूमिका पक्षाच्या हिताची आहे. अनिल सोले हे निवडणुकीचा अनुभव असलेले नेते असून, त्यांनी मागील निवडणुकीतही चांगले काम केले आहे. ते आता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी सक्रिय होतील. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा विजय निश्चित आहे. गेल्या ५७ वर्षांपासून भाजपकडे असलेली ही जागा पुन्हा भाजप आणि महायुतीकडेच राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)
 
राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे स्वप्न
 
राहुल गांधी यांच्या आंदोलनावर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "संविधानाने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेकडे निवेदन देण्याच्या कृतीमागे प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न दिसतो. देशात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आपण पंतप्रधान होऊ, अशा स्वरुपात ते वावरत आहेत. राहुल गांधी संविधानाचा अपमान करत आहेत." (Chandrashekhar Bawankule)
 
कंत्राटदारांच्या थकीत देयकांवर मंत्रिमंडळात चर्चा
 
"राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर असून कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचे पैसे वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यांना तातडीने दिलासा कसा देता येईल आणि प्रलंबित देयके कशी अदा करता येतील, यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल," असेही त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
 
वसुलीचा तगादा खपवून घेणार नाही
 
शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींबाबत बोलताना बावनकुळे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. बँकांकडून बेकायदेशीर पद्धतीने वसुली केली जात असल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल. अवैध सावकारीविरोधातही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांकडून शेतकऱ्यांवर पैशांसाठी अनावश्यक दबाव आणला जाऊ नये. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देश पुन्हा दिले जातील. बँका, मायक्रोफायनान्स कंपन्या किंवा वित्तीय संस्थांकडून शेतकऱ्यांचा छळ सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Chandrashekhar Bawankule)
 
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी
 
"शेतकऱ्यांना प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे. काही शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर झाले असले, तरी केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांना कर्जाचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे," असेही त्यांनी सांगितले. तसेच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ आवश्यक नसलेल्या सक्षम नागरिकांनी स्वेच्छेने या यादीतून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागपूरमध्ये सुमारे ६० हजार नागरिकांनी अन्नसुरक्षा यादीतून आपली नावे वगळली आहेत. राज्यातही अशा प्रकारे मोठ्या संख्येने नावे वगळली गेल्यास गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचण्यास मदत होईल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर