नवी दिल्ली (Abhijit Dipke News) : केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीत एल्गार पुकारणारे 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांना विमान धावपट्टीवरच ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी हलवले, तर दुसरीकडे त्यांच्या मूळगावी हिंगोलीत त्यांच्या आजीने अखेरचा श्वास घेतला.
८५ वर्षीय सावित्रीबाई शंकर दिपके यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. संतूक पिंपरी या मूळगावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(Abhijit Dipke News)
विमानातूनच उचलले, कुटुंबीयांचा संताप
अभिजीत दिपके शनिवारी सकाळी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनासाठी रवाना झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. मात्र, दिल्लीत विमान उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सौरभ दास आणि इतर सहकाऱ्यांसह त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले असून त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.(Abhijit Dipke News)
मुलाला विमानातूनच ताब्यात घेतल्याचे कळताच दिपके कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काही तासांतच आजीच्या निधनाची बातमी आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यावेळी बोलताना अभिजीत यांचे वडील भगवान दिपके म्हणाले, "हे साधं विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. इथे काय चंबळच्या खोऱ्यातले डाकू जमलेत का? एवढी मोठी पोलीस फौज लावायची काय गरज आहे? खरे डाकू तर संसदेत बसले आहेत."(Abhijit Dipke News)
तर आईनेही सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, "पोरांनी असं काय वाईट केलं होतं की त्यांना विमानात जाऊन अटक करावी लागली? बलात्काऱ्यांच्या घरी जायला पोलिसांना वेळ नाही, पण आंदोलन करणाऱ्या पोरांना विमानातून उचलता? हे चुकीचे आहे."(Abhijit Dipke News)
अंत्यसंस्कारासाठी कुटुंब हिंगोलीकडे रवाना
सावित्रीबाईंच्या पार्थिवावर आजच हिंगोलीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी कुटुंबीय संतूक पिंपरीकडे रवाना झाले आहेत. मात्र, आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यात असलेले अभिजीत दिपके अंत्यसंस्काराला पोहोचणार का? आणि दिल्ली पोलीस त्यांना सोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Abhijit Dipke News)