कै. गजानन रामचंद्र आठवले सर्वांचे लाडके अण्णा, असे एक व्यक्तीमत्व जे स्वतःच संघाचे चालते-बोलते संस्कार होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारासाठी, स्वयंसेवकांच्या जडणघडणीसाठी आणि समाजजीवनात राष्ट्रभाव जागविण्यासाठी समर्पित राहिले. मातृभूमीप्रेमाचे बाळकडू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतके खोलवर रुजले होते की, त्यांनी आयुष्यभर संघकार्यालाच आपल्या जीवनधर्माचे स्थान दिले.
दि. १६ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या अण्णांना लहानपणापासूनच संघशाखेचे संस्कार लाभले. तेव्हापासूनच शाखेतील शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव यांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. संघकार्य ही केवळ संघटनेची जबाबदारी नसून राष्ट्रसेवेचा मार्ग आहे, ही भावना त्यांनी लवकरच आत्मसात केली. नोकरीच्या निमित्ताने ते काही काळ मुंबईत राहिले. तेथेही त्यांनी संघाशी असलेले नाते कायम ठेवले. 'दै. भारत'मध्ये कार्यरत असतानासुद्धा त्यांचे संघकार्य अखंड सुरूच होते. याच काळात त्यांनी प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि मुंबईहून सांगली येथे प्रचारक म्हणून कार्य केले. हे कार्य त्यांनी १९४८ मधील संघबंदीपूर्वीच्या काळात केले, जेव्हा संघविस्तारासाठी पूर्णवेळ प्रचारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
१९५५ साली अण्णांनी आपल्या जन्मगावी रत्नागिरीला परतण्याचा निर्णय घेतला. हा केवळ गावात परतण्याचा निर्णय नव्हता; तो रत्नागिरीला आपली कर्मभूमी मानून संघकार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प होता. तालुका, जिल्हा आणि पुढे गोवा या विस्तृत परिसरात त्यांचा व्यक्तिगत संपर्क निर्माण झाला. स्वयंसेवकांच्या घरोघरी जाणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि संघकार्याशी त्यांना जोडून ठेवणे ही त्यांची कार्यशैली होती. १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लागू झाली आणि संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांना 'मिसा'खाली अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ स्वयंसेवक तुरुंगात गेल्याने स्थानिक संघकार्य मोठ्या संकटात आले. याच काळात अण्णांनी अत्यंत धैर्याने आणि सावधपणे नेतृत्व स्वीकारले.
सरकारी यंत्रणेला त्यांच्या संघसंपर्काची पूर्ण कल्पना नसल्यामुळे त्यांनी पडद्याआड राहून महत्त्वाची सूत्रे हातात घेतली. तुरुंगात असलेल्या स्वयंसेवकांचे निरोप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या कुटुंबांची व्यवस्था पाहणे, स्वयंसेवकांच्या अडचणी दूर करणे आणि संघकार्याचा धागा अखंड ठेवणे हे त्यांनी निस्वार्थपणे केले. वैद्यकाका, रायकरसर यांसारख्या अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांना अटक झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी वडीलकीच्या नात्याने भरून काढली.
आणीबाणीच्या विरोधातील संघाच्या सत्याग्रहाचे नियोजन करण्यात अण्णांची भूमिका विशेष उल्लेखनीय होती. सत्याग्रह कोठे, केव्हा आणि कसा करायचा, याची संपूर्ण रचना त्यांनी तयार केली; मात्र स्वतः पुढे न येता त्यांनी विवेक भावे आणि रामभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले. सत्याग्रह कोठे, केव्हा आणि कसा करायचा, याची संपूर्ण रचना त्यांनी तयार केली; मात्र स्वतः पुढे न येता त्यांनी विवेक भावे आणि रामभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले.
रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर अटक झाल्याने समाजात जनजागृतीची गरज होती. त्या वेळी 'बलवंत' साप्ताहिकाशी जोडलेल्या कार्यातून त्यांनी सरकारच्या दडपशाहीविरोधात आणि दंडुकेशाहीविरोधात प्रभावी लेखन केले. त्यांचे लेखन हे संघर्षाला दिशा देणारे ठरले. याच काळात भूमिगत स्वयंसेवकांची सुरक्षित व्यवस्था, त्यांची कामांची विभागणी, प्रवासाचे नियोजन आणि संपर्कव्यवस्था टिकवून ठेवण्याचे कार्य त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले.
अण्णांचे व्यक्तिमत्त्व केवळ संघर्षापुरते मर्यादित नव्हते; ते उत्कृष्ट संघटकही होते. १९८३ साली ते रत्नागिरीचे जिल्हा कार्यवाह होते. त्या वर्षी पुण्यातील तळजाई येथे संघाचे ऐतिहासिक शिबीर आयोजित झाले. रत्नागिरी जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्वयंसेवक सहभागी व्हावेत म्हणून त्यांनी बापूराव पटवर्धन यांच्यासह संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ११०० हून अधिक स्वयंसेवक तळजाई शिबिरात सहभागी झाले. त्या काळातील वाहतूक, संपर्क आणि साधनांच्या मर्यादा पाहता ही संघटनक्षमता विलक्षण होती.
१९८४ साली अण्णांनी रत्नागिरीचे संघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. बैठकीत मतभेद निर्माण झाले, तरी त्यांची भूमिका नेहमी समन्वयाची राहिली. व्यक्तीपेक्षा कार्य मोठे आणि कार्यापेक्षा संघ मोठा, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्या कार्यकाळात पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या सावंतवाडी प्रवासासाठी रत्नागिरीतून तीन एस.टी. भरून स्वयंसेवकांना नियोजनबद्ध पद्धतीने नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ नेतृत्वाशी स्वयंसेवकांचा प्रत्यक्ष संपर्क वाढविणे हे त्यांना विशेष महत्त्वाचे वाटत असे.
अण्णांच्या जीवनातील एक विलक्षण आठवण म्हणजे पूजनीय श्रीगुरुजी यांच्याशी असलेले त्यांचे आत्मीय नाते. अण्णांच्या विवाहानंतर झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेला स्वतः श्रीगुरुजी उपस्थित होते. मुंबईतील मुक्कामादरम्यान मा. आबाजी थत्ते यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे अण्णांना श्रीगुरुजींसोबत सलग आठ दिवस प्रवास करण्याचे भाग्य लाभले. त्या सहवासातून मिळालेले अनुभव त्यांनी पुढे रत्नागिरीतील स्वयंसेवकांच्या घडणीत उपयोगात आणले.
रत्नागिरी जिल्हा आणि गोवा परिसरात सतत फिरत राहणारे अण्णा प्रत्येक स्वयंसेवकाला नावाने ओळखत असत. त्यांच्यासाठी संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे स्वयंसेवक आणि स्वयंसेवक म्हणजे राष्ट्रकार्याची सजीव शक्ती होती. कै. गजानन रामचंद्र (बंडोपंत) आठवले यांचा संघप्रवास हा केवळ एका स्वयंसेवकाचा इतिहास नाही; तो संघसंस्कारांनी घडलेल्या कर्तव्यनिष्ठ जीवनाचा आदर्श आहे. प्रचारक म्हणून केलेली सुरुवात, आणीबाणीत निभावलेले अदृश्य नेतृत्व, संघटनकौशल्याने उभे केलेले कार्य आणि समन्वयातून जपलेली संघपरंपरा—या सर्वांनी त्यांचे जीवन प्रेरणेचा दीपस्तंभ बनविले.