दिमागी नक्षली आणि समाज वास्तव!

    16-Aug-2026   

Dimaagi Naxalism 
 
दिमागी नक्षलवाद्यांची विचारसरणी ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे ही आजची गरज आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हंटले. खरे आहे शस्त्र घेऊन देशविरोधी, समाजविरोधी आणि संविधानविरोधी हिंसा करणारे नक्षलवादी सध्या शेवटची घटिका मोजत आहेत. मात्र, त्यांना रसद पुरवणारे, देशविरोधी धर्मविरोधी विचारसरणीला तरूणांत रूजवणारे लोक आजही समाजात आणि संस्थांमध्ये आहेत. समाजात वावरताना त्यांचे झालेले अभद्र दर्शन अनुभवले आहे. त्यावर आधारीत हा लेख.
 
आपल्या सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे, सशस्त्र नक्षलवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे. पण, समाज आणि संस्थांमध्ये लपलेले ‘दिमागी नक्षलवादी’ तरुणांना भडकवून, देशाला अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करतात. अशा विचारसरणीला ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे, हीच आजची सर्वांत मोठी गरज आहे.” स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले हे आवाहन अगदी योग्यच आहे. पण, दिमागी नक्षल्यांना ओळखायचे कसे? तर, स्प्रे मारल्यावर झुरळ बाहेर येतात, तसेच देशात चांगले घडत असेल, तेव्हा वातावरण बिघडवण्यासाठी छुपे नक्षली बाहेर येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, काल दि. १५ ऑगस्ट रोजी सगळा भारतीय समाज स्वातंत्र्याची महती गात होता. पण, झुरळ अभिजित दीपके काय म्हणाला, "देशात एखादा तरुण आपली जात सांगतो, तेव्हा त्याच्यावर जातीय हल्ले केले जातात, तो देश जगाचा मार्गदर्शक किंवा ‘विश्वगुरु’ कसा काय होऊ शकतो?” दीपके आणि समविचारी लोक असे वक्तव्य करतात की, जणू सगळे भारतीय जातिभेद मानतात आणि आजही देशात इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय, भटके-विमुक्त, आदिवासी या सगळ्यांनाच भीषण अस्पृश्यतेचा, जातिभेदाचा सामना करावा लागत आहे. देशाच्या महानतेवर हे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कारण, देशाच्या महानतेला विरोध करायचा यावरच तर त्यांचे पोट भरते.
 
दिमागी नक्षल्यांचे एक कारस्थान म्हणजे, ते भारताची संस्कृती, धर्म कसा तुच्छ आहे सांगण्यासाठी आकाशपाताळ एक करतात. चार वर्षांपूर्वी प. बंगालच्या एका विद्यापीठामध्ये गेले होते. तिथे दिमागी नक्षली असलेल्या काही संघटना कार्यरत आहेत. तसेच एक-दोन प्राध्यापकही असेच आहेत. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, प. बंगालच्या ग्रामीण भागातून आलेले हिंदू (यामध्ये बौद्ध, जैन, शीखही) विद्यार्थी, या दिमागी नक्षल्यांचे टार्गेट होते. या विद्यार्थ्यांकडे दिमागी नक्षली विशेष लक्ष द्यायचे. विद्यार्थ्यांचे परीक्षेतील मार्क्स मुद्दाम वाढवणे, त्यांना घरी जेवायला बोलावणे, मैत्री करणे, त्यांना व्यसन आणि मुक्त लैंगिक जीवनाची चटक लावायची, ही कामे ते करत. एखादा विद्यार्थी म्हणाला की, "आई-बाबांना व्यसन केलेले किंवा मुक्त लैंगिक संबंध ठेवलेले आवडणार नाही” तर, हे लोक विद्यार्थ्यांना सांगायचे, "आई-बापांनी काय तुम्हाला विचारून जन्माला घातले? त्यांनी एन्जॉय केले आणि तू जन्मलास. त्यामुळे त्यांनी तुला जन्मालाबिन्माला घालून उपकार केले, असे समजू नकोस. कसले संस्कार आणि कसला धर्म? कसली नीतिमत्ता? हे सर्वकाही थोतांड आहे.” हुल्लडबाजी, व्यसन आणि मुक्त लैंगिकता (त्यात समलैंगिकताही आलीच) म्हणजेच तरुणपण, असे गरीब पालकांच्या शहरात शिकण्यासाठी आलेल्या मुलांना सांगितले जाई. परिणामी, विद्यार्थी त्यांच्या धर्मापासून, श्रद्धेपासून संस्कारांपासून दूर जात. कित्येक जण कधीच शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत, काहीजण तर व्यसनांच्याही आहारी गेले. काहीजण मुक्त आणि विनामूल्य लैंगिक संबंध करता यावेत, यासाठी दिमागी नक्षल्यांचे गुलाम झाले. झुरळ आंदोलनातही अश्लील आविर्भाव करणारे; धर्म, समाज आणि देशविरोधी बोलणारे ‘मेरा लिंग, मेरी मर्जी’ म्हणत नंगानाच करणारे ते युवक-युवती आपण पाहिले. खात्रीपूर्वक सांगते की, ते जन्मजात तसे नव्हते. दिमागी नक्षलवाद्यांनी त्यांना तसे होण्यास भाग पाडले. त्यामुळेच देशभरातल्या आणि त्यातही आपल्या मुंबई विद्यापीठामध्येसुद्धा सज्जनशक्तीने लक्ष द्यायलाच हवे की, दिमागी नक्षली विद्यार्थ्यांना बळी तर बनवत नाही ना? आता झुरळ अभिजित दीपके आणि झुरळसमर्थक शाळा-शाळांमध्ये जाणार आहे.
 
असो, दिमागी नक्षली आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात, त्यांची कार्यपद्धतीही ठरलेलीच. पीडित, त्यातही ‘ओबीसी’, ‘एससी’, ‘एनटी’ समाजाच्या व्यक्तींना आणि महिलांना हेरून त्यांना अशा गोष्टी सांगायच्या की, ज्या आता कालबाह्य आहेत. त्यांच्यासोबत काहीही घडल्यावर दिमागी नक्षली त्यांना लगेच सांगतात, "बघा, तुमच्या जातीमुळेच तुमच्याशी असे वागले गेले.” कित्येकदा तर दुर्वर्तन करणारी व्यक्तीही, त्याच समाजातली असते. मग दिमागी नक्षली सांगतात की, "समाजाच्या व्यक्तीला तसे, उच्च जातीच्या लोकांनीच करण्यास भाग पाडले आहे.” पण, प्रत्यक्षात तसे काहीच नसते. दोन समाजात तेढ माजवण्यासाठीच हे केले जाते. अर्थात, जातिभेद होतच नाही, हे मी म्हणणार नाही. पण, कायद्याने-संविधानाने जातीयतेविरोधात लढण्याचे बळ दिले आहे. कायद्याने अशा विकृतांचा माज उतरवला जाऊच शकतो.
 
मात्र, दिमागी नक्षली पीडितांना कायद्याचा आधार घेऊ देत नाहीत. इथेही दिमागी नक्षल्यांचा दुटप्पीपणा पाहण्यासारखा असतो. ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात; पण ते कृती करताना डॉ. बाबासाहेबांनी नाकारलेल्या ‘मार्क्सवादा’चाच जयजयकार करतात. (मी तर एका वस्तीमध्ये डफलीवाल्यांच्या कार्यक्रमात ‘जय भीम जय भीम’ करता-करता, ‘जय मार्क्स’ ते ‘जय रोहित वेमुल्ला’चेही नारे ऐकलेले आहेत. ज्यांची लायकी नाही, त्यांचे नाव डॉ. बाबासाहेबांबरोबर जोडताना पाहिले आहे.) असो, ‘संविधान खतरे में है’ असेही हेच लोक सांगतात. मात्र, लोकांनी संविधानाच्या-कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवू नये किंवा देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास ठेवू नये म्हणून, हेच लोक कष्टकरी समाजाच्या वस्तीत गाणे गातात -

