ठाणे,: (Amazon Data Center in Thane) बाळकूम-माजिवडा परिसरातील ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर, वीज व्यवस्थेवर आणि पर्यावरणावर नेमका किती परिणाम होऊ शकतो, याची आता शास्त्रीय पद्धतीने तपासणी होणार आहे. राज्यातील डेटा सेंटर प्रकल्पांच्या परिणामांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या मूलभूत सुविधांवर या प्रकल्पाचा किती भार पडणार, याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला होता.(Amazon Data Center in Thane)
४२२ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाची तपासणी
बाळकूम-माजिवडा परिसरातील प्रस्तावित डेटा सेंटरची क्षमता ४२२ मेगावॉट असल्याचे आमदार डावखरे यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. या प्रकल्पासाठी १९३ मोठ्या डिझेल जनरेटरचा प्रस्ताव असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. प्रकल्पाच्या पाणीवापराबाबत १२ एमएलडी आणि १२५ केएलडी असे वेगवेगळे आकडे समोर आल्याने प्रत्यक्षात किती पाणी लागणार, याची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली होती.(Amazon Data Center in Thane)
डेटा सेंटरला अखंड वीजपुरवठा आणि सर्व्हर थंड ठेवण्यासाठी शीतकरण व्यवस्था आवश्यक असते. त्यामुळे या प्रकल्पामुळे ठाण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर आणि वीज वितरणावर अतिरिक्त ताण पडणार का, तसेच डिझेल जनरेटरमधून होणारे उत्सर्जन, ध्वनी प्रदूषण आणि उष्णतेचा स्थानिक परिसरावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
पाणी, वीज आणि प्रदूषणावर लक्ष
तज्ज्ञ समिती राज्यातील डेटा सेंटर प्रकल्पांचा पाणी, ऊर्जा, हवा, ध्वनी आणि स्थानिक पर्यावरणावर होणारा परिणाम तपासणार आहे. पाण्याचा पुनर्वापर, पर्यायी शीतकरण तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक डेटा सेंटरसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांबाबतही शिफारशी केल्या जाणार आहेत.(Amazon Data Center in Thane)
याशिवाय जमीन वापर, पावसाळी पाण्याचा निचरा, वाहतूक, अग्निसुरक्षा आणि स्थानिक पायाभूत सुविधांवरील संभाव्य परिणामांचाही विचार केला जाणार आहे. विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून डेटा सेंटर प्रकल्पांसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याबाबत समिती सूचना करणार आहे.
तीन महिन्यांत अहवाल
२०२६ च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान डेटा सेंटर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या पाणी, वीज, जमीन आणि अन्य पायाभूत सुविधांचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार समिती गठित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.(Amazon Data Center in Thane)
समितीमध्ये ऊर्जा, जलसंपदा, उद्योग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपाध्यक्ष प्रसाद कल्याणरामन यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.
शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत समितीला अंतिम अहवाल सादर करायचा आहे. या अहवालातून डेटा सेंटर प्रकल्पांचे संभाव्य परिणाम आणित्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत शिफारशी अपेक्षित आहेत.(Amazon Data Center in Thane)
ठाणेकरांचे लक्ष अहवालाकडे
डेटा सेंटरमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढू शकतात. मात्र, त्याचवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यावर, वीज व्यवस्थेवर आणि पर्यावरणावर अतिरिक्त भार पडणार नाही, याची खात्री होणेही आवश्यक आहे. त्यामुळे बाळकूम-माजिवडा प्रकल्पाच्या पाणीवापराचे प्रत्यक्ष आकडे, वीजेची गरज आणि प्रदूषणावरील नियंत्रणाचे उपाय अहवालातून स्पष्ट होतात का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षांनंतरच प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या अभ्यासातून स्थानिक नागरिकांच्या चिंतांना कितपत उत्तरे मिळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.(Amazon Data Center in Thane)