ठाणे (Kalyan Tycoon Gold Avenue) : कल्याण पश्चिमेतील ‘टायकुन गोल्ड एव्हेन्यू’ पुनर्विकास प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ उडाली आहे. पुनर्विकासाचे आश्वासन देऊन मूळ रहिवासी आणि शेकडो सदनिका खरेदीदारांकडून तब्बल १७६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतली; मात्र प्रकल्पाचे काम २०२२पासून ठप्प असून घरांचा ताबाही मिळालेला नाही, असा गंभीर आरोप करत विकासकांसह संबंधित व्यक्तींविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विकासकांना देण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्राचा कथित गैरवापर करून सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Kalyan Tycoon Gold Avenue)
या प्रकरणी श्रीकांत दिगंबर शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी यांच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार, बांधकामातील विलंब, सोसायटीच्या जमिनीशी संबंधित व्यवहार आणि फ्लॅटधारकांकडून स्वीकारलेल्या रकमांचा तपशील आता पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. (Kalyan Tycoon Gold Avenue)