मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांच्या सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी संजय राऊतांवर युक्तीवादादरम्यान गंभीर आरोप केले आहेत. "राऊतांचा सहकारी प्रविण राऊत पत्रा चाळीच्या विकासाचे काम पाहत होता. याच दरम्यान त्याला एचडीआयएलकडून ११२ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळते करण्यात आले.", अशा आरोपांच्या फैरी ईडीकडून सुरू झाल्या.
"संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने ३७ कोटी दिले. त्यानंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, राऊत कुटूंबियांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. अलिबाग येथे विकत घेतलेली जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली.", असा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. "प्रविण राऊत हा फक्त नावाला होता, तो संजय राऊत यांच्या वतीने सर्व व्यवहार करत होता, मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो किंवा दादरचे घर आणि अलिबागची जमीन, हे सगळं संजय राऊत यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं," असा आरोप ईडीने कोर्टामध्ये केला. शिवसेना खासदार संजय राऊतांना रिमांडसाठी कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर हजार करण्यात आले. इथे हजर करण्यासाठी विशेष कोर्टाची परवानगी घेण्यात आली होती. ईडीने कोर्ट क्रमांक ५४हून न्यायाधीश राहुल रोकडे यांच नाहरकत प्रमाणपत्र मिळवत संजय राऊतांना या कोर्टात हजर केलं आहे.
पीएमएलए कोर्टात संजय राऊतांच्या बचावात वकिलांनीही युक्तीवाद केला. खासदार संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित झाल्याचे त्यांनी म्हटले. प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत,इतकी दिवस का नाही कारवाई केली,कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती, असा दावा वकिलांनी केला. तसेच राऊत हृदयरोग रुग्ण आहेत. त्यांची रात्री उशीरा पर्यंत चौकशी करू नये. राऊतांची चौकशी सुरू असताना वकीलांना उपस्थित राहू द्या, अशी मागणी करण्यात आली. मात्र, ही मागणी फेटाळत केवळ सकाळी चौकशीपूर्वी तासभर आधीच राऊतांना वकीलांशी बोलता येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रात्री साडेदहा नंतर आरोपीची चौकशी करणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दुसरीकडे ईडीच्या वकिलांनी आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या होत्या. गुरु आशीष कंस्ट्रक्शनचा प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होता त्याला HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले, त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले,असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे. अलिबागची जमिन याच पैशातून खरेदी करण्यात आली असून राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात थेट आर्थिक फायदा झाला, असे ईडीचे वकिल म्हणाले. "संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. राऊत यांना दर महिन्याला दोन लाख रूपये प्रवीण राऊत कडून दिले जात होते", असाही आरोप झाला. पीएमएलए कोर्टाने राऊतांना या प्रकरणात ४ ऑगस्ट पर्यन्त ईडीची कोठडी सुनावली आहे.