
स्त्री-भ्रूणहत्या आणि बालविवाहाविरोधात अॅड. वर्षा देशपांडे यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांना ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विचारकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
बालविवाहाविरोधात २०२४ साली भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ नोव्हेंबर रोजी अभियान सुरू केले आणि जगभराचा विचार करता, त्याला अत्यंत चांगले यश आले. त्यामुळे नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २७ नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालविवाहविरोधी दिवस’ जाहीर केला. हा खर्या अर्थाने भारताचा विजय आहे. भारताचा हा बालविवाहविरोधी लढा आणि त्यातले यश जगाच्या पटलावर आणण्यामध्ये अॅड. वर्षा देशपांडे यांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे.
अॅड. वर्षा देशपांडे ‘दलित महिला विकास मंडळा’च्या संस्थापक-सदस्य असून, २००७ सालापासून भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय निरीक्षण व देखरेख समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘पॅनेल अॅडव्होकेट’ म्हणूनही कार्य करतात. त्यांनी स्थापन केलेल्या मोफत कायदेविषयक मदत व माहिती केंद्राच्या माध्यमातून दहा हजारांहून अधिक कुटुंबांना कायदेविषयक मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे. शिवाय त्या उत्तम लेखिकाही आहेत.
गेली ४० वर्षे त्या लैंगिक समानता, मुलींचे संरक्षण, तसेच लिंगनिवडीच्या प्रथांविरोधातील कायद्यांची सक्षम अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्या कार्यरत आहेत. समाजजागृतीसोबतच रणनीतिक न्यायालयीन लढे, कायदेविषयक वकिली, समुदाय संघटन आणि जनजागृती यांच्या माध्यमातून महिला हक्क आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. याच आयामात त्यांनी स्त्री-भ्रूणहत्येच्या विरोधात ५१ ‘डिकॉय ऑपरेशन’चे नेतृत्व केले, तर तब्बल १७० बालविवाह थांबवले. बालविवाहापासून वाचलेल्या शेकडो मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहावे, यासाठी वर्षा यांनी प्रयत्न केले. या मुलींचे भवितव्य उज्ज्वल झाले. त्यांना २०२५चा प्रतिष्ठित ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड’ (संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार) प्राप्त झाला. तब्बल २०० देशांच्या सामाजिक कार्यकर्त्यांमधून अॅड. वर्षा देशपांडे यांना हा सन्मान मिळाला. भारत सरकारचा आणि समाजातील सज्जनशक्तीचा बालविवाहाविरोधातला लढा आणि त्याविरोधातले यश त्यांनी जगाच्या पटलावर आणले. अॅड. वर्षा यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
लक्ष्मणराव आणि ऊर्मिला देशपांडे हे दाम्पत्य बेळगाव, कर्नाटकचे. त्यांच्या सुकन्या वर्षा. लक्ष्मणराव हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. शिस्त, देश आणि समाजप्रेम हे संस्कार त्यांनी मुलांना दिले. त्यांनी सहजभावाने केलेल्या निःस्वार्थी कार्यातून वर्षा यांच्यावर संस्कार होत होते. ऊर्मिला या शिक्षिका. मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, याकडे त्यांचा कटाक्ष. या वातावरणात वर्षा यांचे बालपण उमलत होते. ८०चे दशक असावे. निपाणीला महापूर आला. महाविद्यालयांतून ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी मदतकार्यासाठी वर्षा पुढे सरसावल्या. त्यांनी सहविद्यार्थ्यांसोबत गावातून मदत गोळा केली आणि सगळे विद्यार्थी निपाणीला गेले. पुराच्या पाण्यामुळे परिस्थिती दयनीय झाली होती. घरदार, कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. विद्यार्थी मदत वितरित करू लागले- कपडे, दैनंदिन वस्तू, अन्नधान्ये. तेव्हा दृश्य असे होते की, आपल्या लेकराबाळांना-कुटुंबाला अन्न मिळावे, कपडे मिळावे म्हणून आयाबायांची झुंबड उडाली. शरीराने दुबळ्या असलेल्या त्या स्त्रियांमध्ये घर वाचवण्यासाठी ऊर्जा आली होती. पुराच्या थैमानातील भीषण परिस्थितीलाही महिलांनी नामोहरम केले होते. हे वास्तव पाहून तत्कालीन विद्यार्थीस्थितीत असलेल्या वर्षा यांच्या हृदयात जाणीव निर्माण झाली की, या स्त्रियांच्या हक्कांसाठी, प्रगतीसाठी काम करायलाच हवे.
पुढे सामाजिक बांधिलकी असलेले अत्यंत समाजशील अशा संजीव बोंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्या सातार्याला आल्या. पुढे वर्षा यांनी कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. महिलांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा आणि समन्वय करण्यासाठी त्यांनी आयुष्याची सुरुवात केली. ‘दलित महिला विकास मंडळा’ची स्थापना केली. महिला सक्षमीकरणाचे विविध विषय हाताळले. स्त्री-भू्रणहत्या आणि बालविवाह याविरोधात सर्व शक्तिनिशी काम केले. मागे बीडमध्ये ४ हजार ५०० किशोरी एकत्र आल्या; ‘आम्ही बालविवाह करणार नाही’ अशी शपथ घेतली आणि घेतलेला वसा पूर्ण केला. यामागची शक्ती होती, अॅड. वर्षा देशपांडे!
असो. वर्षा यांनी स्त्री-भ्रूणहत्येविरोधातला, बालविवाहाविरोधातला लढा थांबवावा, म्हणूनही काही लोकांनी त्यांना त्रासही दिला. खोट्या पोलीस तक्रारीही केल्या, धमक्याही दिल्या; पण त्या थांबल्या नाहीत. स्त्री-भ्रूणहत्या आणि बालविवाहाच्या विरोधातला लढा त्यांनी कायम सुरू ठेवला. त्या म्हणतात, "संविधानाने शक्ती दिली आहे. संविधानाच्या कक्षेत समाजकार्य करत राहणार आहे. तसेच स्त्री-पुरुष समानता म्हणजे, ‘पुरुष असा वागला म्हणजे मी असे वागेन’ असे नाही; तर प्रत्येक स्तरावर, प्रत्येक आयामात स्त्रियांना निर्णय घेण्याची संधी आणि ताकद हवी.” अॅड. वर्षा देशपांडे यांच्या कार्याकडे पाहून वाटते, ‘नारी तू नारायणी!’