‘डॉक्टरकी’पलीकडचा वन्यजीवांचा संवर्धक

    01-Oct-2026   
 Dr Prasad Dabholkar Wildlife Conservation
 
‘डॉक्टरकी’चा पेशा सांभाळून, वन्यजीवांच्या संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणारे रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्याविषयी...
 
घराच्या आवारात अचानक साप दिसतो, भीतीने घरातील मंडळी घराबाहेर पडतात. कुठे जखमी पक्षी सापडतो, तर कुठे मानवी वस्तीत वन्यप्राणी अडकतो. अशा वेळी बहुतांश लोकांच्या मनात पहिला विचार येतो तो भीतीचाच. मात्र, डॉ. प्रसाद कृष्णाजी दाभोळकर यांच्यासाठी हा प्रसंग असतो समजून घेण्याचा, सुरक्षितपणे बचाव करण्याचा आणि त्या जीवाला पुन्हा त्याच्या अधिवासात पोहोचविण्याचा. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या दाभोळकर यांनी, गेली सुमारे २६ वर्षे वन्यजीव बचाव, उपचार, मानव-वन्यजीव संघर्ष आणि जनजागृतीसाठी काम केले आहे.
 
अलिबागच्या किनार्‍यापासून सह्याद्रीच्या जंगलापर्यंत वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी, सातत्याने धावणारे नाव म्हणजे डॉ. प्रसाद दाभोळकर. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ प्राण्यांना वाचविण्यापुरतीच मर्यादित नाही; तर वन्यजीवांविषयी समाजाची समज बदलण्याचा प्रयत्नही त्यामागे दिसतो. मुंबई आणि नवी मुंबईपासून अलिबागपर्यंत साप किंवा अन्य वन्यजीव मानवी वस्तीत अडकल्याची, जखमी झाल्याची अथवा आजारी अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली की, त्यांचा बचाव करण्यासाठी दाभोळकर पुढे सरसावतात. गरजेनुसार वनविभागाच्या परवानगीने उपचार करून, संबंधित प्राण्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची पद्धत त्यांनी अंगीकारली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी ‘वाईल्डलाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग (डब्ल्यूडब्ल्यूए)’ या संस्थेची स्थापना केली. अलिबाग आणि मुरूड तालुयांत कार्यरत असलेल्या या संस्थेत सुमारे ३० सक्रिय कार्यकर्ते असून, पाच वर्षांत साडे सहा हजारांहून अधिक सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या बचाव व उपचाराची नोंद संस्थेकडे आहे. या बचावकार्याची माहिती संबंधित वनाधिकार्‍यांनाही दिली जाते.
 
मगर, ग्रीन सी टर्टल, ऑलिव्ह रिडले टर्टल, अजगर, कोल्हा, घोरपड, विविध साप आणि स्थलांतरित पक्षी अशा अनेक प्रकारच्या वन्यजीवांशी त्यांचे काम जोडलेले आहे. मात्र, दाभोळकर यांच्या कार्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ‘रेस्क्यू’ पेक्षा ‘योग्य रेस्क्यू’वर त्यांनी दिलेला भर. नव्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीच्या मोहापेक्षा नैतिक पद्धतीने बचावकार्य करावे, वन्यजीव संरक्षण कायद्याचे पालन करावे आणि वनविभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करावे, यासाठी ते प्रशिक्षणात्मक कार्यशाळा घेतात. हीच भूमिका वनविभागाच्या कर्मचार्‍यांपर्यंतही पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परिसरातील प्राण्यांची ओळख, सुरक्षित बचावपद्धती आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी यासाठी त्यांनी, वन कर्मचार्‍यांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत.
 
दाभोळकर यांच्या कामाचा दुसरा महत्त्वाचा चेहरा म्हणजे जनजागृती! शाळा-महाविद्यालयांमध्ये वनसंवर्धन, वन्यजीव बचाव आणि मानव-वन्यजीव संघर्ष यावर त्यांनी, ७०हून अधिक व्याख्याने घेतली आहेत. जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये वन्यप्राणी आढळल्यास काय करावे, काय करू नये, याबाबतही ते मार्गदर्शन करतात. समाजमाध्यमे, माहितीपट, मुलाखती आणि वृत्तपत्रीय लेखन या माध्यमांचाही त्यांनी वापर केला आहे. डॉक्टर म्हणून काम करताना, सर्पदंशाच्या घटनांशीही त्यांचा जवळचा संबंध अनेकदा आला आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्‍या सर्पदंशाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे, संबंधित डॉक्टरांशी संवाद साधणे, तसेच सर्पदंश टाळण्यासाठी जनजागृती करणे, हाही त्यांच्या सामाजिक कार्याचाच भाग.
 
दाभोळकर यांची ओळख केवळ ‘रेस्क्यूअर’ म्हणून न राहता, ‘नैसर्गिक इतिहासाची नोंद करणारा अभ्यासक’ अशीही आहे."Reptile RAP' आणि "Reptiles Amphibians' या नियतकालिकांमध्येही, त्यांचे संशोधन प्रकाशित झाले. २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, अलिबाग परिसरातील ‘इंडियन क्रेट’च्या मृत प्राण्यांवर उपजीविका करण्याच्या नोंदी मांडण्यात आल्या. या अभ्यासातील छायाचित्रेही दाभोळकर यांनी टिपली आहेत. अलिबागच्या जैवविविधतेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, केवळ सापांपुरतीच मर्यादित नाही. २०२४ मध्ये कंकेश्वर डोंगर परिसरात, त्यांच्या टीमने ‘वाघाटी’ची नोंद केली. या परिसरातील तिची ही पहिलीच दस्तऐवजीकृत नोंद ठरली. २०२६ मधील त्यांच्या उपक्रमांतर्गत अलिबाग परिसरात ४०हून अधिक सापांच्या प्रजाती, सात पाली, तीन सरडे आणि चार कासवांच्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आलेे.
 
वन्यजीव बचाव, वैज्ञानिक निरीक्षण, प्रशिक्षण आणि लोकप्रबोधन या चारही बाजू एकत्र आणणारे त्यांचे काम, म्हणूनच वेगळे ठरते. या कामामुळेच नुकतीच त्यांची रायगड जिल्ह्याच्या ‘मानद वन्यजीव रक्षक’पदी नियुक्तीदेखील झाली. डॉ. प्रसाद दाभोळकर यांची वाटचाल एका डॉक्टरची वन्यजीवांशी जोडलेली अतिरिक्त आवड इतकीच मर्यादित नाही. बचावकार्यापासून उपचारापर्यंत, प्रशिक्षणापासून जनजागृतीपर्यंत आणि प्रत्यक्ष कामापासून शास्त्रीय दस्तऐवजीकरणापर्यंत संवर्धनाची एक साखळीच त्यांनी उभी केली. वन्यजीवांबद्दलची भीती कमी करून, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करणे आणि माणूस-वन्यजीव सहअस्तित्वाचा मार्ग दाखविणे, हेच त्यांच्या कामाचे खरे वैशिष्ट्य ठरते.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर