‘आदिवासी स्कूल ठीक करो’च्या आड!

    20-Sep-2026

Abhijit Dipke Adivasi School Thik Karo
 
झुरळ अभिजीत दीपकेने गडचिरोलीमध्ये ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ आंदोलन नुकतेच सुरू केले आहे. अनेकांना वाटेल की, यानिमित्ताने आदिवासी शाळांच्या समस्या देशासमोर येतील. पण, राजधानी दिल्लीतल्या चकाचौंध दुनियेतून दीपके थेट कधीकाळी नक्षलप्रवण असलेल्या भामरागडमध्ये का तळ ठोकला असेल, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखात केला, तेव्हा जाणवले की, हे प्रकरण दिसते तितके साधे नाही. तसेच ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियानाऐवजी दीपकेने किमान स्वतःसाठी ‘कुविचार वर्तन ठीक करो’ हे अभियान सुरू करावे!

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत होणार्‍या भेदभावाविरोधात आंदोलन करत आहोत, असा आव आणत अभिजीत दीपके नुकताच गडचिरोलीमध्ये गेला. आदिवासी शाळांमधील दुरवस्थांबद्दल म्हणे तो प्रश्न विचारतोे. गॅस सिलिंडर उपलब्ध नाही, म्हणून चुलीवर स्वयंपाक शिजत असलेल्या एका शाळेचा फोटो-माहिती त्याने सोशल मीडियावर टाकली. त्याला म्हणे दुःख वाटले, संताप आला की आदिवासी भागात सिलिंडर नाही. म्हणून शाळेत चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. हा भेदभाव का? आता काही लोकांना त्याचा प्रश्न रास्त वाटूच शकतो. पण, भामरागडमध्ये ही परिस्थिती का आली असेल, याचा अभ्यास तर सोडाच, साधा विचारही त्याने केला का? अभिजीत दीपकेची कार्यपद्धती पाहिली की वाटते, त्याने सरकारविरोधात, प्रशासनाविरोधात, समाजाविरोधात आणि देवधर्माविरोधात कितीही विवाद उकरून काढले, तरीसुद्धा लोक त्याला आता बधणार नाहीत. कारण, भारत सोडून परदेशात राहायला गेलेल्या दीपकेचे हे मगरीचे अश्रू आणि पुतना मावशीचे प्रेम आहे. ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ आंदोलनात त्याला केवळ आणि केवळ आदिवासी समाजामध्ये ‘नॅरेटिव्ह’ पसरवायचे आहे का, की हे सरकार, हे प्रशासन आणि पुण्या-मुंबईसारख्या शहरांत राहणार्‍या समाजाशी आदिवासी समाजाचा काही संबंध नाही? हे सरकार, हे प्रशासन आदिवासी समाजाच्या विरोधात आहे, हेच त्याला सांगायचे आहे का? आता अनेकजण म्हणतील की, सरकार प्रशासनाविरोधात आवाज उठवणार्‍या किंवा त्रुटी काढणार्‍या सगळ्यांनाच समाजद्रोही ठरवणे चूक आहे. अर्थात, हे म्हणणे बरोबर आहे. पण, अभिजीत दीपकेचे वागणे असेच आहे.
 
इथे आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाची किंवा कोणत्याही सरकारी मंत्री-संत्री अधिकार्‍याचे समर्थन अजिबात करायचे नाही; पण सत्य सांगणेही गरजेचे. हे तेच भामरागड आहे, जिथे काही वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हैदोस घातला होता. या परिसराचा संपर्क इतर जगाशी होऊ नये, म्हणून नक्षली इथे रस्ता-वीज या सुविधा येऊच देत नव्हते. प्रशासनाने रस्ते बांधायला घेतले की सरळ ‘डायनामाईट’ लावून तो परिसरच उडवून दिला जायचा. कामं करू पाहणार्‍या कंत्राटदाराचा आणि त्या कंत्राटदाराला मदत करणार्‍या गावकर्‍यांचा सामूहिक नरंसहार नित्याचा होता. त्यामुळे इथे कधीच रस्ते-वीज आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या नाहीत. आता प्रश्न उपस्थित होतो की, दीपकेच्या ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ आंदोलनाचा आणि या नक्षली कारवायांचा संबंध काय? तर, संबंध असा आहे की, नक्षल्यांनी सातत्याने गडचिरोलीला त्यांचा गड बनवण्यासाठी हिंसक कारवाया केल्या. तिथल्या आदिवासी बांधवांचा संपर्क बाहेरच्या जगाशी येऊच नये, यासाठी षड्यंत्र रचले. आधुनिक जगाचा कोणताच विकास इथे होऊ दिला नाही. कारण तो संपर्क झाला, तर आदिवासी समाजाचा बाहेरच्या जगाशी संबंध येईल. मग भोळे आदिवासी हुशार होतील आणि ते नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. नक्षल्यांच्या या षड्यंत्रामुळे गडचिरोलीचा विकास मागेच राहिला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा विकास करण्याचा विडा उचलला आणि नक्षल्यांना न जुमानता तिथे विकासकामं सुरू झाली. शाळा, रस्ते, वीज वगैरेंची निर्मिती झाली. थोडक्यात, स्वातंत्र्यानंतरही नक्षल्यांमुळे तब्बल ७० वर्षे तरी विकासापासून दूर राहिलेला गडचिरोली परिसरामध्ये विकासकामे सुरू झाली. भामरागडच्या त्या दुर्गम भागात आता कुठे रस्ते पोहोचत आहेत, तिथे गॅस सिलिंडर वगैरे वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. स्थळ-काळ-वेळेचे गणित आहे. हे सगळे सत्य आहे. मात्र, अभिजीत दीपकेने हे सगळे सत्य सोयीस्करपणे दुर्लक्षित करत, "आदिवासी शाळांमध्ये वेळेत गॅस सिलिंडर का पोहोचत नाही,” हा प्रश्न विचारला. पण, दीपके नक्षल्यांचे षड्यंत्र हिंसक कारवाईमुळे भामरागडची दुर्दशा झाली, हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करतो. त्याबद्दल तो अवाक्षर काढत नाही. उलट, आता आता सुरू झालेल्या प्राथमिक स्तरावर सुरू असलेल्या सुविधांवर प्रश्न विचारत आहे. हे संशयास्पद आहे.
 यावर असेही वाटते की, भामरागड गडचिरोलीमध्ये लोकशाही आणि प्रशासनाविरोधात, समाजाविरोधात विघातक विचार पेरणार्‍या नक्षल्यांचा खातमा होत आहे. इथली जनता भयमुक्त होऊन विकासाच्या दिशेने जात आहे. असे असताना, जनतेमध्ये सरकार-प्रशासनाविरोधात द्वेष पसरवला जात आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आंदोलनजीवी’ आणि ‘दिमागी नक्षली’ हे शब्द काही लोकांबद्दल वापरले होते. तर असे काही ठरावीक आंदोलनजीवी लोक आहेत. जे कुठे काही खुट्ट झाले की पीडितांच्या जाती-पाती शोधत समाजात द्वेष पसरवतात, दुही पेटवतात. या परिक्षेपात दीपकेचा बिनबुडाचा आक्षेप पाहू. तो म्हणतो, "मुंबई-पुण्यामध्ये जर विद्यार्थी मेले असते, तर किती वादळ उठले असते; मात्र आदिवासी विद्यार्थी वारले, म्हणून जास्त लक्ष दिले नाही!” शहरी भाग आणि आदिवासी भाग या दोघांमध्ये दीपकेला द्वेष माजवायचा आहे का? गडचिरोलीमध्ये जाऊन दीपके आदिवासी शाळांचीच पाहणी करतो. याच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे. ते कारण तेव्हा स्पष्ट झाले, जेव्हा दीपकेने ‘महाराष्ट्र शासन आदिवासी विकास’ विभाग आणि एका ट्रस्टमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा नकली कागद फाडला. त्याने आरोप केला की, सरकारने या ट्रस्टला ४९० आदिवासी शाळांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी दिली. पण, हे सत्य आहे का? दीपकेचा याला विरोध का आहे? मुळात, या कराराबाबत शासनाने स्पष्ट केले की, वसतिगृहांचे रोजचे नियंत्रण, भोजन, सुरक्षा किंवा आर्थिक व्यवस्थापन ट्रस्टकडे सोपवलेले नाही. हा करार केवळ विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासापुरता मर्यादित आहे. विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी या करारातील तरतुदी सांगितल्या की, "आदिवासी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक उपक्रम राबवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी या ट्रस्टची मदत घेतली जाणार आहे. या ट्रस्टकडे शाळांबाबत कोणतेच व्यवस्थापन हस्तांतरण होणार नाही.” थोडक्यात, दीपके जे ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ नावाचे अभियान राबवित आहे, ते अभियान यापूर्वीच राज्य शासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून सुरू केले आहे. पण, राज्य शासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी जर आदिवासी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे कौशल्य दिले, तर विद्यार्थी सक्षम होतील. मग त्यांना भीती दाखवून सरकारविरोधात, समाजाविरोधात आपण वापरू शकणार नाही; ‘जल-जंगल-जमीन’च्या नावाने त्यांना सरकार प्रशासन आणि समाजाविरोधात उभे करू शकणार नाही; समाजात देशात अस्थिरता पसरवू शकत नाही, याची खंत-सल काही विघातक विचारांच्या लेाकांना आणि संघटनांना आहे. त्यामुळे सरकारने या ट्रस्टशी केलेल्या कराराबद्दल त्यांना भयंकर राग-द्वेष आणि खर्‍या अर्थाने भीती आहे. या आयामात दीपकेचा सरकार आणि या ट्रस्टच्या कराराला विरोध का? आदिवासी विद्यार्थ्यांनी जीवनकौशल्य शिकूच नये, असे त्याला का बरं वाटत असावे?
 
