उपराष्ट्रपतींच्या हस्ते 'ए सेंच्युरी ऑफ सर्विस' पुस्तकाचे प्रकाशन

    17-Sep-2026   
 
A Century of Service
 
मुंबई (A Century of Service) : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात तेलंगणाच्या माजी राज्यपाल आणि पुदुच्चेरीच्या माजी उपराज्यपाल डॉ. तमिळिसाई सौंदर्यराजन लिखित 'ए सेंच्युरी ऑफ सर्विस-द आरएसएस इन १०० एक्ट ऑफ सेवा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या सेवाकार्याची, सामाजिक बांधिलकीची आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची नोंद करणारे महत्त्वाचे दस्तावेज आहे.
 
उपस्थितांना संबोधित करताना पुढे ते म्हणाले, या पुस्तकातून सेवेची भावना कालांतराने व्यापक सामाजिक कार्यात कशी रूपांतरित झाली, हे स्पष्ट होते. 'सेवाच धर्म आहे, ती कर्तव्य आहे,' या मूलभूत आदर्शाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, संघाचे सेवाकार्य गरीब, वंचित, समाजाच्या विविध घटकांपर्यंत तसेच कामगार, महिला आणि बालकांपर्यंत पोहोचले आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात अन्न, औषधे आणि अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात स्वयंसेवकांनी बजावलेल्या भूमिकेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. (A Century of Service)
 
पुस्तकातील 'चरित्रनिर्माणातून राष्ट्रनिर्माण' या संकल्पनेचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की, राष्ट्रनिर्मितीसाठी देशभक्ती, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे पुस्तक केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवाकार्याची नोंद ठेवणारे नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी भारतातील सेवा परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपराष्ट्रपतींनी डॉ. तमिळिसाई सौंदर्यराजन तसेच पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करत इतिहासाची नोंद करणारे असे आणखी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. (A Century of Service)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर