मुंबई (Nitesh Rane on FCRA Bill): निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सुरू असलेल्या आंदोलनांमागे ‘एफसीआरए’ विधेयक रोखण्याचा विरोधकांचा अजेंडा असल्याचा आरोप राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी केला.
काँग्रेस, सीजेपी आणि अन्य विरोधकांना निवडणूक आयोगाचा मुद्दा हा केवळ बहाणा असून, परकीय निधीच्या नियमनाशी संबंधित विधेयकाला विरोध करणे हा त्यांचा मुख्य हेतू असल्याचा दावा त्यांनी केला. पुण्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याची टीका त्यांनी केली. मुंबईतील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Nitesh Rane on FCRA Bill)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे नेते पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप राणे यांनी केला. देशात यापूर्वीही विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र निवडणुकांतील पराभवानंतरच काँग्रेसला या प्रक्रियेवर आक्षेप घ्यावासा वाटत असल्याची टीका त्यांनी केली. तमिळनाडूसह अन्य राज्यांत दीर्घकाळ सत्ता न मिळाल्याबद्दलही काँग्रेस निवडणूक प्रक्रियेलाच जबाबदार धरणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Nitesh Rane on FCRA Bill)
‘एफसीआरए’ विधेयकामुळे परकीय निधी मिळविणाऱ्या काही घटकांवर निर्बंध येण्याची शक्यता असल्याने त्यांना संरक्षण देण्यासाठी विरोधक आंदोलन करत असल्याचा आरोप राणे यांनी केला. संविधान आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेण्यापूर्वी संबंधितांनी संविधानाचा अभ्यास करावा, असे ते म्हणाले. ध्रुव राठी यांच्यासारख्या परदेशी व्यक्तींनी भारताच्या निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करू नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. (Nitesh Rane on FCRA Bill)
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याला राजकीय रंग चढल्याचा आरोप राणे यांनी केला. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात राजकीय हेतू असलेले लोक सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यक सुधारणा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनातील गर्दीवर प्रश्न उपस्थित करताना बारामती अॅग्रो आणि विश्वजीत कदम यांच्या महाविद्यालयाशी संबंधित किती जण सहभागी आहेत, याचा हिशेब मांडावा, असे आव्हानही त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Nitesh Rane on FCRA Bill)
मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेसला आव्हान
काँग्रेसच्या ‘मतचोरी’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांनी राजीनामे द्यावेत, असे आव्हान राणे यांनी दिले. कर्नाटक आणि केरळमधील काँग्रेस सरकारांनीही स्वतःपासून सुरुवात करावी, असे ते म्हणाले. मतदार यादीतील अनियमिततेचे पुरावे असल्यास ते सादर करावेत आणि दोष आढळल्यास कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, राहुल गांधी यांनी सरकार लवकरच कोसळेल, या केलेल्या दाव्यावर राणे यांनी उपरोधिक टीका केली. संजय राऊत यांच्या सरकार पडण्याच्या भाकितांवरही त्यांनी निशाणा साधत, आता त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य अटकेबाबत बोलावे, असे आव्हान दिले. (Nitesh Rane on FCRA Bill)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.