‘जेन-झी’ समोरील संधी, कौशल्ये आणि रोजगाराचे नवे आव्हान!

    16-Aug-2026
 
Gen Z Youth in India
 
तरुण हीच राष्ट्राची खरी संपत्ती असतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली गुंतवणूक, ही राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरते. नुकताच दि. १२ ऑगस्ट रोजी साजरा झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय युवक दिना’च्या औचित्याने भारतातील तरुणांनी, त्यांच्यासमोरील समस्यांकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे. यासाठी व्यवस्था ते मानसिकतेत बदलही आवश्यक आहे. दि. १२ ऑगस्ट रोजीच्या ‘आंतरराष्ट्रीय युवक दिना’च्या पार्श्वभूमीवर भारतीय तरुणांच्यासमोरी संधी आणि आव्हानांचा आढावा घेणारा लेख...
 
दि. १२ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा होतो. संयुक्त राष्ट्रांनी १९९९ मध्ये, दि. १२ ऑगस्ट हा ’आंतरराष्ट्रीय युवक दिन’ म्हणून घोषित केला. युवक हा देशाची भविष्याकालीन दिशा ठरविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक. भारतासारख्या तरुण लोकसंख्येच्या देशासाठी या दिवसाचे महत्त्व आणखीच मोठे. आज भारताच्या लोकसंख्येत तरुणांचा मोठा वाटा आहे. ही शक्ती शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि संधींशी जोडल्यास; भारत जगातील सर्वांत सामर्थ्यवान अर्थव्यवस्थांपैकी एक होऊ शकतो. परंतु, हीच शक्ती योग्य मार्गदर्शनाअभावी बेरोजगारी, नैराश्य, अस्थिर रोजगार आणि दिशाहीन स्पर्धेत अडकली, तर ती मोठीच सामाजिक समस्या ठरेल. आजच्या युवकांसमोरचे जग त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. एका छोट्या शहरातील किंवा गावातील विद्यार्थी जगातील विद्यापीठे, कंपन्या, संशोधन आणि ज्ञानाशीही जोडला जातो; परंतु संधींबरोबर स्पर्धाही प्रचंड वाढली आहे. केवळ पदवी मिळविणे आता पुरेसे नसून, ज्ञानाबरोबरच कौशल्य, अनुभव आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमताही आवश्यक झाली आहे.
 
आजची ‘जेन-झी’ पिढी वेगाने बदलणार्‍या जगात वाढलेली पिढी आहे. या पिढीने लहानपणापासूनच संगणक, मोबाईल, सामाज माध्यमांचा अनुभव घेतला आहे. माहिती मिळविण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. जगातील कोणतीही माहिती काही क्षणांतच त्यांना उपलब्ध होते. परंतु, माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. माहिती मिळविणे सोपे आहे; तिचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे. त्यामुळे आजच्या युवकांनी केवळ माहितीचे ग्राहक न राहता, ज्ञानाचे निर्माते आणि समस्यांचे निराकरण करणारे नागरिक होणे आवश्यक आहे.
 
युवकांसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे रोजगार. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण शिक्षण पूर्ण करून, रोजगाराच्या बाजारात प्रवेश करतात. परंतु, शिक्षणसंस्थांमध्ये मिळणारे शिक्षण आणि उद्योगांना अपेक्षित असलेली कौशल्ये यांच्यात अनेकदा अंतर दिसते. काही विद्यार्थ्यांकडे पदवी असते; पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. काहींकडे तांत्रिक ज्ञान असतेच; पण संवादकौशल्य कमी असते. काहीजण अभ्यासात चांगले असतात; पण समस्या सोडविण्याच्य क्षमतेचा विकास झालेला नसतो. त्यामुळे रोजगारक्षमतेचा प्रश्न केवळ पदवीचाच नसून, सर्वांगीण कौशल्यांचाही आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हे आव्हान आणखीच गुंतागुंतीचे झाले. अनेक पारंपरिक कामांमध्ये यंत्रांची मदत वाढत आहे. काही कामांचे स्वरूपही बदलत असून, काही कामे कमी होत आहेत, तर अनेक नवीन प्रकारची कामे निर्माण होत आहेत. त्यामुळे युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला रोजगाराचा शत्रू मानण्यापेक्षा, रोजगाराचे बदलते स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. उद्याच्या जगात यंत्राशी स्पर्धा करण्यापेक्षा, यंत्राचा प्रभावी उपयोग करणारा मनुष्यच अधिक सक्षम ठरेल. यासाठी सतत शिकण्याची सवय निर्माण करणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाचा शेवट पदवी मिळाल्यावर न होता उलट, तेथूनच खर्‍या अर्थाने तो सुरू होतो. युवकांनी तांत्रिक कौशल्यांबरोबर संवाद, नेतृत्व, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, संघभावना, वेळेचे नियोजन आणि समस्या सोडवण्यांसारखी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, विषयाचे ज्ञान आणि मानवी कौशल्ये यांचा समतोल आवश्यक आहे.
 
