मध्य प्रदेशातील विदिशापासून काही अंतरावर एक साधीशी टेकडी उभी आहे. पहिल्या नजरेत तिच्यात वेरूळची भव्यता नाही, अजिंठ्याच्या चित्रांची मोहिनी नाही किंवा खजुराहोसारखी क्षितिजावर उठून दिसणारी शिखरेही नाहीत. पण, भारतीय मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर या टेकडीसमोर थांबावेच लागते. कारण, सुमारे १६०० वर्षांपूर्वी या दगडांमध्ये भारतीय देवप्रतिमांची एक नवी दृश्यभाषा आकार घेत होती. ही टेकडी म्हणजे उदयगिरी-गुप्त सम्राटांच्या सामर्थ्याची, हिंदू देवप्रतिमांच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाची आणि राजसत्ता, धर्म व विश्वकल्पना यांच्या अद्भुत संगमाची साक्ष देणारे स्थळ...
उदयगिरी समजून घेण्यासाठी आधी विदिशा समजून घ्यावी लागते. प्राचीन भारतातील महत्त्वाच्या व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रांपैकी विदिशा एक होते. जवळच सांचीचे स्तूप, बेसनगर आणि प्रसिद्ध ‘हेलिओडोरस’ स्तंभ आहेत. म्हणजे बौद्ध, वैष्णव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक प्रवाहांचा संवाद शतकानुशतके घडत असलेल्या प्रदेशातच उदयगिरी उभी आहे. त्यामुळे येथे पाचव्या शतकाच्या प्रारंभी घडलेले परिवर्तन अचानक झालेले नव्हते; त्यामागे मध्य भारतातील अनेक शतकांची धार्मिक आणि कलात्मक परंपरा होती.
उदयगिरीच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचे नाव आहे गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय, अर्थात विक्रमादित्य. साधारण इ.स. ३८० ते ४१४ या काळात त्याची सत्ता उत्तर आणि मध्य भारताच्या मोठ्या प्रदेशावर विस्तारली. गुप्तकाळाला भारतीय कला, साहित्य, विज्ञान आणि संस्कृत विद्येच्या उत्कर्षामुळे अनेकदा ‘सुवर्णयुग’ म्हटले जाते. पण, उदयगिरी या सुवर्णयुगाला दगडात पाहण्याची संधी देते.
येथील गुहांमधील शिलालेखांमुळे उदयगिरीचा गुप्त राजदरबाराशी असलेला संबंध अधिक स्पष्ट होतो. चंद्रगुप्त द्वितीयाचा मंत्री वीरसेन याने शंभू अर्थात, शिवासाठी येथे गुहा निर्माण केल्याचा उल्लेख आढळतो. तो सम्राटाबरोबर येथे आल्याचेही लेखातून समजते. दुसरा महत्त्वाचा लेख गुप्त संवत ८२, म्हणजे साधारण इ.स. ४०१-४०२च्या आसपासचा आहे. त्यामुळे उदयगिरीतील कलाकृतींकडे केवळ शैलीच्या आधारावर पाहावे लागत नाही; त्यांना ऐतिहासिक कालबिंदूशी जोडणारा दुर्मीळ पुरावाही आपल्याकडे आहे.
टेकडीवर सुमारे २० शैलगृहे आणि कोरीव देवालये विखुरलेली आहेत. काही अत्यंत साधी, तर काही शिल्पांनी सजलेली. येथे शिव, विष्णू, गणेश, दुर्गा, तसेच जैन परंपरेचेही पुरावे आढळतात. गुहा क्रमांक चारमधील मुखलिंगासारखी प्रारंभिक शिवप्रतिमा, गुहा क्रमांक सहा जवळील विष्णू, गणेश, महिषासुरमर्दिनी आणि द्वारपाल यांसारख्या प्रतिमा पाहताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवते- पुढील अनेक शतकांमध्ये भारतीय मंदिरांवर वारंवार दिसणार्या देवप्रतिमांची दृश्यव्याकरणे येथे अधिक स्पष्ट आणि भव्य रूप धारण करू लागली होती. पण, उदयगिरीचा खरा आत्मा शोधायचा असेल, तर गुहा क्रमांक पाचसमोर उभे राहावे लागते.
येथे दगडी भिंतीतून जणू पर्वताएवढा वराह आपल्यासमोर प्रकटतो. मानवी देह आणि वराहाचे मस्तक असलेले विष्णूचे हे विराट रूप केवळ एका देवतेचे शिल्प वाटत नाही; संपूर्ण दृश्यावर त्याचे अस्तित्व अधिराज्य गाजवते. त्याच्या सुळ्याजवळ पृथ्वीचे मानवीकरण केलेली भूदेवी उभी आहे. खाली नागराज नम्रपणे वाकलेला आहे. आजूबाजूला देव, ऋषी, दैवी समुदाय आणि विविध विश्वशक्ती या घटनेचे साक्षीदार बनून उभ्या आहेत.
पुराणकथा परिचित आहे; हिरण्याक्षामुळे पृथ्वी क्षीरसागरात बुडते. विश्वाचा समतोल ढासळतो. तेव्हा विष्णू वराहाचे रूप धारण करून त्या अथांग जलात उतरतात आणि पृथ्वीला आपल्या सुळ्यावर उचलून पुन्हा तिच्या योग्य स्थानी स्थापित करतात. पण, उदयगिरीचा शिल्पकार केवळ ही कथा सांगत नाही.
