नाशिक (Saptashrungi Gad Navratri 2026): नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावर दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुकर करण्यासाठी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकावरून दररोज २५० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, गडावर १२ ते १३ लाख भाविक येण्याचा अंदाज असून, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेसाठी ३११ सीसीटीव्ही कॅमेरे आणि दीड हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. (Saptashrungi Gad Navratri 2026)
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जादा बसेसचा मार्ग बदलला
नवरात्रोत्सवात जादा बसेस नियमित मार्गाने धावल्यास त्र्यंबक नाका, सारडा सर्कल, मुंबई नाका आणि द्वारका परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान जादा बसेससाठी सुधारित मार्ग निश्चित केला आहे. (Saptashrungi Gad Navratri 2026)
जाण्याचा मार्ग : नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानक–मेहेर सिग्नल–अशोकस्तंभ–रविवार कारंजा–पंचवटी कारंजा–दिंडोरी नाका–सप्तशृंगगड.
परतीचा मार्ग : सप्तशृंगगड–दिंडोरी नाका–पंचवटी कारंजा–रविवार कारंजा–सांगली बँक सिग्नल–शालीमार–खडकाळी सिग्नल–त्र्यंबक नाका सिग्नल–नवीन सीबीएस. हा बदल केवळ सप्तशृंगगडासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा बसेसना लागू राहणार असून, नियमित एसटी बसेस पूर्वीच्या नियोजनानुसार धावतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. (Saptashrungi Gad Navratri 2026)
४५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विविध आगारांमधून ४५ अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. नाशिक-२, मालेगाव आणि मनमाड आगारांतून प्रत्येकी पाच, सटाणा येथून चार, कळवण येथून २५ आणि येवला येथून पाच फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या प्रमाणानुसार फेऱ्या वाढविण्याची तयारीही महामंडळाने ठेवली आहे. (Saptashrungi Gad Navratri 2026)
३११ कॅमेऱ्यांची नजर; दीड हजारांहून अधिक सुरक्षारक्षक
गडावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तात १७ पोलीस निरीक्षक, ४१ उपनिरीक्षक, ३१८ पोलीस कर्मचारी, १०० महिला पोलीस, ८०० पुरुष होमगार्ड आणि २०० महिला होमगार्ड यांचा समावेश असेल. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची एक प्लाटून आणि दोन आरसीपी पथके सज्ज राहतील. (Saptashrungi Gad Navratri 2026)
दर्शनरांगा, मंदिर प्रवेशद्वार, पायऱ्यांचा मार्ग, एसटी बसस्थानक, रोप-वे, पार्किंग आणि नांदुरी परिसरात विशेष लक्ष दिले जाणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी सुमारे २०० बॅरिकेड्स, वॉकी-टॉकी, ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि आपत्कालीन वाहने उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. साध्या वेशातील पोलीस पाकीटमारी आणि चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवतील, तर सायबर पोलीस समाजमाध्यमांवरील अफवांवर नजर ठेवणार आहेत. (Saptashrungi Gad Navratri 2026)
नांदुरीत पार्किंग; सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य
गडाकडे जाणाऱ्या खासगी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी नांदुरी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. वणी–नांदुरी परिसरात पर्यायी मार्ग, बॅरिकेडिंग आणि दिशादर्शक फलक उभारले जातील. गर्दी वाढल्यास शटल बससेवाही सुरू करण्याचे नियोजन आहे. (Saptashrungi Gad Navratri 2026)
भाविकांनी एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे, अधिकृत वाहनतळावरच वाहने उभी करावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे तसेच अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. (Saptashrungi Gad Navratri 2026)