औरंगाबाद : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात वारंवार संघर्ष होत आहेत. मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेत घोषणाबाजी सुरू केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समोरासमोर आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे १०० कोटी रूपयांच्या विकास कामाचे ऑनलाईन स्वरूपात उद्घाटन करणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या कामांचे उद्घाटनसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर करत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. संदीप क्षीरसागर हे शिवसैनिकांना त्यांचे काम करू देत नाहीत. ते कामात ढवळाढवळ करतात असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने समज द्यावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. यादरम्यान शिवसेनेचे सचिन मुळूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.