चिपळुणमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कारांचे वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

    18-Aug-2026

मुंबई : (National Award) इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिपळुण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम सावरे यांनी केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (National Award)

उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल उद्योजक प्रशांत तथा राजू जोशी यांना राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. चिपळुण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांना सहकार क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देण्यात आला. (National Award)

याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानासाठी अपूर्वा मुलाणी आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी प्रा. डॉ. रोहित गायकवाड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. (National Award)

पुस्तकांचे प्रकाशन

या कार्यक्रमात प्रा. ज्ञानोबा कदम लिखित ‘महाराष्ट्राची जडणघडण आणि संत परंपरा’ तसेच ‘कोकणातील बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांमधून महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास आणि कोकणातील बौद्ध परंपरेचा मागोवा घेण्यात आला आहे. (National Award)

आठवले यांच्या चारोळ्यांतून राजकीय टोलेबाजी

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चारोळ्यांचा वापर करून राजकीय टोलेबाजी केली. त्यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात हशा पिकला. (National Award)

“मी ज्यांच्या सोबत जातो, त्यांना सत्ता मिळते आणि ज्यांना सोडतो, त्यांची सत्ता जाते,” असे वक्तव्य करत आठवले यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ दिला. सध्या कोणता नेता किंवा पक्ष कोणत्या बाजूला जाईल, याचा अंदाज बांधता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आमदार भास्करशेठ जाधव यांना आपल्या आघाडीत येण्याचे आवाहनही केले. (National Award)

आरक्षणाबाबत आठवले यांची भूमिका

गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि सर्व समाजघटकांना सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत जागा वाढविण्याची मागणी आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (National Award)

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, चिपळुणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत हेगशेट्टये, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, संदेश मोहिते, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळुण रिपाइं अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (National Award)









संबंधित मजकूर