‘माझ्या नवऱ्याला का मारलं पप्या शिंदे?’ विजेता पूर्णेकर यांचा काळीज पिळवटून टाकणारा सवाल!
‘एका ताटात जेवत होता तू... तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते; कोणाच्या सांगण्यावरून हे केलंस?’ पत्नी विजेता पूर्णेकर यांचा काळीज पिळवटून टाकणारा सवाल
ठाणे (Pradeep Purnekar Murder Wife Statement) : “माझ्या नवऱ्याला का मारलं पप्या शिंदे? एका ताटात जेवत होता तू... तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते. कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलं?” या शब्दांत प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी पतीच्या हत्येनंतर संताप आणि आक्रोश व्यक्त केला. पतीच्या मृत्यूने सर्वस्व गमावल्याची भावना निर्माण झालेल्या विजेता यांच्या या सवालांनी पूर्णेकर हत्या प्रकरणातील मैत्री, विश्वास आणि विश्वासघाताचा धक्कादायक पैलू समोर आला आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात त्यांचा मित्र पप्या शिंदे याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर विजेता पूर्णेकर यांनी पप्या शिंदेसोबतच्या जुन्या संबंधांचा दाखला देत त्याच्यावर संताप व्यक्त केला. (Pradeep Purnekar Murder Wife Statement)
“एका ताटात जेवत होता तू. तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते. मग माझ्या माणसाचा असा घात का केला? कोणाच्या सांगण्यावरून हे केलंस?” असा सवाल त्यांनी केला.
‘माझा माणूस परत आणून दिलात तर पाय धुवून पाणी पिईन’
पतीच्या हत्येचा धक्का सहन न झालेल्या विजेता यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. “माझ्या माणसाला परत आणून दिलं तर त्या व्यक्तीचे मी पाय धुवून पाणी पिते,” असे म्हणत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. (Pradeep Purnekar Murder Wife Statement)
“त्यांच्यावर एवढे वार, एवढ्या गोळ्या का झाडल्या? तो कोणी मंत्री होता का, त्याच्यावर एवढी फायरिंग करायला?” असा संतप्त सवालही त्यांनी केला.
‘नशेमुळे पोरं वाया जात होती म्हणून तो लढत होता’
पूर्णेकर कोणासाठी आणि कशासाठी लढत होते, हे सांगताना विजेता यांनी अंमली पदार्थांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. “नशेमुळे पोरं वाया जात होती. त्यांच्यासाठी तो लढत होता. त्याला लढू नको, असं सांगत होते. पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही,” असे त्या म्हणाल्या. (Pradeep Purnekar Murder Wife Statement)
पूर्णेकर यांना एवढ्या मोठ्या हल्ल्याचा धोका असल्याची कल्पना असती तर ही घटना घडू दिली नसती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘लेकरांना मागे टाकून तो गेला... आता राजकारण नको’
पतीच्या हत्येमुळे मुलांना वडिलांच्या छत्रापासून मुकावे लागल्याची वेदना व्यक्त करताना विजेता म्हणाल्या, “लेकरं मागे टाकून तो गेला.” या घटनेनंतर राजकारणापासून दूर राहण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. (Pradeep Purnekar Murder Wife Statement)
“आता मी सगळ्यांना एवढंच सांगेल की लोकांसाठी काही नाही करायचं. आता स्वतःच्या परिवारासाठी करा. मला आता राजकारण नको. राजकारणाची मी खूप मोठी किंमत चुकवलीय,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Pradeep Purnekar Murder Wife Statement)