मुंबई : ( Vande Mataram) देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण (सुधारणा) विधेयक, २०२६ ला मंजुरी दिली. या मंजुरीनंतर आता भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् यालाही जन-गण-मन या राष्ट्रगीताप्रमाणे कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक आता देशाचा कायदा बनले आहे. संसदेने गेल्या महिन्यातच या विधेयकाला मंजुरी दिली होती.
हा नवा कायदा १९७१ च्या राष्ट्रीय गौरव अपमान निवारण कायद्यात सुधारणा करून तयार करण्यात आला आहे. आता एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून ‘वंदे मातरम्’ गाण्यापासून कोणाला रोखले किंवा ते सुरु असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केला, तर तो गंभीर गुन्हा मानला जाईल. अशा प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (Vande Mataram)
१९७१ च्या जुन्या कायद्यात केवळ राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ यालाच कायदेशीर संरक्षण देण्यात आले होते. त्या कायद्यानुसार राष्ट्रगीत गाण्यापासून कोणाला रोखणे किंवा त्यात अडथळा आणणे यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा होती. एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केल्यास त्याला किमान एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होण्याची तरतूद होती. मात्र, राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ संदर्भात अशी कठोर तरतूद नव्हती. आता नव्या सुधारणेद्वारे त्याचाही कायद्यात समावेश करण्यात आला आहे. (Vande Mataram)
कायद्यात ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाचाही उल्लेख
या नव्या कायद्यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक महत्त्वाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी म्हटले होते की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताला ‘जन-गण-मन’प्रमाणेच सन्मान दिला जावा. याच भूमिकेचा विचार करून आता सरकारने त्याला कायदेशीर संरक्षणही दिले आहे. या कायदेशीर बदलासोबत केंद्र सरकारने राष्ट्रीयगीता संदर्भात काही नवीन नियमही लागू केले आहेत. गृह मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश जारी केला होता. त्यानुसार आता राष्ट्रपतींचे आगमन, ध्वजारोहण आणि राज्यपालांचे भाषण अशा प्रमुख सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे सर्व सहा कडवे गायले जातील. हे संपूर्ण गीत सादर करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे १० सेकंद लागतील. (Vande Mataram)
स्वातंत्र्यदिन आणि शाळांसाठी विशेष निर्देश
गृह मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे. याशिवाय देशभरातील सर्व शाळांमध्येही दिवसाच्या सुरुवातीच्या उपक्रमांमध्ये राष्ट्रीयगीताचे सामूहिक गायन केले जाणार आहे. जेव्हा ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन-गण-मन’ हे दोन्ही एकाच कार्यक्रमात सादर केले जातील, तेव्हा नियमानुसार सर्वप्रथम वंदे मातरम् गायले जाईल. त्यावेळी उपस्थित सर्वांनी सावधान स्थितीत सरळ उभे राहणे आवश्यक असेल. (Vande Mataram)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक