लाल मंदिर होते लक्ष्य, गर्दीमुळे बदलला प्लान!लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएचा धक्कादायक खुलासा

    10-Sep-2026   

Red Fort Blast Case
 
मुंबई (Red Fort Blast Case) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी म्हणून उमर-उन-नबी याचे नाव नमूद केले आहे. आरोपपत्रात त्याने हल्ल्याची आखणी कशी केली, कुठे-कुठे मुक्काम केला आणि तपास यंत्रणांपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घेतली, याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रानुसार, उमर-उन-नबीचा मूळ हेतू चांदणी चौकातील लाल मंदिराजवळ कार उभी करून स्फोट घडवण्याचा होता. मात्र, तेथे प्रचंड वाहतूक आणि पोलिसांचा बंदोबस्त असल्याने त्याला योजना राबवता आली नाही. त्यानंतर त्याने कार वळवून लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला.(Red Fort Blast Case)
 
तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३७ वाजता उमर लाल मंदिराजवळ कार पार्क करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परिस्थिती प्रतिकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने यू-टर्न घेतला. त्यानंतर अवघ्या १३ मिनिटांनी, सायंकाळी ६.५० वाजता, लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक ४ जवळ भीषण स्फोट झाला. एनआयएने याला दिल्लीतील पहिले वाहनाधारित आयईडी हल्ला असल्याचे म्हटले आहे.(Red Fort Blast Case)
 
आरोपपत्रानुसार, उमरने रिमोट कमांड प्रणालीद्वारे ईआयडी चा स्फोट घडवून आणला. ही रिमोट यंत्रणा त्याच्या एका बुटात बसवण्यात आली होती. घटनास्थळी कारजवळ सापडलेला बूट आणि त्याच्या टाचेतील धातूचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला. तपासात त्यामध्ये ट्रायअॅसिटोन ट्रायपेरॉक्साइड (टीएटीपी), पोटॅशियम आणि अमोनियम नायट्रेट आढळले. कारमधून मिळालेल्या जैविक नमुन्यांचा डीएनए आरोपीच्या आई-वडिलांच्या डीएनएशी जुळल्याने त्याची ओळख निश्चित झाली.(Red Fort Blast Case)
 
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, उमर स्फोटके सुरक्षित ठेवण्यासाठी आपली खोली नेहमी अत्यंत थंड ठेवत असे. खोलीतून सतत दुर्गंधी येत असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. तयार केलेले टीएटीपी सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने पाणी भरण्याच्या विशेष पिशव्या विकत घेतल्या होत्या. स्फोटक मिश्रण स्थिर राहावे यासाठी त्यात नियमितपणे पाणी टाकले जात असल्याचेही साक्षीदारांनी तपास यंत्रणेला सांगितले.(Red Fort Blast Case)
 
पोलिसांच्या कारवाईनंतर उमर हरियाणातील नूंह येथील एका घरात लपून बसल्याचे तपासात उघड झाले. त्या घरातील एका महिला सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, तो बाहेर लघवीसाठी जात नव्हता. तो प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी साठवत असे, त्यामुळे खोलीत तीव्र दुर्गंधी पसरली होती. तपासादरम्यान एक दस्तावेजही जप्त करण्यात आला असून, त्यात युरिया नायट्रेट आधारित स्फोटक तयार करण्याची पद्धत नमूद होती. त्यामध्ये युरियाचा स्रोत म्हणून लघवीतून युरिया मिळवण्याचाही पर्याय दिला होता.(Red Fort Blast Case)
 
या लाल किल्ला बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर २९ जण जखमी झाले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूचे कारण उच्च तीव्रतेच्या स्फोटलहरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींचे सुमारे १७.७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंदही आरोपपत्रात करण्यात आली आहे.(Red Fort Blast Case)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर