मुंबई (Pune Mahalaxmi Temple) : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील सारसबागेजवळ असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात सोमवारी सकाळी श्रीसूक्त आणि श्रीगणपती अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात शेकडो भाविक सहभागी झाले होते. शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पवित्र मंत्रांचे पठण आणि देवी महालक्ष्मीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तिभाव, आध्यात्मिक जागृती आणि सामूहिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थितांना श्रीसूक्ताचे महत्त्व आणि त्याचा धार्मिक संदर्भ सांगण्यात आला. त्यानंतर ओंकार, श्री गणपती अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्रीसूक्ताचे तीन पाठ सामूहिकरित्या करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला डॉ. सतीश देसाई, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्यासह विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते. संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान सहभागी भाविकांना श्रीसूक्ताची माहिती आणि त्याचे धार्मिक महत्त्वही समजावून सांगण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी ‘जय माता दी’चा जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केले.(Pune Mahalaxmi Temple)
विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सामूहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्रीशक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात श्री महालक्ष्मी देवीची आराधना, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. श्रीसूक्त हे ऋग्वेदातील महालक्ष्मी देवीच्या स्तुतीसाठी समर्पित वैदिक स्तोत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. सुख, समृद्धी, शांती आणि कल्याणासाठी देवीची उपासना केली जाते. सामूहिक पठणातून भक्ती आणि सकारात्मक वातावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Pune Mahalaxmi Temple)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक