समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तींचे मोठेपण त्यांच्या कृतीत असते. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून स्वतःचे आयुष्य घडवताना असंख्य लोकांचे आयुष्य समृद्ध करणारे कै. शांताराम महादेव धुरी हे अशाच तेजस्वी कर्मयोग्यांपैकी एक. वसईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आधारस्तंभ, स्वदेशी उद्योजक, आणि निरपेक्ष समाजसेवक अशी त्यांची बहुआयामी ओळख असली, तरी त्यांच्या प्रत्येक कार्यामागे संघातून मिळालेली राष्ट्रनिष्ठा आणि समाजऋण फेडण्याची अखंड तळमळ होती.
कष्ट, निष्ठा आणि समाजऋणाच्या अढळ ध्येयाने वसईच्या मातीतून उमललेला एक महान जनसेवक; कै. शांताराम महादेव धूरी!
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥
(श्रीमद्भगवद्गीता - श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात, इतर लोक त्याचेच अनुकरण करतात.)
अनवाणी पायांना डांबराचे चटके बसत होते. मराठी चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी खिशात फी नव्हती. पारतंत्र्याच्या काळातील ही कहाणी अनेक सामान्य मुलांची असू शकते; पण याच संघर्षाच्या धगीतून घडलेले व्यक्तिमत्त्व पुढे वसईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विश्वासार्ह आधारस्तंभ ठरले. ते म्हणजे कै. शांताराम महादेव धुरी. दि. २५ सप्टेंबर १९२५ रोजी कोकणात जन्मलेल्या शांतारामजींनी आयुष्यभर राष्ट्रकार्य, समाजसेवा आणि संघनिष्ठा यांचा अद्वितीय संगम घडवला. ३ मार्च २०१० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला; मात्र त्यांनी उभा केलेला संस्कारांचा वारसा आजही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे.
१९४२ हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक होते. त्याच काळात अवघ्या सतराव्या वर्षी शांताराम धुरी यांनी वसईतील नवघर गावातील पहिले स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत प्रवेश केला. शाखेने त्यांना केवळ संघटनशिस्त शिकवली नाही, तर समाजाला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे मानण्याची दृष्टी दिली. शाखेतील प्रार्थना, बौद्धिक वर्ग, दैनंदिन शिस्त आणि कार्यकर्त्यांमधील आत्मीयता यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. पुढे ते वसईतील संघकार्याचे आधारवड बनले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयामागे संघातून रुजलेले 'स्वतःपेक्षा समाज मोठा' हे मूल्य स्पष्टपणे दिसून येत असे.
रेल्वे स्टेशनसमोरचे त्यांचे साधे जनरल स्टोअर्सचे दुकान पुढे वसईतील राष्ट्रकार्याचे अनौपचारिक कार्यालय बनले. ठाणे किंवा मुंबईहून जनसंघाचा एखादा कार्यकर्ता वसईत आला, तर त्याला एकच सूचना मिळायची— "स्टेशनसमोरील धुरींच्या दुकानात जा; तुझी सर्व कामे होतील." हे वाक्य केवळ दिशादर्शक नव्हते; तर धुरींनी कमावलेल्या विश्वासाचे प्रतीक होते. त्या दुकानात चहाचा कप, मुक्कामाची व्यवस्था, कार्यकर्त्यांसाठी संपर्क, पत्रव्यवहार, बैठकांचे नियोजन आणि आवश्यक ती मदत सर्व काही सहज उपलब्ध असे. संघाच्या कार्यकर्त्यांसाठी ते दुकान म्हणजे आपलेपणाचा आश्रय होता.
संघातून घडलेली राष्ट्रभावना केवळ शाखेपुरती मर्यादित राहिली नाही. कच्छ आणि दीव-दमण मुक्ती आंदोलनात त्यांनी स्व. गजानन गोविंद गवाणकर यांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला आणि कारावासही भोगला.
पुढे १९७५ च्या आणीबाणीच्या काळात जेव्हा वृत्तपत्रांवर बंदी होती आणि नेते तुरुंगात होते, तेव्हा शांताराम धुरी यांनी क्रांतीकारकासारखे काम केले. सत्याग्रहींच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे, जेवण पुरवणे आणि ॲड. एफ. जे. गेर यांच्या माध्यमातून वकीलांची सोय करून कार्यकर्त्यांना सोडवणे, ही कामे त्यांनी अत्यंत निष्ठेने केली. पुढे १९७५ मध्ये देशावर आणीबाणी आली. वृत्तपत्रांवर निर्बंध आले, विरोधी नेते तुरुंगात गेले आणि लोकशाहीचा श्वास कोंडला गेला. अशा काळात शांताराम धुरी यांनी शांतपणे पण अत्यंत धाडसी पद्धतीने संघकार्य सुरू ठेवले.
त्यांनी सत्याग्रहींच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, ॲड. एफ. जे. गेर यांच्या माध्यमातून वकील उपलब्ध करून दिले, अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी समन्वय साधला. त्यांच्यासाठी संघकार्य म्हणजे जीवनशैली होती. संघाने त्यांच्या मनात स्वदेशीचा संस्कार रुजवला होता. लहानपणी मामा वामन विश्राम सावंत यांच्याकडून त्यांनी सुतारकाम शिकले. द्वितीय महायुद्धाच्या काळात त्यांनी 'धुरी टॉईज' या लाकडी खेळण्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. जत्रांमध्ये खेळण्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चित्रे विकणारा हा तरुण पुढे यशस्वी उद्योजक बनला.
धुरी इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल व्यवसाय आणि चित्रपटगृहांची साखळी उभारताना त्यांनी संपत्तीला समाजकार्यासाठीचे साधन मानले. संत तुकाराम महाराजांच्या 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' या उक्तीला त्यांनी प्रत्यक्षपणे आपल्या जीवनात उतरवले. वसई जनता सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचे योगदान विशेष ठरते. डोंबिवलीच्या तत्कालीन नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतः स्कूटरवरून घरोघरी फिरत भागभांडवल उभे केले. पुढे तब्बल अकरा वर्षे ते बँकेचे अध्यक्ष राहिले. त्यांच्यासाठी बँक ही केवळ आर्थिक संस्था नव्हती; तर सामान्य माणसाला स्वावलंबी करण्याचे माध्यम होती.
शांताराम धुरी यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक विलक्षण गुण म्हणजे कृतज्ञता. स्वतःच्या एकषष्ठी महोत्सवात त्यांनी मोठ्या मान्यवरांचा नव्हे, तर पहिला आकाशकंदील विकत घेणाऱ्या कांताबेन ठक्कर, पहिल्यांदा कर्ज देणारे दुमिंग कोलासी, दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणारे प्रभुनाथ तिवारी यांचा सार्वजनिक सत्कार केला. संघाच्या संस्कारातील 'व्यक्ती नव्हे, मूल्य मोठे' हा विचार त्यांच्या या कृतीतून जिवंत झाला.
महसूलमंत्री उत्तमराव पाटील यांच्याशी त्यांची निकटची मैत्री होती. त्यांच्या कार्यालयात बसून त्यांनी असंख्य लोकांची कामे करून दिली. मात्र स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी कधीही त्या संबंधांचा उपयोग केला नाही. हा निगर्वीपणा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा स्थायीभाव राहिला. शांताराम धुरी यांच्या समाजकार्यात धर्म, जात किंवा पंथाची भिंत कधीच नव्हती. त्यांनी कार्डिनल ग्रेशस रुग्णालयासाठी क्ष-किरण विभाग उभारण्यात मदत केली, मराठा समाज आणि हनुमान मंदिरासाठी सभागृह उभारले, आगरी शिक्षण विकास संस्थेत पत्नीच्या नावाने तीन मजली शाळा-कॉलेज उभे केले, वसईत तीन मजली शिक्षण भवन उभारण्यात योगदान दिले, तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमाला सातत्याने अर्थसाहाय्य केले. त्यांच्यासाठी सेवा म्हणजे संघाच्या शाखेत शिकलेल्या जीवनमूल्यांचे प्रत्यक्ष रूप होते.
साप्ताहिक विवेकच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकात त्यांचा 'उद्योगश्री' म्हणून गौरव झाला. प्राचार्य पु. द. कोडोलीकर यांनी त्यांच्या कार्यपद्धतीतील निवैरता आणि निगर्वीपणा हे विशेष गुण अधोरेखित केले. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्यांनी तो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' विचारांना समर्पित केला. ते अनेकांसाठी चालते-बोलते संदर्भवाचनालय होते. एखाद्या कार्यकर्त्याला इतिहास हवा असो, संघकार्याचा अनुभव हवा असो किंवा समाजकार्यासाठी मार्गदर्शन—शांतारामजींचे दार नेहमी खुले असे.
कै. शांताराम महादेव धुरी यांचा संघप्रवास हा संघाच्या संस्कारांनी घडलेल्या स्वयंसेवकाच्या आयुष्याचा दस्तऐवज आहे. १९४२ मध्ये नवघरच्या पहिल्या शाखेत उभा राहिलेला तो तरुण पुढे हजारो कार्यकर्त्यांचा विश्वास बनला. त्यांनी उभे केलेले दुकान कार्यालय झाले, व्यवसाय समाजसेवेचे साधन बनला आणि आयुष्य राष्ट्रकार्याला समर्पित झाले. त्यांनी जपलेली संघनिष्ठा, प्रामाणिकपणा, कृतज्ञता आणि अंत्योदयाची भावना हीच त्यांची खरी ओळख आहे. वसईच्या मातीतून घडलेला हा स्वयंसेवक आजही सांगून जातो; शाखेत रुजलेले संस्कार आयुष्यभर समाजाला दिशा देऊ शकतात.