येथे पृथ्वीचा उद्धार करणारा वराह म्हणजे अव्यवस्थेतून पुन्हा व्यवस्था निर्माण करणारी शक्ती आहे. जलाच्या अनिश्चिततेतून स्थिर भूमी वर येते; अराजकातून धर्मव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होते. म्हणूनच, काही कला-इतिहासकारांनी या शिल्पामध्ये गुप्त राजसत्तेचा राजकीय अर्थही पाहिला आहे. जसा विष्णू पृथ्वीचे रक्षण करतो, तसा आदर्श सम्राट पृथ्वीचे संरक्षण करून सुव्यवस्था निर्माण करतो, अशी राजकीय प्रतिमा यामागे असू शकते. हा अर्थ निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून स्वीकारण्याऐवजी एक महत्त्वपूर्ण अभ्यासकीय interpretation म्हणून पाहणे आवश्यक आहे; पण चंद्रगुप्त द्वितीयाच्या राजाश्रयाशी उदयगिरीचे असलेले संबंध पाहता, ही मांडणी निश्चितच विचार करायला लावते.
वराहाच्या शिल्पात आणखी एक विलक्षण गोष्ट आहे- प्रमाणाचा वापर. वराह प्रचंड आहे; त्याच्याभोवतीची इतर पात्रे तुलनेने लहान आहेत. शिल्पकाराला वास्तववादी प्रमाण दाखवायचे नाही. त्याला दैवीशक्तीची श्रेणी दाखवायची आहे. एकाच दगडी पटावर आकाराच्या माध्यमातून कोण सर्वश्रेष्ठ आहे, कोण विश्वाचा केंद्रबिंदू आहे, हे तो शब्दांशिवाय सांगतो. पुढील भारतीय मंदिरशिल्पात वारंवार दिसणार्या या दृश्यभाषेचे प्रभावी प्रारंभिक उदाहरण उदयगिरीत पाहायला मिळते.
उदयगिरीचे महत्त्व मात्र एका वराहप्रतिमेपुरते मर्यादित नाही. येथे विष्णूचे ‘अनंतशयन’ रूपही विश्वनिर्मितीच्या संकल्पनेशी जोडलेले आहे. एका बाजूला आद्य जलावर शयन करणारा विष्णू आणि दुसरीकडे त्याच जलातून पृथ्वीला वर उचलणारा वराह-सृष्टी, काल, जल आणि पृथ्वी यांचे एक मोठे तात्त्विक कथानक या टेकडीवर आकार घेताना दिसते.
संशोधक मायकल विलीस यांनी उदयगिरीच्या रचनेत सूर्याची गती, ऋतुचक्र, जलव्यवस्था आणि राजकीय विधी यांच्यातील संभाव्य संबंधांकडेही लक्ष वेधले आहे. टेकडीतील नैसर्गिक दरी, पावसाळ्यात त्यातून वाहणारे पाणी, प्रतिमांची दिशा आणि विष्णूच्या प्रतिमांचा परस्परसंबंध पाहता, उदयगिरी ही केवळ एकामागोमाग खोदलेल्या गुहांची मालिका नसून, विचारपूर्वक घडवलेले 'ritual landscape' असावे, अशी मांडणी पुढे येते. म्हणजे येथे पर्वत, सूर्य, पाणी, देवप्रतिमा आणि राजकीय विधी हे सारे एका मोठ्या दृश्यनाट्याचे घटक असू शकतात.
याच कारणामुळे उदयगिरी भारतीय मंदिरांच्या इतिहासात एका संक्रमणबिंदूसारखी वाटते. यापूर्वी, भारतात बौद्ध आणि जैन शैलस्थापत्याची समृद्ध परंपरा विकसित झाली होती. पण, येथे हिंदू देवता, त्यांच्या पुराणकथा आणि त्यांच्याभोवतीची विश्वकल्पना प्रथमच इतक्या प्रभावीपणे समोर येताना दिसते. पुढे देवगड, बादामी, ऐहोळे, महाबलीपुरम्, वेरूळ आणि असंख्य मंदिरांमध्ये जी पुराणकथा दगडावर विशाल स्वरूपात प्रकटणार होती, तिच्या महत्त्वाच्या प्रारंभबिंदूंपैकी उदयगिरी एक आहे.
आज सांची पाहण्यासाठी हजारो पर्यटक या प्रदेशात येतात; पण त्याच सांस्कृतिक भूगोलात असलेल्या उदयगिरीकडे तुलनेने कमी लोक वळतात. प्रत्यक्षात सांची, बेसनगरचा ‘हेलिओडोरस’ स्तंभ, विदिशा आणि उदयगिरी ही स्वतंत्र ठिकाणे म्हणून न पाहता, भारतीय धर्म आणि कलेच्या दीर्घ प्रवासातील परस्परांशी जोडलेली पाने म्हणून पाहायला हवीत.
उदयगिरीला गेलात, तर केवळ गुहांची संख्या मोजू नका. गुहा क्रमांक पाचमधील वराहासमोर काही काळ शांत उभे राहा. त्याच्या सुळ्याजवळची भूदेवी पाहा, खाली वाकलेला नाग पाहा, सभोवती जमलेले देव आणि ऋषी शोधा आणि मग त्या विराट वराहाकडे पुन्हा एकदा पाहा.
कारण, आपल्या समोर केवळ विष्णू पृथ्वीला महासागरातून वर काढत नसतो. त्या दगडात एकाच वेळी पुराणकथा आकार घेत असते, सम्राटाची राजकीय कल्पना व्यक्त होत असते, विश्वाच्या पुनर्स्थापनेचे तत्त्वज्ञान सांगितले जात असते आणि भारतीय शिल्पकला देवांना व्यक्त करण्यासाठी आपली एक नवी भाषा शोधत असते.
कदाचित म्हणूनच, उदयगिरी ही केवळ गुप्तकालीन लेण्यांची टेकडी नाही, तर ती भारतीय मंदिरकलेच्या इतिहासातील तो विलक्षण क्षण आहे; जिथे दगडातून देवांना नवा आकार मिळू लागला.
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४