दुसरीकडे त्याचे म्हणणे आहे की, हे शासनाने ज्या ट्रस्टशी करार केला, ते ट्रस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे आहे आणि त्यामुळे या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर एकाच विचारांचे संस्कार होतील. काय म्हणावे? दीपकेच्या ‘झुरळ पार्टी’चे ‘जंतरमंतर’वरचा ‘नीट’ परीक्षेच्या आड ‘मेरा लिंग मेरी मर्जी’चा नंगानाच जगाने पाहिला. लहान मुलांचा वापर करत त्यांच्याकरवी अश्लील कृत्य आणि अतिशय आक्षेपार्ह शिवीगाळ तिथे झाली. दीपकेच्या मते, ते संस्कार आहेत का? ‘आदिवासी स्कूल ठीक करो’च्या आड दीपकेला त्याचे हेच ‘झुरळ पार्टी’चे संस्कार आदिवासी विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत का? 
असो. समाजात आज अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था आहेत. त्यांनी पदरमोड करून आदिवासी पाड्यातल्या बांधवांचे जगणे समाजाच्या प्रवाहात आणलेे. त्यांनी भोळ्या आदिवासींच्या हातात शस्त्र दिले नाही, तर त्यांना जगण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व उभे करण्याचे बळ दिले. "तुम्हाला अमूक मिळत नाही; त्या दुसर्‍याला कसे मिळते? त्याच्याकडे अमूक आहे तुमच्याकडे का नाही?” अशा प्रकारे आदिवासी बांधवांना चिथावणी न देता, उलट त्यांच्या अंगभूत कौशल्यांना आणि जीवनशैलीला संवर्धित करत, त्यांचा विकास करणारे लोक आणि संघटना आजही आहेत. त्यांनी "हक्क मिळवून देतो,” म्हणत आदिवासी बांधवांना सरकार किंवा समाजाविरोधात भडकावले नाही किंवा त्यांना हिंसेच्या मार्गावर, अनैतिकतेच्या मार्गावर नेले नाही. समाजात आदिवासी बांधवांसाठी काम करणारे असे अनेक निस्वार्थी लोक आहेत. वनवासी कल्याण आश्रमासह संघ परिवारातील कित्येक संस्था, हजारो स्वयंसेवक आदिवासींच्या हितासाठी, त्यांचे धर्मांतरण रोखण्यासाठी नेटाने कार्यरत आहेत. पण, ‘झुरळ पार्टी’च्या अभिजीत दीपकेला हे असे निस्वार्थी लोक आणि संघटना दिसणार तरी कशा म्हणा? शेवटी झुरळच ते! चांगल्यापेक्षा घाणीतच फिरणार! पण, दीपकेने कितीही घाणीचा शोध घेतला, तरी ती त्याची वैयक्तिक आवड आहे. मात्र, समाजाची सज्जनशक्ती सर्व प्रकारच्या विघातक घाणीपासून नेहमीच दूर राहत आहे. त्यामुळे ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ऐवजी दीपकेने किमान स्वतःसाठी आणि त्याच्या समविचारी लोकांसाठी ‘कुविचार वर्तन ठीक करो,’ हे अभियान राबवायला हवे.
 
लेखिका- योगिता साळवी




संबंधित मजकूर