कर्करोगाचा उपचार म्हणजे केवळ वाढलेल्या पेशी नष्ट करणे, एवढेच नाही. रोगाविरुद्ध शरीराची स्वतःची संरक्षणव्यवस्था किती प्रभावीपणे वापरता येईल, यावरही आता संशोधन झाले आहे. यातूनच ‘इम्युनोथेरपी’चा विकास झाला. कर्करोगाच्या पेशी शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून कशा लपतात आणि त्या लढ्याला पुन्हा कसे प्रवृत्त करता येते, याचा शोध घेत या उपचारपद्धतीने कर्करोगचिकित्सेला नवी दिशा दिली. भारतात उपलब्ध असलेल्या या उपचारपद्धतीचा घेतलेला आढावा...
कर्करोगाच्या उपचारासाठी साधारणतः रुग्ण डॉटरांकडे जातो, तेव्हा त्याच्यासमोर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, किरणोपचार असे परिचित पर्याय असतात. गेल्या दशकभरात या यादीत आणखी एक महत्त्वाचा पर्याय पुढे आला आहे, तो म्हणजे ‘इम्युनोथेरपी’. भारतात या उपचारपद्धतीची चर्चा आता वाढली आहे; कारण आजवर महागडी मानली जाणारी ‘इम्युनोथेरपी’ परवडणार्या दरात उपलब्ध होत आहे. आज मूळ औषधाच्या तुलनेत त्याची किंमत सुमारे ६० ते ७० टक्क्यांनी कमी असल्याचे समोर आले आहेे. कर्करोगाच्या उपचारांत याने नेमका कोणता बदल केला, हे समजून घेण्याची ही संधी आहे.
‘इम्युनोथेरपी’चा मूलभूत विचार साधा आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा, सतत शरीरातील असामान्य पेशींवर लक्ष ठेवत असते. कर्करोगाच्या पेशी मात्र शरीरातूनच निर्माण झालेल्या असल्याने, त्या प्रतिकारशक्तीपासून लपण्याचे आणि तिची कार्यक्षमता कमी करण्याचे मार्ग शोधतात. विशेषतः ‘टी-लिम्फोसाईट्स’च्या कार्यावर नियंत्रण ठेवणार्या ‘इम्यून चेकपॉईंट’ यंत्रणेचा, कर्करोगाच्या पेशी गैरफायदा घेतात. म्हणजे प्रतिकारशक्ती शरीरात असते; प्रश्न असतो तो तिची कर्करोगाविरुद्धची प्रतिक्रिया पुरेशी प्रभावी का होत नाही, याचा.
याच ठिकाणी‘इम्यून चेकपॉईंट इनहिबिटर्स’ काम करतात. ‘पीडी-१’ हा ‘टी-सेल’च्या पृष्ठभागावरील एक नियामक घटक. त्याच्या संकेतांमुळे ‘टी-सेल’ची प्रतिकारक क्रिया कमी होते. ‘इम्युनोथेरपी’ची औषधे हा संकेत रोखतात आणि त्यामुळे ‘टी-सेल’ला कर्करोगाच्या पेशीविरुद्ध पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळते. म्हणून ‘इम्युनोथेरपी’ ही रुग्णाच्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादात हस्तक्षेप करणारी पद्धती आहे.
आज ‘इम्युनोथेरपी’च्या औषधांचा वापर फुफ्फुस, डोके-मान, अन्ननलिका, जठर, मूत्राशय, मूत्रपिंड आणि काही इतर कर्करोगांमध्ये होत आहे. परंतु, ‘इम्युनोथेरपी’ ही एकच उपचार सर्वांसाठी या तत्त्वावर चालत नाही. कर्करोगाचा प्रकार, त्याची अवस्था, ट्यूमरची वैशिष्ट्ये, आधी झालेले उपचार आणि रुग्णाची एकूण प्रकृती यांचा विचार करूनच तिची निवड केली जाते. काही रुग्णांमध्ये प्रतिसाद अत्यंत चांगला आणि दीर्घ काळ टिकणारा असू शकतो; काहींमध्ये मात्र औषधाचा अपेक्षित परिणाम होतोच, असे नाही.
या उपचारपद्धतीचा फायदा जितका महत्त्वाचा, तितकीच तिची दुसरी बाजूही लक्षात घ्यावी लागते. प्रतिकारशक्ती सक्रिय करताना, काही वेळा ती निरोगी ऊतींवरही परिणाम करू शकते. त्यामुळे त्वचा, आतडे, यकृत, फुप्फुसे, थायरॉईड आणि इतर अंतःस्रावी अवयवांशी संबंधित दुष्परिणाम दिसू शकतात. अशा दुष्परिणामांचे लवकर निदान आणि योग्य व्यवस्थापन उपचाराचाच भाग आहे. म्हणून ‘इम्युनोथेरपी’ उपचारादरम्यान रुग्णाचे बारकाईने निरीक्षणही तितकेच आवश्यक आहे.
मग ‘बायोसिमिलर’ इतके महत्त्वाचे का? कारण कर्करोगाच्या उपचारात वैज्ञानिक प्रगती आणि आर्थिक गणिते यांच्यात मोठी दरी आहे. ‘बायोसिमिलर’ म्हणजे मूळ जैविक औषधाशी अत्यंत साम्य असलेले जैविक औषध; त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता नियामक निकषांनुसार सिद्ध करावी लागते. किंमत कमी झाल्यामुळे पूर्वी केवळ खर्च परवडत नसल्याने, ‘इम्युनोथेरपी’पासून दूर राहिलेल्या काही रुग्णांना आता ती मिळू शकते. पूर्वी सुमारे ८० टक्के पात्र रुग्णांना, खर्चामुळे ‘इम्युनोथेरपी’ घेता येत नव्हती; ‘बायोसिमिलर’मुळे उपचाराचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, येथे भारतासमोरील मोठे आव्हान औषधाच्या किमतीपलीकडचे आहे. भारतातील सुमारे ६० ते ७० टक्के रुग्णांचे निदान प्रगत अवस्थेत होते. अशा परिस्थितीत अत्याधुनिक औषध उपलब्ध असणेच पुरेसे नाही. कर्करोगाचे लवकर निदान, योग्य तपासणी, रुग्णाची अचूक निवड आणि उपचाराला मिळणार्या प्रतिसादाचे निरीक्षण यांनाही तितकेच महत्त्व आहे.
कर्करोगचिकित्सेतील ‘इम्युनोथेरपी’ ही नवी दिशा नक्कीच आहे. कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्याबरोबरच शरीराची प्रतिकारशक्ती उपचाराचा सक्रिय भाग बनवण्याचा मार्ग तिने खुला केला. भारतात ‘बायोसिमिलर’मुळे हा उपचार अधिक परवडणारा होत असेल, तर त्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो. पण, हे औषध किती योग्य रुग्णापर्यंत योग्य वेळीच पोहोचले, किती रुग्णांना त्याचा दीर्घकालीन फायदा झाला आणि उपचाराची सुरक्षितता किती काटेकोरपणे राखली गेली, यावरच त्याचे खरे यश ठरणार आहे. (प्रतिनिधी)