सांख्यिकी, भौतिकशास्त्र आणि गणित विषयात बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील आयटी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मात्र, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, ही हुरहुर कायम मनात होती. अखेर आवडीचा नव्याने शोध घेत आयटी क्षेत्राला रामराम करून निसर्गाला वाहून घेतलेल्या नागपूरच्या प्राची माहुरकर या निसर्गकन्येची ही प्रेरणादायी कहाणी...
प्राची माहुरकर यांचा जन्म नागपूरचा. बुटीबोरीजवळ वडीलांचे शेत. आई-वडील अत्यंत धाडसी. वडील अक्षरश: साप खिशात घेऊन फिरायचे. दुर्दैवाने, प्राचीताई लहान असतानाच वडीलांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आईने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आणि हिमतीने नोकरी सांभाळत मुलांना वाढवले. पुढे लग्नानंतर प्राचीताई पुण्यात स्थायिक झाल्या.
त्यावेळी आयटी क्षेत्राची प्रचंड भुरळ. त्यामुळे त्यांनीसुद्धा एका खासगी कंपनीत नोकरी सुरु केली. मात्र, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, असा विचार वारंवार त्यांच्या मनात यायचा. वयाच्या पस्तीशीत निसर्ग आणि शेती याकडे आपला कल आणि आवड असल्याचे त्यांना जाणवले. पुढे त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास आणि निसर्ग संवर्धन या विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. पुण्यातील इकॉलॉजिकल सोसायटींसोबत काही काळ काम केले आणि नंतर नागपूरला परत येण्याचा निर्णय घेतला. पुढे नोकरी सोडून नागपूर जिल्ह्यातील काटोलजवळ असंख्य पर्यावरणीय आव्हाने असलेली ८ एकर शेती खरेदी करून ती नैसर्गिकरित्या कसली.
यासोबतच 'पुनर्नवा इकोलॉजिकल सर्व्हिसेस अँड इको-डिझाइन सोल्युशन्स' या आपल्या सल्लागार संस्थेमार्फत खाजगी किंवा सार्वजनिक जमिनींचे पर्यावरणीय विकास आणि पुनरुज्जीवन करण्याचे कार्य त्या करतात. ही संस्था विविध अधिवास आणि निसर्ग-मार्गिकांच्या पुनरुज्जीवनासाठी सल्ला देते. तसेच जमिनीवरील वनस्पती व प्राणी विविधता वाढवण्यास मदत करते. शिवाय, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींसाठीही ही संस्था मार्गदर्शन करते.
नागपूर येथे इकॉलॉजिकल कन्सलटन्ली सुरु करून त्यातून त्या पर्यावरणविषयक सेवा देतात. याअंतर्गत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 'सोमनाथ' प्रकल्पांतर्गत २००० एकर जमिनीसाठी मास्टर प्लॅन आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवन आराखडा तयार केला. तसेच उमरेड भागात १००० हेक्टर जमिनीवर पाणलोट क्षेत्र विकासाचे काम पूर्ण केले.
प्राचीताईंनी नागपूर महापालिकेसाठी वृक्षगणनेचा एक प्रकल्प हाती घेतला. यातून नागपूरची संपूर्ण जैवविविधता त्यांनी मांडली आणि त्याआधारे कुठल्या उपयोगितेसाठी कुठली झाडे लावावी? याबाबतएक पुस्तिका तयार केली. चुकीच्या वृक्षारोपणामुळे होणारी निसर्गाची हानी रोखणे हा यामागील उद्देश. याव्यतिरिक्त रानभाज्यांविषयीचे एक सचित्र पुस्तकही लिहिले.
त्यांनी दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी रोपवाटिका विकसित केली. पर्यावरणपूरक स्वच्छता पद्धतींवर अभ्यास आणि संशोधन, वृक्ष ओळखण्यासाठी 'ट्री वॉक्स', नदीच्या परिसंस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'रिव्हर वॉक्स', अनेक संस्था किंवा शाळांच्या माध्यमातून विविध वयोगटांसाठी पक्षी निरीक्षणाचे सत्र आयोजित करण्यासोबतच शाश्वत शेतीचा अवलंब आणि प्रसार त्यांच्यामार्फत सातत्याने सुरु आहे.
नागपूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. नागपुरातील मंडळी सीमेंट रस्त्यामुळे झाडे गुदमरत आहेत म्हणत होती, तरीही म. न. पा. त्याकडे दुर्लक्ष करत आहे हे दिसल्यावर प्राचीताईंसोबत इतर तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशान्वये एक समिती स्थापन झाली ज्यात प्राचीताईंचाही समावेश होता. पुढे त्यांनी आपल्या कामातून नागपूरातील ९ हजार झाडे सिमेंटमुक्त केले. पर्यावरणविषयक आंदोलन, मोर्चे, जनजागृती यासोबतच पर्यावरणाच्या विविध लढ्यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. मात्र, हे सगळे सुरु असताना प्राचीताईंनी आपली शिक्षणाची भूक कायम ठेवली. तीन वर्षांपूर्वीच पर्यावरणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. शिवाय पर्यावरणाशी संबंधित विविध कोर्सेसही पूर्ण केलेत.
सासरच्या मंडळींनी कधी शेती जवळून पाहिलीही नव्हती. त्यामुळे प्राचीताईंच्या शेती करण्याच्या निर्णयाबाबत सुरुवातीला त्यांच्या मनात काहीशी साशंकता होती. मात्र, आपल्या मेहनतीने त्यांनी शेती उभी केली आणि त्यांच्या कामातून मिळालेल्या यशाने हीच साशंकता आता अभिमानात बदलली आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना भक्कम साथ दिली. मात्र, 'या प्रवासात अजूनही माझ्याकडून चुका होतात; पण त्यातून शिकत पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असतो,' असे प्राचीताई सांगतात.
बीज संवर्धनाची चळवळ
दरम्यान, २०१३ ला नागपूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर प्राचीताईंची बीजोत्सव समुहाशी ओळख झाली. देशी बियाण्यांच्या संवर्धनासह विषमुक्त शेती आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रचार प्रसार करणारा बीजोत्सव हा एक समुह. सुरुवातीला कार्यकर्त्या म्हणून बीजोत्सवाच्या कामात रुजू झालेल्या प्राचीताईंनी आज या चळवळीची नागपुरातील बरीचशी जबाबदारी घेतलीये. दरवर्षी, तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करून त्यातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे काम बीजोत्सवाच्या माध्यमातून होते.
वातावरणातील बदलांचे मोठे आव्हान पेलत पर्यावरण संवंर्धनाचे काम आणि त्याबद्दलची जनजागृती निरंतर सुरु ठेवण्याचा प्राचीताईंचा मानस आहे.