विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; सोरेन सरकार अखेर झुकले, जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द

विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांचे उपोषण मागे

    18-Aug-2026   
Jharkhand JSSC CGL
 
मुंबई : (Jharkhand JSSC CGL) झारखंडमध्ये जेपीएससी-जेएसएससी-सीजीएल परीक्षांमधील अनियमिततेविरोधात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनापुढे अखेर सोरेन सरकारला झुकावेच लागले. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी मान्य करत राज्य सरकारने जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नुकतीच जेएसएससी-सीजीएल परीक्षा आणि टीडीपीएलच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रांची सदर रुग्णालयात दाखल असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी आपले उपोषण सोडले.(Jharkhand JSSC CGL)
 
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घोषणेनंतर रात्री उशिरा राज्याच्या मंत्री दीपिका पांडेय सिंह, राज्याचे आरोग्यमंत्री इरफान अंसारी आणि आमदार जयराम महतो रांचीच्या सदर रुग्णालयात पोहोचले. यावेळी जयराम महतो यांनी देवेंद्र नाथ महतो यांना स्वतःच्या हाताने काही खाऊ घातले, तर दीपिका पांडेय सिंह यांनी त्यांना ज्यूस पाजला. ज्यूस घेतल्यानंतर देवेंद्र नाथ महतो यांनी आपले उपोषण समाप्त केले. प्रकृती खालावल्याने देवेंद्र नाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले होते.(Jharkhand JSSC CGL)
 
उपोषण सोडल्यानंतर देवेंद्र नाथ महतो यांनी आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आभार मानले. तसेच परीक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे तसेच आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली.(Jharkhand JSSC CGL)
 
आंदोलनकर्त्यांनी टीडीपीएलशी संबंधित परीक्षा, निकाल आणि निवडी रद्द करण्याच्या तसेच २०१४ पासूनच्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी त्यांनी स्पष्ट केले आहे की, परीक्षा रद्द करणे हा त्यांच्या मागण्यांपैकी केवळ एक भाग आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख आणि अद्याप प्रलंबित मागणी म्हणजे राज्यातील भरती परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेची सीबीआय मार्फत चौकशी करणे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.(Jharkhand JSSC CGL)
 
परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाची भावना असली, तरी व्यापक लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सांगितले की, परीक्षा रद्द करण्याची मागणी मान्य झाली असली तरी सीबीआय चौकशीची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(Jharkhand JSSC CGL)
 
विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारचा निर्णय
 
ही लढाई २ जुलै रोजी सुरू झाली होती. २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर २८ जुलै रोजी सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी पूर्णपणे केली जात असून कोणालाही वाचवले जात नाही. अगदी माजी मुख्य सचिव आणि जेपीएससी अध्यक्षांसारख्या मोठ्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस दाखवल्याबद्दल मी झारखंड सरकारचे आभार मानतो. परीक्षा रद्द करणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान होते. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. कारण जेएसएससी-सीजीएल परीक्षेची भरती प्रक्रिया आधीच नियुक्तीच्या टप्प्यावर पोहोचली होती आणि अनेक विद्यार्थ्यांनी कदाचित आपली जागा निश्चित केली होती. मात्र, गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे मोठे पाऊल उचलले.
 
- देवेंद्र महतो, विद्यार्थी नेते
 
परीक्षा रद्द झाल्याने नियुक्त उमेदवारांमध्ये नाराजी
 
झारखंड सरकारकडून सोमवारी परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर वाद आणखी चिघळला. परीक्षेच्या माध्यमातून नियुक्ती होऊन आपापल्या पदांवर सेवा बजावत असलेल्या उमेदवारांनी सरकारच्या निर्णयाविरोधात रांची येथील प्रोजेक्ट भवनात धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलन करणारे उमेदवार आपल्या नियुक्तीबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही निष्पक्ष प्रक्रियेतून परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्त झालो आहोत, मग आमच्याविरोधात असा निर्णय का घेतला जात आहे? आम्ही तर कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करत होतो. चौकशीत काही चूक आढळल्यास त्यात सहभागी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.(Jharkhand JSSC CGL)
 
विद्यार्थी सीबीआय चौकशीवर ठाम का?
 
सीबीआय चौकशीची मागणी झारखंडमधील भरती परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या व्यापक आरोपांमधून पुढे आली आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेत काम करणाऱ्या तपास संस्थांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या मते, केवळ परीक्षा रद्द करणे पुरेसे नाही. कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील फेरफारासाठी जबाबदार व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. दुसरीकडे, सरकारने राज्यातील यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासावर विश्वास ठेवला आहे.(Jharkhand JSSC CGL)
 
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्या तपासात आतापर्यंत अनेक ‘धक्कादायक तथ्ये’ समोर आली आहेत. सोरेन यांच्या म्हणण्यानुसार, विविध काळात भरती परीक्षा व्यवस्थेत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये परस्पर जोडलेले एक नेटवर्क असल्याचे तपासातून समोर आले आहे. सरकारने संबंधित विभाग आणि सीआयडीला २०१४ पासूनच्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याच मुद्द्यावर सरकार आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेत मतभेद कायम आहेत. सरकारने व्यापक चौकशी मान्य केली आहे; मात्र विद्यार्थ्यांना हीच चौकशी सीबीआयकडे सौपवायची आहे.(Jharkhand JSSC CGL)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर