१२ हजार २०० कोटींची मेट्रो; पण बाधित किती हेच ठरलेले नाही!

“८०% लोकांचा पाठिंबा असला तरी २०% विरोध असता कामा नये; बाधितांचे समाधान व्हायलाच हवे” — परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

    07-Sep-2026
Thane Metro
 
ठाणे : (Thane Metro) तब्बल १२ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्पाच्या मार्गात नेमकी किती घरे, बांधकामे आणि कुटुंबे बाधित होणार, याचीच अंतिम माहिती नसताना प्रकल्पाचे काम पुढे कसे नेले जात आहे, असा थेट सवाल ठाणेकरांकडून उपस्थित होत आहे.
 
शुक्रवारी ठाणे महापालिकेत महामेट्रोचे अधिकार्यांनी शहरातील लोकप्रतिनिधीना म्हणजेच सर्व आमदार, खासदार आणि सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रकल्पाबाबत सादरीकरणं केले. या दरम्यान लोकप्रतिनिधींनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर प्रकल्पाच्या नियोजनातील अनेक अनुत्तरित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. (Thane Metro)
 
बाधितांची संख्या अनिश्चित
 
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या सुमारे ३० किलोमीटरच्या या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पात सुमारे १,४०० ते १,५०० कुटुंबे बाधित होण्याची शक्यता असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, बाधितांची अधिकृत संख्या अद्याप निश्चित नसून सर्वेक्षण आणि जैविक ओळख प्रक्रियेनंतरच अंतिम आकडा स्पष्ट होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. (Thane Metro)
 
याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी महामेट्रोला धारेवर धरले. बाधित किती, त्यांचे पुनर्वसन कुठे आणि कसे, याचा ठोस आराखडा नसताना प्रकल्पाची आखणी कशी करण्यात आली? असा प्रश्न बैठकीत वारंवार उपस्थित झाला. (Thane Metro)
 
नवरसेवक नजीब मुल्ला यांनी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे का आणि पुनर्वसनासाठी प्रत्यक्ष जागा उपलब्ध आहे का, असा सवाल केला. क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून लोकमान्यनगर, आझादनगर आणि मनोरमानगर येथे पुनर्वसनाचा पर्याय सांगण्यात आला असला, तरी अनेक ठिकाणी आवश्यक बांधकाम परवानग्यांचाच प्रश्न कायम असल्याने बाधितांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. (Thane Metro)
 
आमदार संजय केळकर यांनी प्रकल्पाच्या परवानग्यांपूर्वीच बाधितांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसनाची स्पष्ट योजना असणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनीही बाधितांची अंतिम संख्या निश्चित नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. (Thane Metro)
 
दरम्यान, या रिंग मेट्रो विरोधात एल्गार पुकारणाऱ्या वेक अप ठाणेकर संघटनेने बैठकीनंतर तीव्र प्रतिक्रिया देत, हा केवळ मेट्रोचा नव्हे तर ठाणेकरांच्या पैशांचा आणि शहराच्या पुढील अनेक दशकांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. (Thane Metro)
 
त्यांच्या मते, इतक्या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पाबाबत किती कुटुंबे विस्थापित होतील, त्यांचे पुनर्वसन कुठे होईल, पर्यायी मार्गिकांचा तुलनात्मक अभ्यास झाला आहे का, किती वृक्ष बाधित होतील आणि मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिक पोहोचणार कसे, यासारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आधी सार्वजनिक होणे आवश्यक आहे. (Thane Metro)
 
विशेष म्हणजे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच काही भागात पर्यायी मार्गिकेचा प्रस्ताव मांडला असून त्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान मार्गिका अंतिम आणि सर्वार्थाने योग्य आहे का, हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा बनला आहे. (Thane Metro)
“आधी संपूर्ण माहिती द्या, नागरिकांशी चर्चा करा, पर्यायी मार्ग तपासा आणि बाधितांच्या पुनर्वसनाची हमी द्या; त्यानंतरच ठाणेकरांच्या पैशातून १२ हजार २०० कोटींचा निर्णय पुढे न्या.शहरातील लोकप्रतिनिधीनाच संपुर्ण प्रकल्पाबाबत स्पष्टता नसल्याचे शुक्रवारच्या बैठकीत समोर आले आहे त्यामुळे सर्व स्पष्ट झाल्याशिवाय प्रकल्प रेटायचा अट्टहास करू नये"
- दयानंद नेने,वेक अप ठाणेकर.
'नुसतं सादरीकरण केले मात्र बाधित किती आहेत विस्थापित किती आहेत त्यांचं पुनर्वसन कसे करणार,काही बदल आहेत ते कसे करणार यबाबत महामेट्रो अधिकाऱ्यांनी काहीच माहिती दिली नाही.प्रकल्पाच्या विरोधात काही जण असले तरी ८० टक्के लोकांचा पाठिंबा या प्रकल्पाला आहे. मात्र २० टक्केही लोकांचा विरोध असता कामा नये त्यांचे समाधान व्हायलाच हवे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.' - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
 

 




संबंधित मजकूर