नवी मुंबई परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची मुळे रुजविण्याचे आणि त्याला विस्तार देण्याचे जे कार्य काही मोजक्या कर्मयोग्यांनी केले, त्यामध्ये कै. त्रिविक्रम कृष्णाजी जोशी तथा आप्पा जोशी यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. आप्पांनी केवळ स्वतः संघकार्य स्वीकारले नाही, तर त्या कार्याची बीजे समाजाच्या मनात रुजविण्यास सुरुवात केली. नवी मुंबईच्या मातीत संघकार्याची बीजे रोवणाऱ्या, स्वयंसेवकांना घडविणाऱ्या आणि समाजाशी आत्मीयतेचे नाते निर्माण करणाऱ्या या कर्मयोग्याची स्मृती म्हणूनच आजही आदराने जपली जाते.
कै. त्रिविक्रम कृष्णाजी जोशी तथा आप्पा जोशी हे नवी मुंबई येथील संघ कार्याचे जणू भीष्माचार्यच. सन १९५२ मध्ये आप्पा कोल्हापूरहून तुर्भे येथे आले आणि त्यांनी संघाच्या कामाला सुरुवात केली. वामनराव ओक हे त्यावेळचे विभाग संघचालक होते. ठाणे महानगरपालिकेतील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत यांना तुर्भे भागामध्ये शाळा सुरू करण्याची इच्छा होती. त्याकरता त्यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. विशेषतः तुर्भे गावाच्या बाहेरील बाजूस शेतीमध्ये ही शाळा सुरु करावी अशी त्यांची इच्छा होती. तशी इच्छा त्यांनी वामनरावांकडे बोलून दाखवली होती आणि म्हणून वामनरावांनी आप्पांची आणि दादांची गाठभेट घालून दिली. त्या वेळेला साऱ्या गावकऱ्यांनी संघटित होऊन श्रमदानातून ही शाळा उभी केली.
आप्पांनी तुर्भे गावात संघाची सायम् शाखा सुरु केली. केवळ शाखेचे कार्यक्रम न घेता खेळ खेळण्यापासून सुरुवात झाली. मग त्यामध्ये कबड्डी, खो-खो, अन्य संघातले खेळ अशाप्रकारे सुरुवात झाली. मग बालकांना संघगीते शिकवणे सुरु झाले. त्यानंतर मात्र काही वर्षानंतर साधारणपणे १९५९-६० नंतर प्रत्यक्ष ध्वजांकित शाखा लागायला लागली. तेव्हा शाखा म्हणजे नेमकं काय, हे संघस्थानावर येणाऱ्या बालांना कळायला लागले होते.
ठाण्याहून नरहरी निमकर, श्रीहरी मुकादम असे संघाचे कार्यकर्ते नियमितपणे या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि सुरुवातीला मासिक नंतर साप्ताहिक मिलन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. आप्पांच्या प्रयत्नांमधून साधारण १९६८-६९ या काळात शिरवणे, बेलापूर आणि घणसोली या तिन्ही ठिकाणी नरहरी निमकर, श्रीहरी मुकादम यांच्या प्रयत्नाने आप्पांच्या मार्गदर्शनाखाली शाखा सुरु झाल्या.
आप्पांच्या घराची दारं संघ स्वयंसेवकांसाठी कायम खुली असायची. आप्पांच्या राहत्या परिसरात कोणी संघ कार्यकर्ते आले की ते आप्पांना भेटल्याशिवाय जात नसे. आप्पांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेकजण त्यांच्या घरी यायचे. आप्पांची पत्नी डॉ. पद्मजा जोशी यांचा खंबीर पाठींबा होताच; मात्र आप्पा करत असलेल्या कार्यात त्यांना आवडीने सहभाग देखील घेतला होता. त्या डॉक्टर असल्याने आप्पा त्यांना आपल्या सायकलवरून खेडोपाडी घेऊन जायचे. तिथल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी करायचे. अशा आप्पांचा संपर्क वाढत गेला आणि आप्पांच्या या कार्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात एक आदर सुद्धा निर्माण झाला होता. आप्पा प्रचंड शिस्तप्रिय होते, त्यांचे विद्यार्थी अजूनही त्यांची शिस्तप्रिय शिक्षक म्हणून आठवण काढत असतात.
जेव्हा जेव्हा संघाची शिबिरे व्हायची तेव्हा तेव्हा आप्पा विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये घेऊन जात. मुलांनाही ते आवडायचे. एवढेच नव्हे तर संघ शिक्षा वर्गाकरिता देखील मुलांनी जावे याकरताही आप्पांनी प्रत्यक्ष प्रयत्न केले. संघात प्रत्यक्ष कुठले दायित्व, कुठली जबाबदारी नसताना सुद्धा जे जे काही करणे आवश्यक होते, ते ते त्यांनी केले. म्हणजे परिसरामध्ये प्रवास करून कार्यकर्त्यांशी बोलणे, पालकांशी संवाद साधणे, आपल्या पाल्यांनी संघाच्या शाखेमध्ये येणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना पटवून देणे आणि स्वयंसेवक घडविण्यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी आप्पांनी त्यावेळेला केल्या होत्या. आप्पांच्या मुशीत घडलेले स्वयंसेवक आजही हे म्हणताना दिसतात की, आम्हाला संघाची दीक्षा ही आप्पा जोशींमुळे मिळाली.
१९६७-६८ च्या सुमारास तत्कालीन प्रांत संघचालक बाबाराव भिडे हे घणसोली गावामध्ये आले होते. त्यांचा प्रवास होता आणि या भागातल्या सर्व संघ कार्यकर्त्यांचा एक बौद्धिक वर्ग बाबारावांनी घेतला होता. त्यावेळच्या सर्व नियोजनात अप्पा जोशींचा मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो. नवी मुंबईमध्ये झालेल्या प्रवासादरम्यान तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस जेव्हा वर्गात आले होते तेव्हा त्यांनी आप्पा जोशींच्या घरी भेट दिली होती.
दि. १६ डिसेंबर १९९९ रोजी आप्पांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा नंदकिशोर जोशी हे सुद्धा संघकार्यात सक्रीय आहेत. कै. त्रिविक्रम कृष्णाजी जोशी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.