‘पीकविम्याचे पैसे तातडीने द्या, अन्यथा...’

आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

    10-May-2022
Total Views |

BJP
 
 
 
 
 
मुंबई : “शेतकरीविरोधी भूमिका सोडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ पीकविम्याचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन करू,” असा इशारा भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात सोमवार, दि. ९ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश पॅनेलिस्ट समीर गुरव आदी उपस्थित होते.
 
 
 
पीकविम्याचे थकलेले दावे निकाली काढावेत
आ. पाटील म्हणाले की, “२०२० च्या खरीप हंगामात झालेल्या अवकाळीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. पावसामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीचा पीक विमा देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असतानाही ठाकरे सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील भाजयुमो कार्यकर्त्यांनी पीकविम्याची भरपाई देण्यात विमा कंपन्यांकडून होणार्‍या अन्यायाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यातील सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकर्‍यांना न्यायालयात धाव घेऊन न्याय मिळवावा लागतो ही लाजीरवाणी गोष्ट असून, न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय देताना ठाकरे सरकारलाही कानपिचक्या दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ४ लाख, ५० हजार शेतकर्‍यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता. मात्र, ८० टक्के शेतकर्‍यांना विमा भरपाई मिळाली नाही. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाच्या नुकसानीनंतरही विमा भरपाई देण्यात कंपन्यांकडून टाळाटाळ होत असून, हे पैसे विमा कंपन्यांनी सहा आठवड्यांच्या आत न दिल्यास राज्य सरकारने द्यावेत, अशा शब्दांत न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले आहे. राज्यभरातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पीकविम्याचे थकलेले दावे सरकारने विमा कंपन्यांना आदेश देऊन निकाली काढावेत,” अशी मागणी पाटील यांनी केली.
 
 
 
“याबाबत अधिक चालढकल न करता किंवा न्यायालयाच्या निकालास आव्हान देत वेळकाढूपणा न करता सरसकटपणे राज्यातील शेतकर्‍यांना तातडीने विमा भरपाई न दिल्यास राज्यातील शेतकर्‍यांच्या असंतोषास ठाकरे सरकारला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.