मुंबई (Chandraprakash Dwivedi) : मी एक चाणक्य सारखी मालिका घडवली, पण माझ्या आयुष्यातील मोठा काळ त्यास घडवण्यात नव्हे, तर सत्तेशी संघर्ष करण्यात गेला. वस्तुस्थिती अशी आहे की, आजच्या समाजाचा चित्रपट क्षेत्रात सहभागच नाही. त्यामुळे समाजाने आपल्याला हव्या असलेल्या प्रकारचा सिनेमा तयार व्हावा, अशी अपेक्षाही ठेवू नये, असे प्रतिपादन प्रख्यात दिग्दर्शक आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले. पाञ्चजन्यच्या ‘सुशासन संवाद’ कार्यक्रमात मुंबई येथे ज्येष्ठ पत्रकार अनुराग पुनेठा यांनी त्यांच्याशी विविध विषायांवर संवाद साधला. (Chandraprakash Dwivedi)
चाणक्य मालिकेच्या यशानंतर काही वर्षांनी घडलेला एक किस्सा सांगताना ते म्हणाले, मला पुन्हा ‘चाणक्य’ ही मालिका बनवण्याचा प्रस्ताव एका मोठ्या कंपनीकडून आला होता. मात्र, त्यामध्ये चाणक्याला धूर्त आणि दुष्ट स्वरूपात दाखवण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा प्रश्न निर्माण झाला की, जे काम मी ३० वर्षांपूर्वी केले होते, तेच काम ३० वर्षांनंतर केवळ बाजारपेठ आणि लोकांच्या मनोरंजनासाठी वेगळ्या पद्धतीने का करायचे? (Chandraprakash Dwivedi)
तक्रार चित्रपट निर्मात्यांशी नाही, तर समाजाशी असा गंभीर आरोप करत द्विवेदी म्हणाले, चित्रपट निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये गुंतवणारा निर्माता सर्वप्रथम नफ्याचा विचार करणारच. त्यामुळे माझी तक्रार चित्रपट निर्मात्यांशी नाही, तर समाजाशी आहे. सिनेमा मूलतः एक व्यावसायिक क्षेत्र आहे. जेव्हा आपण एखादा चांगला चित्रपट पाहतो, तेव्हा तो नेहमीच जाणीवपूर्वक आखलेल्या नियोजनातून तयार झालेला असतो असे नाही. अनेकदा तो अनपेक्षितपणे, म्हणजेच ‘बाय डिझाइन’पेक्षा ‘बाय डिफॉल्ट’ अधिक चांगला ठरतो. (Chandraprakash Dwivedi)
पुढे ते म्हणाले, ‘पद्मावत’ चित्रपटाचे उदाहरण पाहिल्यास या चित्रपटावर चार राज्यांनी बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की, एखादी दंगल किंवा हिंसाचार होण्याची शक्यता असेल, तर ती रोखणे ही सरकारांची जबाबदारी आहे. मग आपल्या राज्यकर्त्यांनी हे का मान्य केले नाही? ते कोणाला खूश करण्यात व्यस्त होते? (Chandraprakash Dwivedi)
रामाची कथा ही विश्व मानवतेची कथा
या देशात रामायणाच्या सुमारे ३०० आवृत्त्या आहेत. त्यावर सर्वांत गांभीर्याने अभ्यास फादर कामिल बुल्के यांनी केला. बेल्जियममधून भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेल्या पाद्री बुल्के यांनी तुलसीदासांनी रचलेले रामायण वाचले आणि त्याचा सखोल अभ्यास केला. फादर बुल्के यांनी म्हटले होते की, ‘रामाची कथा ही विश्व मानवतेची कथा आहे.’ भारताची हीच परंपरा राहिली आहे की, प्रत्येक लेखकाने मूळ कथेचा आत्मा कायम ठेवत ती आपल्या पद्धतीने मांडली आहे, असे चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितले. (Chandraprakash Dwivedi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक