केल्याने देशाटन...

    04-Feb-2024
Total Views |
vineet
 
नवनवीन प्रदेशांच्या शोधात फिरस्ती करताना आपली संस्कृती, परंपरा आणि विविध भागांतील लोकांचे जीवनमान समजून घेण्याचा ध्यास घेतलेल्या, विनीत साळगांवकरविषयी...
 
आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्या सगळ्यांनाच स्वातंत्र्य हवं असतं. आजवर जे पाहत आलोय, आई-बाबांसमवेत अनुभवलंय, ते सर्व एकट्याने करून पाहण्याची खुमखुमी असते. विनीतला असं एकट्याने गोव्याला जायचे होते. त्याचं गाव तसं गोव्याजवळच. वडील मूळचे कारवारचे. खाडी समुद्राला मिळते, तिथे पोफळीच्या बागेत त्याचे घर. खरा वारा घरभर फिरत असलेला, तोच समुद्र विनीतकडे वारसा रुपाने आला. विनीतला समुद्र फार आवडतो. तो आहेसुद्धा समुद्रासारखाच. त्याच्या भरती सरतीच्या लाटांसारखा. केव्हा उधाणलेला तर केव्हा गूढ, एककल्ली आपल्याच विचारात मग्न असलेला. बालपण मात्र त्याचं कारवारात गेलं नाही. शाळेत जायला लागल्यापासूनच तो चिपळूण शहरात वाढला. वडिलांच्या कामामुळे त्या सर्वांना कारवार सोडून, चिपळूणला यावं लागलं. पण, समुद्राची ओढ काही गाव सुटलं तरी गेली नाही. बालपणी विनीत आई-बाबांसोबत गावी जाताना, गोव्यात मुक्काम करत असायचा. गोव्यातली एक जागा त्यांची ठरलेली होती. मात्र, इतर गोवा त्याने पाहिलं नव्हतंच. त्याला सगळं गोवा आपल्या पायाखालून घालायचं होतं.
 
विनीतची गोव्याशी ओळख तशी अगदी सलोख्याची. त्याची मातृभाषाच कोंकणी. साळगांवकर म्हणजे मूळ गोमंतक भूमीतलंच. वय वाढत होतं, मनात लपवून ठेवलेली ओढ वाढत होती. असं करता-करता पहिली नोकरी लागली. वयवर्ष २०. विनीत चिपळूणवरून रत्नागिरीत राहू लागला. एकटाच राहायचा. स्वातंत्र्य हवं होतंच, ते मिळालं आणि मग त्याची पावलं आपल्या पहिल्या स्वप्नाकडे वळली. पहिला पगार हातात आला २ हजार, ३०० रुपये. सगळे घेतले, बॅग भरली आणि ७० रुपयांचे जनरल तिकीट काढून, तो ट्रेनमध्ये चढला. रेल्वे स्थानकावर उतरला, एसटी मिळाली. नेहेमी जावंस वाटायचं, त्या समुद्र किनार्याचा नाव आणि काहीच वेळात समुद्र समोर उभा थकलेला. या मुसाफिराच्या खांद्यावर कपड्यांची पिशवी, पिशवीत उरलेले पैसे आणि पुढे काय करायचे याची पाटी मात्र कोरी. तिथे गोव्यातले तरूण कोंडाळे करून उभे होते.
 
सस्ता रूम म्हणत, ३०० रुपयांत रात्रीची सोय. पुढचे दोन दिवस दोन्ही बाजूंचे किनारे पायी चालत भटकले, रात्री येऊन झोपायचे, सकाळी पुन्हा उठून नाश्ता केला की पदयात्रा सुरू. समुद्र तसं त्याला परिचयाचा. कारवार आणि चिपळूण या त्याच्या दोन घरामधलेच हे किनारे ना! पण, तरीही काही तरी वेगळं. परदेशी नागरिक, त्यांचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या आरामाचा आणि चैनीच्या संकल्पना, त्याचवेळी कुठूनसे दिसणारे भारतीय पर्यटक, त्यांच्या पर्यटनाच्या संकल्पना, त्यांची मजा करायची वेगळी पद्धत, भजन, कीर्तन, रात्रीची मौज, समुद्र असं केवढं काय काय. गोव्याच्या बसमधून प्रवास करताना, सापडत गेलेलं गोव्याचं मन. गोव्याचं अशा अनेक आयामांतून सापडलेलं मर्म. तिथल्या स्त्रिया, त्यांचं बोलणं, त्यांची संस्कृती, खाद्यसंस्कृती तशी परिचयाची तिथे काय खावं आणि कसं खावं याची माहिती होतीच. गोवा आवडलं त्याला. त्यानंतर पैसे संपले आणि विनीत घरी परतला. पुन्हा पैसे जमवून पुन्हा गोवा.
 
असं सात वर्षं तो गोव्यात जात राहिला. त्यानंतर गोकर्ण आणि मग हळूहळू त्याने पंजाब, हिमालयाची सांगत धरायला सुरुवात केली. भारत किती विविधतेने नटला आहे. समुद्र, हिरवे घाट मोठे, हिमाच्छादित शिखर, थंडीचे प्रदेश, कोरडी थंडी, ताडा-माडांनी साकारलेले किनारे, ओसाड प्रदेश असं केवढं काय काय त्याला खुणावू लागलं. अनेक वस्तुसंग्रहालये यानिमित्ताने पाहून झाली, वयाची तिशी उलटायच्या आधीच चारधाम यात्रा संपूर्ण झाली. कोणत्याही ठिकाणी जाताना केवळ त्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळेच पाहू नयेत, तर ते स्थान पुरेपूर आपल्या मनात झिरपू द्यावं, या मताचा विनीत आहे. केवळ डोळे नाही, तर कानही उघडे ठेवून शहर अनुभवावं. नाकाला सगळ्या प्रकारचे वास येऊ द्यावे, स्थानिक चवी अनुभवाव्या. कधी तरी केवळ रोजचे कपडे घालून फेरफटका मारून यावा, कोरडी बोचणारी थंडीची जाणीव केवढ्या संवेदना जीवंत करते!
 
कदाचित हेच कारण आहे, विनीतला कुणा दोस्तांसोबत बाहेर पडायला आवडत नाही. सर्वांच्या इच्छा, अपेक्षा समजून घेत, आपली कुचंबणा करवून घेण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने जग फिरलेलं बरं.फिरणे म्हणजे केवळ सुट्ट्या नाहीत, तर ते जाणून घेणं असतं, आपलं जग समजून घेणं असतं. आपल्या परिसंस्थेचे माहिती असं आपल्याला आवश्यक असतं. देशाटन केल्याने आपले विचार प्रगल्भ होतात, अनुभव विश्व समृद्ध होतं. अनेक गोष्टींची आपल्याला एकहाती माहिती उपलब्ध असते. विविध विचारधारा, संस्कृती, परंपरा, भाषा यांची माहिती होते. विनीतच हा प्रवास असाच सुरू राहो, ही दै. ’मुंबई तरुण भारत’कडून सदिच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.