प्रर्वाश्रमीच्या रेखा काळे आणि आजच्या मुग्धा शेखर यांचे ‘कोलाज’ हे पुस्तक वाचताना एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा मारत असल्याचा अनुभव येतो. नाशिकमधील रचना विद्यालय आणि भियक्ष महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संसाराच्या निमित्ताने त्या गोव्यात स्थायिक झाल्या. संसार सुरळीत सुरू असतानाच, त्यांच्या मनात लेखनाची ओढ जागी झाली. मात्र, आपण लिहिलेले कोण छापेल? हा प्रश्न त्यांच्या मनात होता. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या मैत्रीण दीपा मिरिंगकर यांनी दिले. त्यांच्या माध्यमातून ‘गोवन वार्ता’चे उपसंपादक प्रसन्न बर्वे यांच्याशी परिचय झाला. ‘तुम्ही लिहा, मी छापतो,’ या विश्वासपूर्ण शब्दांनी त्यांच्या लेखनप्रवासाची सुरुवात झाली. पहिला छोटासा लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आणि त्या क्षणाचा आनंद त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.
याच लेखनप्रवासाचे पुढे ‘कोलाज’ या पुस्तकात रूपांतर झाले. वयाची साठी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो. आठवणी जाग्या होतात, अनुभव नव्याने उमलतात. पण, त्या आठवणी केवळ मनात न ठेवता, त्यांना शब्दरूप देण्याची कला मुग्धा शेखर यांनी साधली आहे. म्हणूनच, हे पुस्तक केवळ आत्मकथन राहत नाही, तर ते प्रत्येक वाचकाच्या आयुष्याशी जोडले जाते.
या पुस्तकातील लेखांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील साधेपणा आणि चिंतनशीलता. दैनंदिन जीवनातील अगदी सामान्य प्रसंग त्या अशा पद्धतीने मांडतात की, वाचकाला त्या अनुभवांमधून नवे अर्थ सापडतात. अलेझांडर ग्रॅहम बेल यांच्या टेलिफोन शोधामागील कल्पना असो, विमानातील आपत्कालीन दरवाजाजवळ बसण्याचा प्रसंग असो किंवा प्रवासातील गमती-जमती असोत, प्रत्येक विषयाकडे त्या वेगळ्या नजरेने पाहतात. गंभीर विषयही त्यांच्या लेखणीतून हलया विनोदाची झालर घेऊन येतो.
लहानपणी प्रथमच साडी नेसण्याची ओढ, त्यातून आलेले अनुभव, स्त्री आणि साडीचे भारतीय संस्कृतीतील स्थान व एका वयात आलेल्या मुलीने सर्वप्रथम कोणासही न सांगता साडी परिधान करण्याचा प्रसंग, याचे त्यांनी केलेले वर्णन अतिशय सुंदर आहे. मुलांबद्दलच्या भावना, आई-मुलाच्या नात्यातील जिव्हाळा, संसारातील क्षण, नातेसंबंधांचे सूक्ष्म पैलू हे सर्व त्यांनी अत्यंत सहज आणि हृदयस्पर्शी शब्दांत मांडले आहेत.
विशेष उल्लेख करावा असा एक लेख म्हणजे, लहानपणी गंगाघाटावर हरवण्याचा प्रसंग. त्या प्रसंगाचे वर्णन केवळ आठवण म्हणून राहत नाही, तर पालकांनी मुलांकडे अधिक सजगतेने लक्ष द्यावे, असा मोलाचा संदेशही त्यातून मिळतो. अशा अनेक अनुभवांमधून वाचक नकळत स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग आठवू लागतो, हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.
‘कोलाज’ हे शीर्षकही अत्यंत समर्पक. जसे विविध चित्रांचे एक सुंदर कलात्मक संकलन म्हणजे ‘कोलाज’, तसेच जीवनातील विविध अनुभव, आठवणी, भावना, प्रसंग आणि चिंतन यांचे हे शब्दचित्र आहे. प्रत्येक लेख स्वतंत्र असला, तरी सर्व लेख मिळून जीवनाचे सुंदर चित्र उभे करतात.
हे पुस्तक वाचताना लेखकाला आनंद झाला, यापेक्षा वाचकाला मिळणारा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतो. वाचन संपल्यावर अनेक प्रसंग मनात रेंगाळतात. आपणही आपल्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहू लागतो. हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात फुलांच्या गुच्छांऐवजी किंवा इतर औपचारिक भेटवस्तूंऐवजी एखादे चांगले पुस्तक भेट देण्याची संस्कृती वाढू लागली आहे. त्यादृष्टीने ‘कोलाज’ हे अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण भेटपुस्तक ठरू शकते. प्रत्येक घरात, प्रत्येक वाचनप्रेमीच्या संग्रहात असावे, असे हे पुस्तक आहे.
मुग्धा शेखर यांनी आपल्या पहिल्याच पुस्तकातून संवेदनशील लेखिका म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील लेखनप्रवासाकडूनही अशाच दर्जेदार, विचारप्रवर्तक आणि मनाला स्पर्श करणार्या साहित्यकृतींची अपेक्षा आहे.
मुग्धा शेखर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव : कोलाज
लेखक : मुग्धा शेखर
प्रकाशक : बिम्ब प्रकाशन, गोवा
पृष्ठसंख्या : २१८
मूल्य : रु. २००/
शरद जाधव
९४२२७६१६९९