मुंबई : (Devendra Fadnavis Water Conservation Mission ) राज्यातील दुष्काळाच्या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण करा. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. जलसंधारणाच्या कामांचे एकात्मिक नियोजन, तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सक्रिय सहभागातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यंदा ‘वॉटर कप’ अभियान लवकर सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या मोहिमेत पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.Devendra Fadnavis Water Conservation Mission
जलसंधारणासाठी निश्चित करण्यात आलेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करून तिच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून त्यांची प्रगती तपासण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. कामांमध्ये अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
जलसंधारणाची कामे पहिल्या पावसापासूनच पाणी अडविण्यास सक्षम असतील, अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होईल आणि गावांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस पावले टाकता येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यापूर्वी विविध संकटांच्या काळात प्रशासकीय यंत्रणेने पहाटेपासून कामाला लागून कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्याच तत्परतेने आणि समर्पित भावनेने आता जलसंधारणाच्या मोहिमेत सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis Water Conservation Mission
जलसंवर्धनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर अभिनेते आमिर खान यांनी भर दिला. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामे सातत्याने राबवावीत. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम आयोजित करून पावसाळ्यापूर्वी कामांना गती द्यावी, असे ते म्हणाले.
यंदाचे वर्ष आव्हानात्मक असले, तरी निराशेचे रूपांतर आशेत करून जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. पाण्याचा पुनर्वापर, भूजल पुनर्भरण आणि जलस्रोतांचे संवर्धन यांना प्राधान्य देतानाच राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही आमिर खान यांनी केले.
या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.Devendra Fadnavis Water Conservation Mission
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.