मुंबई (Mumbai Contract Sanitation Workers) : मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या हजारो सफाई कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसह मानधनात वाढ, नोकरीची सुरक्षा आणि आरोग्याच्या पुरेशा सुविधा मिळाव्यात, यासाठी आगामी दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर भव्य लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
याबाबतची अधिकृत नोटीस दि. ११ सप्टेंबर रोजीच महापालिका आयुक्त आणि कामगार आयुक्तांना पाठवण्यात आली आहे.मागासवर्गीय आणि वंचित घटकातील कामगारांची संख्या अधिकमुंबई महापालिकेत रस्ते सफाई, कचरा वाहतूक, डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण (गटार सफाई) यांसारख्या अत्यंत कठीण व जोखमीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांमध्ये बहुतांश संख्या ही अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच वंचित घटकातील कामगारांची आहे. (Mumbai Contract Sanitation Workers)
कामगारांच्या प्रमुख मागण्या
१. समान काम, समान वेतन: महापालिकेच्या कायमस्वरूपी सफाई कामगारांइतकेच काम कंत्राटी कामगारही करतात, त्यामुळे त्यांनाही मूळ कर्मचार्यांप्रमाणेच वेतन आणि भत्ते मिळावेत.
२. नोकरीची सुरक्षा आणि कंत्राटी पद्धत बंद: वर्षानुवर्षे काम करणार्या कामगारांना थेट पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे किंवा कंत्राटदारांची मध्यस्थी बंद करून थेट पालिकेमार्फत वेतन दिले जावे. (Mumbai Contract Sanitation Workers)
३. दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान: आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कंत्राटी कामगारांना सन्मानजनक बोनस जाहीर करावा.
४. सुरक्षा साधने आणि विमा: आरोग्याला घातक ठरणार्या कचरा उपशाच्या कामात कामगारांना दर्जेदार गमबूट, हातमोजे, मास्क आणि ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा पुरवण्यात यावा.राज्य सरकारने ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील ‘बेस्ट’च्या कंत्राटी बस चालकांसाठी ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन केली आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या सफाई कामगारांचाही विचार व्हावा, अशी मागणी कामगारांनी लावून धरली आहे. (Mumbai Contract Sanitation Workers)
तोडगा काढण्यासाठी २१ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक
आझाद मैदानावरील या संभाव्य आंदोलनामुळे मुंबईतील कचरा व्यवस्थापन आणि नागरी स्वच्छता कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तोडगा काढण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार, आगामी २१ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिका वरिष्ठ अधिकारी, कामगार आयुक्त आणि प्रमुख कामगार संघटनांच्या नेत्यांची एक विशेष तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्यास २३ सप्टेंबरचा आझाद मैदानावरील एल्गार निश्चित असून, गरज पडल्यास हे आंदोलन बेमुदत संपाचे रूप धारण करू शकते, असा इशारा कामगारांनी दिला आहे. (Mumbai Contract Sanitation Workers)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.