दिल्लीतील मोर्चा हा आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    13-Oct-2026   



Eknath Shinde on Rahul Gandhi
 
मुंबई,  :(Eknath Shinde on Rahul Gandhi) कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा ही भारताच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडी आघाडीने केली. दिल्लीतील मोर्चा हा आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.
 
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्व संविधानिक संस्था उभ्या केल्या. सर्वोच्च न्यायालयावर चाल करून जाणे आणि त्यांच्यावर दबाव आणणे ही कधीही न घडलेली घटना आपण पाहिली. या घटनेबद्दल मी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा निषेध करतो. लोकशाहीत त्यांना न्याय मिळवून घेण्याचा अधिकार आहे. पण याचिका दाखल करायला मोर्चा घेऊन जाणे ही कोणती पद्धत? हा भारताच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला असून त्यांनी माफी मागितली पाहिजे. संविधान कसे नष्ट होईल, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे होईल, हे त्यांच्यामार्फत सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरील आंदोलनाचा प्रकार आणि दिल्लीतील राजकीय आंदोलने हे देशासाठी घातक आहेत. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. हे परदेशी ताकदींची बाहुली बनले असून आंतराष्ट्रीय कट कारस्थानाचा हा भाग असल्याची शंका येते."(Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
विरोधी पक्षांकडून देश अस्थिर करण्याचे काम
 
"देशाला अस्थिर करण्याचे आणि देशाला अराजकतेकडे नेण्याच काम विरोधी पक्ष करत असून हे दुर्दैवी आहे. त्यांना निवडणूकीत जिंकता येत नाही अशी खात्री झाल्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर हल्ला करतात पण पुरावा देत नाहीत. याच निवडणूक आयोगाच्या कार्यकाळात ते तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा काही राज्यांमध्ये जिंकलेत. मग तिथेही व्होटचोरी झाली का? असा प्रश्न उपस्थित होतो. देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम ही मंडळी करत आहेत," असेही ते म्हणाले.(Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
देशातील सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा देशद्रोह
 
"ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्या सैन्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. देशातील सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा देशद्रोह आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आकस किंवा द्वेष असू शकतो पण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप करता, ही कुठली संस्कृती? तुम्हाला देशात अस्थिरता पसरवायची असून हा आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे, अशी शंका येते. देशात आणीबाणी आहे असे ते म्हणतात. पण आणीबाणी असती तर ते आंदोलन करायला सर्वोच्च न्यायालयात गेले असते का? जंतरमंतरवर आंदोलन केले असते का? आणीबाणीमध्ये तर लाखों लोक तुरुंगात होते. पत्रकारांवर बंदी होती. आता तर सगळे व्यक्त होतात बोलतात," असेही शिंदे म्हणाले.(Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
हे शिवतांडव नव्हे, सत्तेसाठी हपापलेल्यांचा थटथयाट
 
"खरे म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेले आंदोलन हा सत्तेला हपापलेल्या लोकांचा थयथयाट होता. या थयथयाटाला शिवतांडव म्हणून राहुल गांधी यांनी भगवान शंकराचा अपमान केला आहे. आता महादेवांनी तिसरा डोळा उघडला तर इंडिया आघाडी जळून खाक होईल. त्यामुळे काय बोलायचे, कुणाची तुलना कुणाशी करायची याचे भान असले पाहिजे," असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.(Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर