मुंबई : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने दिल्लीत दाखल व्हावे अन्यथा निलंबनाची कारवाई करत तुम्हाला पुन्हा कोणतीही निवडणूक लढू दिली जाणार नाही, असा दबाव आणल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी अजय चिकारा यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ही ऑडिओ क्लिप दाखवत काँग्रेसची पोलखोल केली. गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आंदोलने पाहता राहुल गांधींना विरोधकांचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी काँग्रेसची ही धडपड सुरु असल्याचे दिसते.
ही ऑडिओ क्लिप दाखवताना नवनाथ बन म्हणाले की, "राहुल गांधी, तुम्हाला आंदोलन करायचे असेल, चळवळ उभी करायची असेल, तर नक्की करा. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्यही नाही आणि कर्तृत्वही नाही. हा रविवारचा ऑडिओ आहे. तुम्ही ज्या शहरात असाल ते शहर सोडा आणि तातडीने सोमवारी दिल्लीत हजर व्हा, असे आदेश महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारींकडून दिले जात आहे. त्यामुळेच कदाचित काल विश्वजित कदम यांनी एमपीएससीचे आंदोलन अर्धवट सोडून दिल्ली गाठली असेल. कारण त्यांनाही अशा धमक्या दिल्या गेल्या असाव्यात. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी स्वतः राहुल गांधी यांनी खुलासा केला पाहिजे."
काँग्रेसमध्ये हुकुमशाही?
"एकीकडे राहुल गांधी देशात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगतात. मात्र, आता त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या हुकूमशाहीची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. राहुल गांधी यांना रिलाँच करण्यासाठी सुरु असलेल्या हुकुमशाहीचा भांडाफोड झाला आहे. या देशात अराजकता निर्माण करायची आणि बांगलादेश, नेपाळ व श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हावी, यासाठी कदाचित राहुल गांधी यांचे हे षडयंत्र असेल. म्हणूनच महाराष्ट्रातील हे उदाहरण समोर आले आहे. कदाचित कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अशाच धमक्या दिल्या जात असतील," असेही नवनाथ बन म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....