‘विवेक फिल्म्स’ आणि ‘मयसभा करमणूक मंडळी’ने निर्मिलेल्या, तसेच परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४ मध्ये ‘सेन्सॉर’ प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांसाठी हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा विनोदी-नाट्यप्रधान चित्रपट असून, त्याचे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘विवेक फिल्म्स’ आणि ‘मयसभा करमणूक मंडळी, एलएलपी’ने केली होती.
चित्रपटात प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, मनमीत पेम, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, सुनील अभ्यंकर, दीप्ती लेले आणि राजेश मापुस्कर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ची कथा १९४२ मधील ‘भारत छोडो’ आंदोलन आणि दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडते. एका छोट्या गावात अचानक ‘अॅडॉल्फ हिटलर’ येतो; त्यानंतर गावात विनोदी, नाट्यमय आणि अनपेक्षित घटनांची मालिका सुरू होते. ‘हिटलर’च्या आगमनामुळे गावकरी सुरुवातीला गोंधळून जातात. मात्र, स्थानिक नाट्यमंडळी आणि गावकरी एकत्र येऊन त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. विनोद, व्यंग आणि ऐतिहासिक संदर्भ यांची सांगड घालत हा चित्रपट युद्ध, हुकूमशाही, स्वातंत्र्य आणि सामान्य माणसाच्या धैर्याची कथा हलक्याफुलक्या शैलीत मांडतो.
७२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट - ‘आर्टिकल ३७०’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार पेरियासामी (अमरन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (संयुक्त) - कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन), ममूटी (ब्रमायुगम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - यामी गौतम (आर्टिकल ३७०)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - ‘श्रीकांत’