महाराष्ट्राच्या मत्स्यपालनात आधुनिकतेचा ‘मास्टरप्लॅन; महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेश मॉडेलचा अभ्यास

   
 
Maharashtra Fisheries Modernisation
 
मुंबई: महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील मत्स्य संशोधन प्रयोगशाळा आणि कोळंबी प्रक्रिया उद्योगांना भेट देत विविध तांत्रिक सुविधांचा अभ्यास केला. मत्स्यपालकांचे नुकसान कमी करणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, समुद्री खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन करणे आणि निर्यातक्षमतेला चालना देणे, या दृष्टीने या अभ्यास दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Fisheries Modernisation)
 
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी केवळ उत्पादनवाढ पुरेशी नसून रोगनियंत्रण, वैज्ञानिक व्यवस्थापन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि सक्षम बाजारपेठ व्यवस्था यांची सांगड आवश्यक आहे. याच अनुषंगाने मंत्री राणे यांनी आंध्र प्रदेशातील प्रयोगशाळा आणि प्रक्रिया उद्योगांच्या कार्यपद्धतींची माहिती घेतली. या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायासाठी कसा उपयोग करता येईल, याचा अभ्यास करण्यात आला. (Maharashtra Fisheries Modernisation)
 
आंध्रप्रदेशमधील कोव्वाडा येथील आनंदा ॲडव्हान्स ॲक्वा लॅबच्या प्रादेशिक संशोधन व विश्लेषण प्रयोगशाळेला भेट देऊन मंत्री राणे यांनी मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी व मातीच्या गुणवत्तेची तपासणी, सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण आणि कोळंबीच्या आरोग्य व्यवस्थापनाची माहिती घेतली.
 
मंत्री राणे यांनी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील रायालम-भीमावरम येथील जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्स या उद्योगांनाही भेट दिली. येथे मोठ्या प्रमाणावर कोळंबी प्रक्रिया, निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती आणि समुद्री खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन कशा प्रकारे केले जाते, याची माहिती त्यांनी घेतली. (Maharashtra Fisheries Modernisation)
 
या भेटीदरम्यान कच्च्या मालाची हाताळणी, कोळंबीची प्रतवारी, सोलणे, स्वच्छता आणि उत्पादनांची गुणवत्ता टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला. याशिवाय शीतसाखळी व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन आणि उत्पादनांचा मागोवा घेण्याची यंत्रणा यांचाही आढावा घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत समुद्री खाद्यपदार्थांची निर्यात करताना उत्पादनांची सुरक्षितता आणि गुणवत्ता मानके पाळणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आधुनिक प्रक्रिया सुविधा आणि प्रभावी गुणवत्ता व्यवस्थापनाचा महाराष्ट्रातील उद्योगांना कसा लाभ होऊ शकतो, या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा आहे. (Maharashtra Fisheries Modernisation)
 
महाराष्ट्राला समुद्री मत्स्यव्यवसायाची मोठी क्षमता लाभली आहे. या क्षेत्रात उत्पादनाबरोबरच प्रक्रिया, साठवणूक, मूल्यवर्धन आणि निर्यात यांवर लक्ष केंद्रित केल्यास मत्स्यव्यवसायाच्या आर्थिक संधी विस्तारू शकतात. कोळंबी आणि इतर समुद्री उत्पादनांवर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून निर्यातक्षम उत्पादने तयार केल्यास जागतिक बाजारपेठेत राज्याची स्पर्धात्मकता वाढविण्यास मदत होऊ शकते. (Maharashtra Fisheries Modernisation)
 
या अभ्यास दौऱ्यात आनंदा समूहाचे अध्यक्ष यू. के. विश्वनाथ राजू, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Fisheries Modernisation)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर