मुंबई : (Mahakhanij-2 Digital Watch) डोंगर पोखरून, माती-मुरूम-खडीचा बेकायदा उपसा करून सरकारी महसुलाला चुना लावणाऱ्या गौण खनिज माफियांवर आता डिजिटल नजर ठेवली जाणार आहे. राज्य सरकारने ‘महाखनिज-२’ हे अत्याधुनिक पोर्टल तयार केले असून, खनिज उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटल ट्रॅकिंग केले जाणार आहे. या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बेकायदा गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून खनिज माफियांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गौण खनिजांचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी यापूर्वी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परवानगी शिवाय उत्खनन, परवानगीपेक्षा अधिक उपसा आणि रॉयल्टी चुकविण्याचे प्रकार सुरूच राहिले. काही ठिकाणी यंत्रणेची नजर चुकवून, तर काही प्रकरणांत स्थानिक पातळीवरील संगनमताने सरकारी महसुलाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत.(Mahakhanij-2 Digital Watch)
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ‘महाखनिज-२’ ही नवी डिजिटल यंत्रणा उभारली आहे. नवी मुंबईतील कोकण भवनात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, राज्यातील महसूल यंत्रणा या प्रणालीशी जोडली जाणार आहे. उत्खननाचे ठिकाण, परवाना, प्रत्यक्ष उपसा, वाहतूक आणि रॉयल्टी यावर एकाच प्रणालीतून लक्ष ठेवले जाणार आहे.(Mahakhanij-2 Digital Watch)
अग्रवाल यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी
राज्यभर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या यंत्रणेमुळे बेकायदा उत्खननाचे प्रमाण कमी करण्यासोबतच सरकारचा बुडणारा महसूल वाचविण्यास मदत होणार आहे. विशेषतः परवानगीपेक्षा जास्त उत्खनन आणि विनापरवाना खनिज उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.(Mahakhanij-2 Digital Watch)
दंडासोबत काळ्या यादीत टाकणार
“गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही. दंड आकारताना कोणतीही हायगय केली जाणार नाही. प्रसंगी अशा लोकांना काळ्या यादीत टाकले जाईल.”(Mahakhanij-2 Digital Watch)
- रूबल अग्रवाल, विभागीय आयुक्त, कोकण विभाग तथा नोडल ऑफिसर, महाखनिज-२
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.