दलिता रं हल्ला बोल तू, श्रमिका रं हल्ला बोल तू
न्याय व्यवस्था-शासन व्यवस्था तुझी नाही रं
 
या देशाचा कायदा आणि लोकशाही ही तुझ्यासाठी नाही. नव्हे, हा देशच तुझा नाही असेच हे लोक सांगतात. याच लोकांनी अचानक भारतीय न्याय व्यवस्थेला लक्ष्य केलेले दिसते, हा योगायोग नाही. आताही सर्वोच्च न्यायालयाच्या विधानाच्या वक्तव्याचा निषेध म्हणून, ‘झुरळ आंदोलन’ सुरू झाले. करोडो सामान्य नागरिकांचा भारतीय संविधानाच्या कायद्यावर विश्वास आहे. दिमागी नक्षलींना समाजाला सांगायचे आहे की, न्यायालय, तो कायदा आणि ते संविधान तुमचे नाही. संविधान व्यवस्थेच्या विरोधात, दिमागी नक्षलींना समाजाला उभे करायचे आहे. ही त्यांची कार्यपद्धती वर्षानुवर्षे सुरू आहे. त्याला खतपाणी घालणारे काही राजकारणीही आहेतच म्हणा. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ची इच्छा व्यक्त केली, असा आरोप असणारा कन्हैया कुमार आता काँग्रेसचा पदाधिकारी आहे, हे उगीच का?
 
या दिमगी नक्षल्यांची विकृती, झारखंडमध्येही पाहिली होती. काही वर्षांपूर्वी तिथे हे लोक गेले. त्यांनी आदिवासींना सांगितले की, "संविधानात पाचव्या सूचीअंतर्गत तुमच्यासाठी विशेष तरतुदी आहेत. तुमच्या सामाजिक कायद्यांना कुणीही विरोध करू शकत नाही. समाज-कायदा हा जातपंचायतीच्या आदेशावर असतो. पंचायतच ती व्यवस्था निर्माण करते. मग भारतीय संविधानात असलेले कायदे, हे काय तुमच्या पंचायतीने बनवलेत का? नाही ना? ते तुम्ही पाळू नका. तसेच जे सरकार आहे, ते तुमच्या जातपंचायतीच्या कायद्यातून बनले का? नाही ना, मग ते तुमचे नाही. संविधानातल्या पाचव्या सूचीअंतर्गत आदिवासी जमिनी घेण्याचा, कुणालाही अधिकार नाही. मग तुमच्या जमिनीवर धरण, बांध, शाळा, रुग्णालय आणि पोलीस चौकीही बांधणारे हे लोक कोण आहेत? विरोध करा त्यांना.” आदिवासी बांधवांना ते खरे वाटले. कारण, जंगलातल्या आदिवासींना सत्य सांगणारे कुणी भेटूच नये, म्हणून नक्षल्यांनी विशेष काम केलेले. जसे दुर्गम भागात रस्ते बनू नयेत, वीज येऊ नये म्हणून ते बनवणार्‍या कंत्राटदारावर, मजदुरांवर हल्ले करून त्यांना जीवे मारणे, प्रशासकीय अधिकार्‍यांची हत्या करणे, गावातल्या कुणी विकासासाठी प्रयत्न केले; तर त्याच्या कुटुंबाची सामुदायिक हत्या करण्याचे उद्योगही त्यांनी केले. त्यामुळेच इथे दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी कुणी पुढे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे झारखंडच्या शेकडो गावांनी, स्वतःला भारताच्या कायद्याबाहेरचे आदिवासी राज्य म्हणून जाहीर केले. पण, २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आले आणि अर्थातच, सशस्त्र नक्षल्यांच्या आणि त्यांना रसद पुरवणार्‍या दिमागी नक्षल्यांचा यथायोग्य समाचार घेतला गेला. त्या गावांना नक्षल्यांचे कारस्थान समजले. आज ती गावे देशाच्या विकासाच्या प्रवाहात सामील आहेत.
 
