स्वामी विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष ए. बालकृष्णन यांची दि. २७ ऑगस्ट रोजी प्राणज्योत मालवली. विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या पहिल्या तुकडीत सहभागी झालेल्या बालकृष्णनजींनी एकनाथजी रानडे यांच्या प्रेरणेने प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशात विशेषकरुन शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले.आपले संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्व आणि मानवसेवेच्या संदेशाच्या प्रसारासाठी, तसेच राष्ट्र आणि समाजसेवेसाठी समर्पित केलेल्या, कर्मयोगी बालकृष्णनजी यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
१९७०च्या दशकात अनेक मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आव्हानांना तोंड देत, एका राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू होते. जिथे स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले, त्या शिलेवरती त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य राष्ट्रीय स्मारक निर्माण होत होते. स्मारकाचे प्रेरणास्रोत एकनाथजी रानडे यांच्या मनात असा विचार आला की, हे तर स्वामी विवेकानंदांचे दगडामधले स्मारक. पण, स्वामी विवेकानंदांचे खरे स्मारक उभे करायचे, तर स्वामी विवेकानंदांचा विचार मनात ठेवून त्याप्रमाणे जीवन जगणारे हजारो युवक निर्माण करणे आवश्यक आहे. हे स्वामी विवेकानंदांचे खरे स्मारक होईल. म्हणून, कन्याकुमारी येथील स्मारकनिर्मितीनंतर लगेचच त्यावेळच्या पेपरमध्ये जाहिरात देऊन स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुणांचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली. यामध्येच भारतीय हवाई दलामध्ये कार्यरत एका तरुणाने या मार्गावर चालण्याची इच्छा व्यक्त केली. आपली हवाई दलातील सेवा सोडून ‘मनुष्यनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ या कार्यात हा तरुण सहभागी झाला. ए. बालकृष्णन असे या तरुणाचे नाव!
बालकृष्णनजींचे राष्ट्रीय जीवनात सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे, ‘विवेकानंद केंद्रा’च्या माध्यमातून पूर्वांचलला विशेषतः अरुणाचलला या देशाच्या भावविश्वाशी जोडणे. ज्यावेळी एकनाथजी यांच्या सूचनेनुसार पूर्वांचलात काम सुरू केले, ते १९७० ते ८० या दशकात. त्यावेळी तिथे रस्ते नव्हते, संपर्काची साधने नव्हती. बालकृष्णनजी यांनीच मला सांगितले, एकदा एका शाळेची जागा बघण्यासाठी ते शिलाँगहून सात दिवस चालत ती जागा बघायला गेले. अरुणाचलमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, तेथील समाज उन्नत अवस्थेत यावा, यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले. ते गावोगाव फिरले, त्याचा परिणामस्वरूप आज अरुणाचल व आसाममध्ये ‘विवेकानंद केंद्र विद्यालय’ हा एक परवलीचा शब्द झाला आहे. ४५ शाळांच्या माध्यमातून अरुणाचलमध्ये कायापालट झाला आहे. याच शाळांमधून आतापर्यंत १५ सनदी अधिकारी (‘आयएस’ ऑफिसर), शेकडो डॉटर्स, शेकडो इंजिनिअर्स, अनेक सेना अधिकारी तयार झाले आहेत. हे सारे स्वामी विवेकानंदांच्या ‘शिक्षण’ या विषयावरील चिंतनातून निर्माण झालेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आहेत.स्वामी विवेकानंद म्हणतात, Education is the manifestation of the perfection within the man.- विवेकानंद केंद्र विद्यालय (व्हीकेव्ही). हा जणू ‘तिळा दार उघड’सारखा मंत्र झाला आहे, जो अरुणाचलमधील कुठलाही दरवाजा आपल्यासाठी उघडतो.
त्यावेळी शाळा व्यवस्थापनासाठी कुठलेही सॉफ्टवेअर नव्हते वा कुठलीही पद्धत नव्हती. बालकृष्णनजींनी स्वतः सुरुवातीच्या सात शाळांचे ‘कॅशबुक’ लिहिले होते. त्यातूनच शाळांच्या व्यवस्थापनासाठी एक पद्धत विकसित झाली, जी आजतागायत विवेकानंद केंद्र विद्यालयाची विशेष ओळख झाली आहे. या व्यवस्थापकीय कौशल्याबरोबर तिथे हे सारे सांभाळेल अशी कार्यकर्त्यांची पुढची पिढी निर्माण केली. निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य, घेतलेल्या निर्णयामागे ठामपणे उभे राहणे, त्याची काळजी घेणे; समर्थांच्या भाषेत ‘सलगी देणे’ या शब्दातून कार्यकर्ता निर्माण याची प्रक्रिया सुरू राहिली. विपरीत स्थितीमध्येसुद्धा काम करणार्या कार्यकर्त्यांची पिढी बालकृष्णनजी यांनी घडवली.
त्यांच्या हृदयात अरुणाचलबद्दल एक विशेष जिव्हाळा होता. अरुणाचलनेही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. २०१४ मध्ये अरुणाचल सरकारने ‘अरुणाचल मित्र’ या पुरस्काराने गौरविले. साधारण १५ ते २० दिवसांपूर्वी तवांग जिल्ह्यातील चीनच्या सरहद्दीवरील एका गावात बालकृष्णनजींच्या तब्येतीसाठी एका धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. ज्याच्यामध्ये विवेकानंद केंद्रीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी, अरुणाचल सरकारचे अधिकारी, बौद्ध धर्मांचे लामा यांनी भाग घेतला होता. कुठे चीनची सरहद्द, कुठे कन्याकुमारी; पण कन्याकुमारीमध्ये आजारी असलेल्या माणसाच्या बरे होण्यासाठी काही हजार मैल दूर असलेल्या ठिकाणाहून प्रार्थना चालू होती. राष्ट्रीय एकात्मतेचे याहून वेगळे परिमाण काय असू शकते.
बालकृष्णनजी यांच्यावर १९८१ साली विवेकानंद केंद्राचे ‘महासचिव’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. १९९२ साली स्वामी विवेकानंद यांच्या भारतभ्रमणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मोठ्या उपक्रमाची आखणी बालकृष्णनजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्वामी विवेकानंदांनी ज्या मार्गाने भारतमातेचे दर्शन घेत कलकत्ता ते कन्याकुमारी असे भ्रमण केले होते, त्याच मार्गाने स्वामी विवेकानंदांचा ‘मनुष्यनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचा’ संदेश प्रसारित करत व ‘मानव सेवा हीच माधव सेवा आहे’ हा सेवेचा संदेश पूर्ण भारतात प्रसारित करण्याचा हा उपक्रम होता. ‘विवेकानंद भारत परिक्रमा’ असे या उपक्रमाचे नाव होते. या उपक्रमामुळे विवेकानंद केंद्राच्या कामाचा विस्तार झाला.
बालकृष्णनजी यांच्या कामाची पद्धत थोडी वेगळी होती. मंचावरून बौद्धिक न देता सात्त्विक प्रेमाने कार्यकर्ता निर्माण करणे, त्याच्या सुप्तशक्तीला आवाहन करणे, जबाबदारी देत-देत कार्यकर्ता घडवणे, त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलेसे करणे, निर्व्याज प्रेम देणे अशा अनेक गोष्टींनी त्यांच्यातील संघटक काम करत असे. आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते निर्माण करणे त्यांना सहजशय झाले. प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड कार्यशक्ती, न थकता, न कंटाळता सतत कार्यरत राहणे, खर्या अर्थाने ते ‘कर्मयोगी’ होते. शेवटच्या दिवसापर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या केवळ सहवासानेही कार्यकर्ते प्रेरित व्हायचे. १९८१ ते २००१ या कालावधीत विवेकानंद केंद्राचे ‘महासचिव’ म्हणून ते मार्गदर्शन करत. नंतर २००१ ते २०२० या कालावधीत त्यांच्याकडे ‘राष्ट्रीय उपाध्यक्ष’ अशी जबाबदारी आली. २०२० पासून अगदी आजपर्यंत विवेकानंद केंद्राचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ अशी जबाबदारी त्यांच्याकडे होती.
डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर व पायाला भिंगरी अशी आदर्श कार्यकर्त्यांची व्याख्या त्यांना बघूनच केली की काय, असे वाटावे. २४ तास या राष्ट्राच्या विविध समस्या आणि त्यावर विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल, याचा विचार सतत चालू असे.
बालकृष्णनजी यांनी गेली ५३ वर्षे विवेकानंद केंद्राचे नेतृत्व केले. आज पूर्ण भारतात २५ राज्यांत चार केंद्रशासित प्रदेशात एक हजारहून अधिक शाखांच्या माध्यमातून व शेकडो प्रकल्पांच्या माध्यमातून आर्त विपन्न सेवेचे काम चालू आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला बलसंपन्न, आत्मनिर्भर भारत, सार्या जगाला एकत्वाची जाणीव देणारा भारत निर्माण करण्यासाठी बालकृष्णनजी यांनी आपले आयुष्य वेचले.
केंद्र प्रार्थनेमध्ये ‘जीवने यावंदादानं स्यात प्रदानं ताताडधिकम’ अशी ओळ आहे. अर्थात, जीवनात समाजाकडून जे आपल्याला मिळालेले आहे, त्यापेक्षा अधिक समाजाला दिले पाहिजे; हाच सफलतेचा आणि सार्थकतेचा मार्ग आहे, असे सांगितले आहे. बालकृष्णनजी असेच जीवन जगले. आपल्या सार्यांना जीवन कसे जगावे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्याच मार्गाने आपले जीवन सार्थक व्हावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ओम शांती!
अभय बापट
(लेखक विवेकानंद केंद्र महाराष्ट्र व गोवाचे प्रांत प्रमुख आहेत.)