भारतीय युवकांसाठी भाषांचे ज्ञान हीदेखील मोठी संधी आहे. इंग्रजीबरोबरच जपानी, जर्मन, फ्रेंच, अरबी, कोरियन आणि इतर परदेशी भाषांचे ज्ञान, रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण करू शकते. भारतातील उद्योग आता जगभरातील बाजारपेठांशी जोडले जात आहेत. जपान, आखाती देश, युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये, भारतीय कुशल मनुष्यबळाची मागणी मोठी आहे. परदेशी भाषा आणि व्यावसायिक कौशल्यांचा संगम, युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगाराच्या संधी देऊ शकतो. भारतामध्ये जागतिक कंपन्यांची मोठी कार्यालये वाढत आहेत. पूर्वी अनेक कंपन्यांचे मुख्य काम परदेशात असे; आता संशोधन, वित्त, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकसेवा, विश्लेषण आणि नवकल्पनांसारखी अनेक महत्त्वाची कामे भारतातून होतात. पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, गुरुग्राम आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांबरोबरच, आता लहान शहरांमध्येही नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे युवकांनी विविध क्षेत्रांतील संधीही समजून घेतल्या पाहिजेत.
 
याचबरोबर उद्योजकतेकडेही युवकांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. तरुणाने नोकरी शोधणारा होण्याऐवजी, रोजगार निर्माण करणारे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. स्थानिक समस्या ओळखून, त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय करता येतात. शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, वाहतूक, पर्यावरण, पुनर्वापर, ग्रामीण सेवा आणि स्थानिक उद्योग या क्षेत्रांत, मोठ्या प्रमाणावर नवकल्पनांची आवश्यकता आहे. भारताच्या गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये उद्योजकतेची प्रचंड क्षमता आहे. मात्र, युवकांच्या समस्या केवळ रोजगारापुरत्या मर्यादित नाहीत. वाढती स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील तुलना, अपयशाची भीती, कौटुंबिक अपेक्षा, आर्थिक दबाव आणि भविष्याबद्दलची अनिश्चिततेमुळे, अनेक तरुण मानसिक तणावाला सामोरे जातात. प्रत्येकालाच त्वरित यश मिळवण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात यश ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अपयश म्हणजे शेवट नसून शिकण्याची संधी आहे, हा दृष्टिकोनच युवकांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे.
 
ग्रामीण आणि शहरी युवकांमधील संधींचे अंतर कमी करणे, हे देशासमोरचे आणखी एक आव्हान. मोठ्या शहरांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या अधिक संधी असतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे बुद्धिमत्ता आणि जिद्द असते. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन, साधने आणि प्रशिक्षण उपलब्ध नसते. प्रत्येक जिल्ह्यांत आणि तालुयात आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, मार्गदर्शन व्यवस्था आणि उद्योगांशी जोडलेले प्रशिक्षण उपलब्ध झाले, तर भारतातील युवकशक्तीला नवी दिशा मिळेल. शैक्षणिक संस्थांची जबाबदारीही मोठीच आहे. अभ्यासक्रम केवळ परीक्षाभिमुख न राहता, रोजगाराभिमुख आणि कौशल्याभिमुख झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना उद्योगांचे प्रश्न सोडविण्याचीही संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी उद्योग तज्ज्ञांनी महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केले पाहिजे. प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, संशोधन, उद्योजकता आणि नवकल्पना यांनाच शिक्षणाचा अविभाज्य भाग बनविले पाहिजे.
 
आजच्या युवकांनी स्वतःसाठी एक साधा मंत्र स्वीकारण्याची गरज आहे, तो म्हणजे शिका, कौशल्य मिळवा, अनुभव घ्या, बदल स्वीकारा आणि सतत पुढे चला. एकाच कौशल्यावर आयुष्य काढण्याचा काळ संपला. पुढील काळात नवीन कौशल्ये शिकावी लागतील, काहीवेळा व्यवसाय बदलावा लागेल, काहीवेळा नवीन तंत्रज्ञानही स्वीकारावे लागेल. बदलाची भीती न बाळगता, बदलाचे नेतृत्व करणारा युवकच भविष्यात यशस्वी होईल. भारतासाठी आंतरराष्ट्रीय युवक दिन हा युवकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याचा दिवस असावा. प्रत्येक युवकाला दर्जेदार शिक्षण, योग्य कौशल्य, सन्मानजनक रोजगार, उद्योजकतेची संधी आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी समान व्यासपीठ मिळाले पाहिजे. भारताची खरी ताकद तरुण लोकसंख्याच आहे. परंतु, लोकसंख्येचा लाभ आपोआप मिळत नाही. त्यासाठी शिक्षण, कौशल्य, आरोग्य, रोजगार, संशोधन, नवकल्पना आणि योग्य मार्गदर्शन यात मोठी गुंतवणूक करावी लागते. आजचा युवक देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचा भाग झाला पाहिजे. दि. १२ ऑगस्टचा संदेश स्पष्ट आहे युवकांना संधी द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना भविष्यासाठी तयार करा. कारण, भारताचे उद्याचे उद्योग, संशोधन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक नेतृत्व आजच्या युवकांच्या हातात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता, संवेदनशीलता आणि मूल्ये यांचे महत्त्व कमी होणार नाही. उलट, ती अधिक महत्त्वाची ठरणार आहेत.
 
डॉ. दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)




संबंधित मजकूर