डिजिटल पिढीचा व्यावहारिक दृष्टिकोन

Gen Z Education Trends
 
 
सध्या देशात सर्वाधिक चर्चेतला शब्द कोणता असेल, तर तो म्हणजे ‘जेन-झी’. कोणत्याही पिढीच्या वाटेला आली नाही, एवढी प्रसिद्धी या पिढीने मिळवली. अर्थात, आधीच्या पिढीपेक्षा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन याचा कारक ठरला. शिक्षण आणि काम यांकडे पाहण्याचा या पिढीचा दृष्टिकोन प्रचंड वेगळा आहे. त्याच दृष्टिकोनाचा आढावा घेणारा हा लेख...
 
अलीकडच्या काळात ‘जेन-झी’ ही शिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवणारी, महत्त्वाची पिढी म्हणून पुढे आली. उच्च शिक्षण कसे, कुठे आणि कशासाठी घ्यायचे, याच्या पारंपरिक कल्पनाच या पिढीने बदलल्या आहेत. त्यामुळे तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आवडी, अपेक्षा आणि वर्तन समजून घेणे, हे शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणसंस्थांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. लवचिक आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षण, करिअरची तयारी, केलेल्या खर्चाचा योग्य परतावा, शिकण्यात प्रत्यक्ष सहभाग आणि शिक्षणसंस्थेशी अर्थपूर्ण नाते, या अपेक्षा तिच्या महाविद्यालय निवडीवर प्रभाव टाकतात.
 
भारतामध्ये ‘जेन-झी’ही एक मोठीच सामाजिक आणि आर्थिक शक्ती आहे. ’बीसीजी’ आणि ’स्नॅप इंक’च्या संयुक्त अहवालानुसार, सुमारे ३७.७ कोटी लोकसंख्येसह ‘जेन-झी’ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी पिढी आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि समाज माध्यमांसोबत वाढलेली ही पिढी, तंत्रज्ञानाशी सहज जोडलेली आहे. ती दृश्य माध्यमांतून प्रभावीपणे संवाद साधते आणि स्वतःच्या मूल्यांशी जुळणार्‍या संस्था व अनुभवांना महत्त्व देते.
 
शिकण्याचे अनेक पर्याय : आज युवांच्या शिकण्याच्या पद्धतीत एक महत्त्वाचा बदल दिसतो. पारंपरिक वर्ग, तासभर चालणारे व्याख्यान आणि केवळ पाठ्यपुस्तकावर आधारित शिक्षणापलीकडे, त्यांना शिकण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. युट्यूबपासून ऑनलाईन अभ्यासक्रमांपर्यंत आणि ‘पॉडकास्ट्स’पासून, ‘इंटरॅटिव्ह प्लॅटफॉर्म्स’पर्यंत ज्ञान अक्षरशः तिच्या बोटांवर आले आहे. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठीचा महाविद्यालय हा एकमेव दरवाजा नाही. कारण, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी आता केवळ ‘हा अभ्यासक्रम कोणता’ एवढेच विचारत नाही; तो ‘मी यात नेमके काय शिकणार’, ‘ते माझ्या करिअरला कसे उपयोगी पडणार’, ‘मला माझ्या गतीने शिकता येईल का,’ असे प्रश्नही ही पिढी विचारते आहे. म्हणूनच, ऑनलाईन आणि हायब्रीड लर्निंग, व्हिडिओ, अनिमेशन, इंटरॅटिव्ह प्रश्नमंजुषा, सामूहिक प्रोजेट्स आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या पद्धतींचे महत्त्व वाढत आहे. ‘कोविड १९’ महामारीने ऑनलाईन शिक्षणाचा स्वीकार वेगाने वाढवला. पण, त्यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली, तंत्रज्ञान हे शिक्षणाचा पर्याय नसून शिक्षण अधिक लवचिक आणि सुलभ करण्याचे साधन आहे.
 
विशेष म्हणजे ‘जेन-झी’ला ऑनलाईन शिक्षणच हवे आहे, असा सरसकट निष्कर्षही योग्य ठरणार नाही. काही विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारे ऑनलाईन अभ्यासक्रम आवडतात, तर काहींना प्रत्यक्ष वर्गात अधिक एकाग्रता आणि मानवी संवाद. त्यामुळे या पिढीची खरी मागणी कदाचित ‘ऑनलाईन का ऑफलाईन?’ ही नसून, ‘मला निवडीचे स्वातंत्र्य आहे का,’ हीच आहे.
 
‘जेन-झी’च्या उच्च शिक्षणाकडे पाहण्यातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा, वेळ आणि मेहनत यांच्या बदल्यात प्रत्यक्षात काय मिळणार? याचा गांभीर्याने केलेला विचार. आज उच्च शिक्षण महागले असताना, हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. केवळ पदवी मिळणेच पुरेसे आहे का? त्या पदवीमुळे रोजगाराच्या संधी वाढतील का? प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील का? इंटर्नशिप मिळेल का? प्लेसमेंटची संधी असेल का? अभ्यासक्रमाला मान्यता आहे का?
 
एका तरुणाला सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये करिअर करायचे असेल, तर त्यासाठी तीन वर्षांची पारंपरिक पदवी आणि काही महिन्यांचा अत्यंत उपयुक्त कन्टेन्टनिर्मिती किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्स यांची तुलना अपरिहार्यपणे सुरू होते. महाविद्यालय त्याला आवश्यक रोजगार, कौशल्य आणि करिअर विकास देत नसेल, तर ती कौशल्ये बाहेरून शिकण्याचे अनेक मार्ग आज त्याच्याकडे उपलब्ध आहेत. इथेच उच्च शिक्षणासमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, विद्यार्थ्याला केवळ प्रमाणपत्र द्यायचे की काम करण्याची क्षमता विकसित करायची?
 
एकाच साच्यातील शिक्षणाला प्रश्न : ‘जेन-झी’च्या अपेक्षांमध्ये अभ्यासक्रमात वैयक्तिक भाव आणि लवचिकतेचे महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता आणि करिअरचे ध्येय वेगळे असताना सर्वांनी एकाच वेगाने, एकाच पद्धतीने आणि एकाच अभ्यासक्रमातून शिकावे, ही कल्पनाच या पिढीला सहज पटत नाही.
 
यामागे केवळ अधीरताच नाही; बदलत्या रोजगारविश्वाची वास्तविकताही आहे. आज एखादा विद्यार्थी ज्या क्षेत्रासाठी शिक्षण घेत आहे, त्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आवश्यक कौशल्ये त्याची पदवी पूर्ण होईपर्यंत बदललेली असू शकतात. त्यामुळे एकदा पदवी मिळवली आणि शिक्षण संपले, ही जुनी संकल्पनाही हळूहळू मागे पडत आहे. विद्यमान कौशल्ये अधिक विकसित करणे आणि बदलत्या रोजगारविश्वासाठी नवी कौशल्ये शिकणे, हेच करिअरचे महत्त्वाचे घटक बनत आहेत.
 
‘जेन-झी’च्या शिक्षणाबद्दल बोलताना एक विरोधाभास लक्षात घेणेही आवश्यक. ही डिजिटल पिढी असली, तरी शिक्षणात तिला केवळ स्क्रीनवरील विद्यार्जन नको आहे. तिला संवाद, सहकार्य आणि आपलेपणाची भावना यांचीही तितकीच गरज आहे. त्यामुळे समूहप्रकल्प, सहाध्यायांशी चर्चा, मार्गदर्शन, शिक्षकांशी संवाद आणि महाविद्यालयीन समुदायाशी जोडले जाण्याचे महत्त्व डिजिटल शिक्षणाच्या युगातही कमी झालेले नाही.
 
तंत्रज्ञान म्हणजे फक्त वर्गाचे डिजिटायझेशन नव्हे !
 
‘जेन-झी’साठी शिक्षण आधुनिक करणे, म्हणजे प्रत्येक व्याख्यान ऑनलाईन टाकणे किंवा वर्गात स्मार्टबोर्ड बसवणे एवढेच नाही. तंत्रज्ञानाने शिकण्याचा अनुभव अधिक सक्रिय अनुभवावर आधारित आणि प्रभावी करणे अपेक्षित आहे. आभासी वास्तव, संवादात्मक अध्ययन-साहित्य आणि डिजिटल प्रयोगशाळांमुळे, अनेक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवासारख्या शिकता येतात. मात्र, भारतासारख्या देशात डिजिटल दरीही लक्षात घ्यावी लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम उपकरणे, वेगवान इंटरनेट किंवा शांत अभ्यासाची जागा उपलब्ध असेलच, असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण खर्‍या अर्थाने सर्वांसाठी सुलभ आणि सर्वसमावेशक असेल, तेव्हा प्रगत ठरेल. आजच्या तरुण पिढीसाठी शिक्षण ‘प्रॅटिकल विषय’ आहे. त्यांचा मूलभूत प्रश्न असा आहे की, मला फक्त पदवी द्याल की बदलत्या जगासाठीही तयार कराल? तरुणासाठी शिक्षण आणि काम हे केवळ प्रतिष्ठेचे नव्हे, तर असे शिक्षण जे ज्ञानाबरोबरच कौशल्य, दिशा आणि भविष्यातील संधीही देईल. (क्रमशः)




प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.
संबंधित मजकूर