याच अनुषंगाने भीमा-कोरेगाव हिंसेच्या वेळची घटना सांगते. त्या दिवशी अचानक हिंसक बंद सुरू झाला. त्यावेळी मुंबईत तब्बल १५-१६ आंदोलक गटांना भेटले. सगळ्या आंदोलक गटांना विचारले की, "तुम्ही इथे हायवे का अडवता.” तर त्यांचे म्हणणे, "तुला माहिती नाही का? तिथे भीमा-कोरेगावला आमच्या आयाबायांना उघडंना*डं करून मारलं.” मी म्हणाले, "असे काही घडले नाही. तुम्हाला कुणी सांगितले?” तर, त्यांचे म्हणणे "पहाटेच्या वेळी कुणीतरी ऐकले.” पण, नक्की कोणी, हे कुणालाही सांगता आले नाही. भीमा-कोरेगावमध्ये,बौद्ध समाजातल्या बायाबहिणींना मारले, असे खोटेनाटे सांगून त्यांना रस्त्यावर उतरवले होते. काही दिवसांनी सत्य बाहेर आले की, या परिसरात नक्षली लपला होता आणि त्यानेच दोन-तीन महिन्यांपासून लोकांच्या भावना भडकून उठतील, यासाठी तयारी केली होती. या आंदोलनाने समाजाचे अपरिमित नुकसान झाले. हे सगळे कुणी केले, तर दिमागी नक्षल्यांनीच! त्यापूर्वीही त्यांच्यातील काही संशयितांनी ‘जय भीम’ बोलण्याआधी ‘तुमचं रगत तपासा’ म्हणत, बौद्धेत्तर लोकांनी ‘जय भीम’ म्हटले तर ते बाबासाहेबांचे गुन्हेगार आहेत, त्यांना चांगली अद्दल घडवा, जीभ छाटा, जीवे मारा,” हे शब्द ‘ढिंच्याक’ तालावरती गायले होते. देशात हिंदू-बौद्ध, हिंदू-जैन आणि हिंदू-शीख यांचे वाद व्हावेत, असेच प्रयत्न जाणीवपूर्वक दिमागी नक्षली करत असतात.
 
यावरून ‘कोरोना’ काळ आठवला. त्यावेळी अमेरिकेमध्ये एका अश्वेतवर्णीयाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि अमेरिकेत दंगली उसळल्या. भारतातल्या दिमागी नक्षल्यांनी लगेच सुरू केले की, देशातल्या बहुजन समाजाच्या त्वचेचा रंग काळासावळा असतो. त्यामुळे अमेरिकेत मृत्यू झालेला माणूस, भारतातल्या बहुजन समाजाचा भाऊ आहे. तिकडे अश्वेतवर्णीयांवर अत्याचार होतात. आपल्या इकडेही सावळ्या रंगाच्या समाजावर अत्याचार होणार आहे. कारण, मोदी आणि ट्रम्प हे दोघे दोस्त आहेत. त्यामुळे आताच उठा, तयार राहा,” असे म्हणत, समाजाला भडकवण्याचा प्रयत्नही या दिमागी नक्षल्यांनी केला. (हसावे की रडावे?) तर, असे हे दिमागी नक्षली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, समाज आणि संस्थांमध्ये हे दिमागी नक्षली लपून बसले आहेत. संधी साधून ते बाहेर येतात. देशात खर्‍या अर्थाने सुराज्य प्रस्थापित करायचे असेल, तर या दिमागी नक्षल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी. कारण - 
हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे माँ|
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर