संघाच्या वैश्विक संपर्क अभियानाचा अंतिम टप्पा लंडनमध्ये; स्वागतासाठी ब्रिटनमधील ११५ हून अधिक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी सहभाग!

    06-Sep-2026   
 
RSS Global Outreach Campaign
 
मुंबई (RSS Global Outreach Campaign) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्तीच्या निमित्ताने संघ सध्या जगभरात संवाद आणि संपर्काचा विस्तार करत आहे. या जागतिक संपर्क अभियानाचा अंतिम टप्पा म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा दि. २ ते ७ सप्टेंबर दरम्यान लंडन दौरा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकारांना संबोधित केले.
 
सुनील आंबेकर म्हणाले, संघाच्या कार्याचा पाया ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भावना त्यामागे आहे. संघाच्या मते, समाजबांधणीची सुरुवात व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीपासून होते. २०२५-२६ च्या वार्षिक अहवालानुसार संघाने देशभरात १.५२ लाखांहून अधिक सेवा उपक्रम राबवले असून, त्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण, स्वावलंबन आणि विविध सामाजिक क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच देशभरात संघाच्या १.३४ लाखांहून अधिक नियमित स्थानिक बैठकांमध्ये दैनिक शाखा, साप्ताहिक आणि मासिक मिलनांचा समावेश आहे.
 
शताब्दी वर्षात संघाने जगभरातील विविध समाजघटक आणि संस्थांशी सभ्यतागत संवाद वाढवण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीचा दौरा करून लंडनमधील चॅथम हाऊस, अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ, हडसन इन्स्टिट्यूट आणि बर्लिनमधील धोरणविषयक संस्थांमध्ये संवाद साधला. या चर्चांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, खासदार, उद्योगपती, भारतीय वंशाचे नागरिक आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या संवादांमध्ये सभ्यतागत दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य आणि जागतिक आव्हानांवर सामूहिक उपाययोजनांवर चर्चा झाली. (RSS Global Outreach Campaign)
 
सरसंघचालकांच्या न्यूयॉर्क दौऱ्याविषयी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले, २९ ऑगस्ट रोजी अहेड संस्थेच्या निमंत्रणावर सरसंघचालकांनी बहुधर्मीय नेत्यांच्या परिषदेला संबोधित केले. विविध पंथ आणि धर्मांचे १७५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या यूनिवर्सल वननेस परिषदेत भाषण केले. या परिषदेत ६,००० हून अधिक प्रतिनिधी, अमेरिकेतील ३९ राज्यांतील ८५३ शहरांचे प्रतिनिधित्व, २५० संस्था, अमेरिकेतील विविध विद्यापीठांतील सुमारे २५० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या परिषदेत बहुधर्मीय नेत्यांनी पाच सूत्रीय कॉल ऑफ एक्शन ठरावही स्वीकारला. (RSS Global Outreach Campaign)
 
टोरंटो दौऱ्यादरम्यान कॉर्ड (CHORD) यांच्या निमंत्रणावर त्यांनी टोरोंटोमध्ये 'हिंदू विश्वबंधू' परिषदेला संबोधित केले. या परिषदेत कॅनडाच्या सर्व दहा प्रांतांतील २,००० हून अधिक प्रतिनिधी; १७५ संस्थांचे प्रतिनिधित्व होते. तर लंडन येथे होत असलेल्या त्यांच्या दौऱ्याचे समन्वयन ब्रिटनमधील इन्टेग्रल या संस्थेने केले आहे. ब्रिटनमधील विविध समुदाय आणि नेतृत्वामध्ये संवाद, सहकार्य आणि दीर्घकालीन संबंध दृढ करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या दौऱ्याच्या स्वागतासाठी ब्रिटनमधील ११५ हून अधिक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. दौऱ्यादरम्यान डॉ. भागवत विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांशी संवाद साधत असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.
 
अमेरिकेतून कॅनडामार्गे ब्रिटनपर्यंतच्या या शताब्दी संपर्क अभियानातून डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाचा निःस्वार्थ सेवा, सामाजिक समरसता आणि वसुधैव कुटुंबकम् या भारतीय जीवनदृष्टिकोनाचा संदेश जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा दौरा केवळ संघाच्या शताब्दी वर्षाचा उत्सव नसून, भारतीय सभ्यतेच्या मूल्यांवर आधारित जागतिक संवादाचा विस्तार म्हणूनही पाहिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. (RSS Global Outreach Campaign)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर