अंगणवाडी सेविका-मदतनीसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजारांची भाऊबीज भेट!

२.१४ लाख कर्मचाऱ्यांसाठी ४२.८१ कोटींचा निधी; आदिती तटकरे यांची घोषणा

 
Anganwadi Workers Diwali Gift

 
मुंबई, :(Anganwadi Workers Diwali Gift) राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील २ लाख १४ हजार ९७ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असून, त्यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.(Anganwadi Workers Diwali Gift)
 
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या राज्यातील महिला व बालकल्याण व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांना पोषणविषयक सेवा पुरविणे, बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ग्रामीण तसेच शहरी भागांत आरोग्य, पोषण आणि बालविकासाशी संबंधित सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात. या कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.(Anganwadi Workers Diwali Gift)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक स्वरूपात मदत उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
 
राज्यात सध्या १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. या दोन्ही घटकांतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार एकूण २ लाख १४ हजार ९७ कर्मचाऱ्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि बालकांच्या पोषणापासून ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी हा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक ठरणार आहे.(Anganwadi Workers Diwali Gift)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर