मराठी न बोलणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाईचा बडगा कायम; रिक्षा-टॅक्सी चालकांचा बॅज निलंबित केला जाणार

प्रथम एक महिन्याची नोटीस; मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास तीन महिन्यांचे निलंबन; मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज व परवाना रद्द

Marathi Language Rule
 
मुंबई: (Marathi Language Rule) राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आज दि. 20 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक मराठी ना शिकणाऱ्या वाहनचालकांचा बॅज व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
 
मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.(Marathi Language Rule)
 
रोजगार हिरावून घेणे सरकारचा उद्देश नाही
 
महाराष्ट्रात देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. मुंबईने नेहमीच देशभरातील नागरिकांना सामावून घेतले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान राखणेही तितकेच आवश्यक आहे. मराठी शिकणार नाही, बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत कारवाई करणे हे परिवहन विभागाचे कर्तव्य आहे. अशा चालकांना आता कोणतीही अतिरिक्त मानवतावादी मुदत न देता कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.(Marathi Language Rule)
 
नवीन बॅज देताना मराठी ज्ञानाची व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे तपासणी
 
राज्यात आतापर्यंत सुमारे ९ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने व बॅज देण्यात आले आहेत. यापुढे नवीन परवाना व बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करेल आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच बॅज देण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.(Marathi Language Rule)
 
बनावट अधिवास प्रमाणपत्रांचीही तपासणी
 
रिक्षा-टॅक्सी परवाना किंवा बॅज मिळविण्यासाठी बनावट अधिवास प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रमाणपत्रांची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती खरोखर महाराष्ट्रात १५ वर्षांपासून वास्तव्यास आहे का, याची आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पडताळणी तसेच पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.(Marathi Language Rule)
 
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महामंडळाच्या माध्यमातून ५७ कोटींची तरतूद
 
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या आनंद दिघे यांच्या नावाच्या महामंडळाचे सुमारे ३७ हजारांहून अधिक सदस्य झाले आहेत. या महामंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांसाठी सुमारे ५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Marathi Language Rule)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर