व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देणारी कविता : सोनाली लोहार

    18-Jul-2026   
 
Sonali Lohar
 
‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’च्या वतीने दिला जाणारा सन्मानाचा ‘सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार’ ‘सृजनसंवाद प्रकाशन’प्रकाशित, कवयित्री सोनाली लोहार यांच्या बहुचर्चित ‘बाकी काही नाही...’ या कवितासंग्रहास जाहीर झाला. आज, शनिवार, दि. १८ जुलै रोजी पुण्यातील ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोनाली लोहार यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
 
‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’चा ‘सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार’ आपल्या काव्यसंग्रहाला जाहीर झाल्यानंतर आपल्या काय भावना होत्या?
 
पुरस्कार जाहीर होणं, म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता; कारण त्याची अपेक्षा केलेली नसते. माझी या आधी तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’सारख्या मातृसंस्थेकडून हा गौरव होणं, ही आनंदाचीच बाब. मात्र, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवसुद्धा होते. आपण, आपल्यापुरतं लिहिलं आणि आता अचानक इतक्या मोठ्या व्यासपीठावर त्याचा सन्मान होत आहे, ओळख मिळाली आहे, त्यामुळे जास्त जबाबदारीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे, असं वाटतं.

‘बाकी काही नाही...’ या आपल्या बहुचर्चित काव्यसंग्रहाचं बीज नेमकं कशात होतं?
 
खरं तर याला माझ्या आजूबाजूची मंडळी जबाबदार आहेत, असं मी म्हणेन. माझं लिखाण अनेकांनी वाचलं. त्यांनी सुचवलं की, आपण जे लिहिता, ते आता पुस्तकरूपात आलं पाहिजे. माझे हितचिंतक, मैत्रिणी यांची इच्छा होती. त्यामुळे पुरस्कार हा खर्‍या अर्थाने त्यांचा आहे, असं मी म्हणेन. माझ्या या कवितांचं संकलन मी केलं. मी असं ठरवलं नव्हतं की, मला कवितासंग्रह करायचा आहे. म्हणून मी कविता लिहिते. माझ्या काही कविता स्वतःपुरत्या होत्या, तर काही समाजमाध्यमांवर मी प्रकाशित केल्या होत्या. काही ग्रुप्समध्ये होत्या. आमची कलाकारांची, साहित्यिकांची ‘ठाणे आर्ट गिल्ड’ म्हणून एक संस्था आहे. त्यातील ‘काव्यगंध’ नावाचा एक ग्रुप आहे, जिथे वेगवेगळे कवी कविता सादर करतात. मग तिथे मी कविता सादर केल्या. मी स्वतःला ‘कवयित्री’चं लेबल नाही लावून घेतलं; कारण की, हे सगळं खूप काही आतलं होतं, जे कागदावर आलं.
 
आपण काव्यलेखनाकडे नेमके का वळलात?
 
वास्तविक, मी गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये लिहिते. माझी या आधी तीन पुस्तकं प्रकाशित झाली, ज्यामध्ये दोन कथासंग्रह असून, एक ललित लेखांचा संग्रह आहे. (‘चार सख्य चोवीस’, ‘गुंफियेला शेला’ हे दोन प्रायोगिक कथासंग्रह-चार लेखिकांनी मिळून लिहिलेले व ‘सोलो’ हा स्वतंत्र ललित लेखसंग्रह) जास्त करून मी वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन करते. कविता माझ्यासाठी व्यक्त होण्याचं स्वतःपुरतीचं माध्यम होतं. ज्यावेळी आतमध्ये खूप काही साचतं, ढग भरून येतात, त्याच वेळी खरं तर मी कविता लिहिते. जवळपास माझ्या सर्व कविता मी एकहाती लिहिल्या आहेत. रुढार्थाने ज्याला आपण ‘संस्कारित कविता’ म्हणतो, तशा माझ्या कविता फार कमी झाल्या. कविता माझी अनुभूती आहे. तिला मी कुठल्याही आकृतीमध्ये बंदिस्त करून ठेवत नाही; अर्थात त्यामध्ये गेयता असते, जी आपसूकच होते. मी गीतकार होणं कठीण आहे; कारण असं ठरवून, साचेबद्ध पद्धतीने मला नाही लिहिता येत. ती माझी प्रकृतीसुद्धा नाही. मला असं वाटतं की, कविता आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देते. बरेचदा असं असतं की, कविता तुमचंच भावविश्व असतं. त्यामुळे तुम्ही फार प्रामाणिक राहता. त्यामुळे कुठलंही ओझं न घेता, तुम्ही व्यक्त होता. प्रामाणिक राहता.
 
मराठी काव्यसृष्टीमधील कुठल्या कवीचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव राहिला?
 
शांता शेळके हे माझं दैवत आहे, असं मी म्हणेन. कारण, शांताबाई असतील, पाडगावकर असतील, यांच्या कवितांचा खूप मोठा प्रभाव राहिला आहे. पूर्वी पुस्तकांमध्ये भेटणारे कवी वेगळे होते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला आपले कवी भेटतात. म्हणजे, आजचे जे आपले नवकवी आहेत, जसं की गुरू ठाकूर, वैभव जोशी, किशोर कदम हे सगळे जवळचे कवी आहेत. त्यांच्या कवितांचं वाचनसुद्धा भरपूर होतं.
 
या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रकाशकसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या काव्यसंग्रहाच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये प्रकाशकांनी काय भूमिका बजावली?
 
मी तर म्हणेन, कडक भूमिका बजावली. ‘सृजनसंवाद प्रकाशना’चे गीतेश शिंदे तरुण प्रकाशक आहे, जे अगदी काटेकोरपणे काम करतात. गुणवत्तेबाबत ते कधीही तडजोड करत नाहीत. ते कवींकडून काम करूनच घेतात. त्यांची त्याबाबतीत भूमिका पक्की असते. त्यांना कसूर चालत नाही, संगीताच्या भाषेत बोलायचं तर, जो सूर आहे, तो लागलाच पाहिजे. पुस्तकाची जी गुणवत्ता आहे, त्यातील मुद्रण असो, साहित्यातील शब्दांमधील व्याकरण असो, एकूण मांडणी असो वा मुखपृष्ठ असो, त्याबाबतीत ते नेहमी चोख असतात. त्यामुळे एक वेळ कवी म्हणून मी म्हणू शकेन की अमूक एक गोष्ट चालू शकेल. मात्र, त्यांच्यासाठी ‘चालू शकेल’ हा शब्द वापरता येत नाही. जे उत्तम आहे, तेच करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे, मला असं वाटतं की, ‘सृजनसंवाद प्रकाशना’च्या माध्यमातून पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले जातात. हल्लीच्या काळात हे खूप गरजेचे आहे; कारण अन्यथा ही पुस्तकं लेखकांकडेच पडून राहतात. त्याचबरोबर असं वाटतं की, लेखक जोपर्यंत प्रयत्न करत नाही, तोवर पुस्तक पोहोचत नाही. मला मात्र या बाबतीत चांगला अनुभव आला.
 
साहित्याने व्यक्ती म्हणून आपल्याला काय दिलं व साहित्याने समाजाला काय दिलं पाहिजे?
 
साहित्याने मला मैत्र दिलं. साहित्य माझं मैत्र झालं, असं मी म्हणेन. जितकी जास्त आपली साहित्याची मैत्री होत जाते, तितकं तुमचं आतलं जग समृद्ध होत जातं. आजच्या युगामध्ये एकटेपणा प्रचंड वाढला आहे. आज ‘एआय’सारखं माध्यम आपल्या हाताशी आलं आहे. आपण प्रगतीच्या वाटेवर चालत आहोत, असं आपण म्हणतो; मात्र जितकं तंत्रज्ञान विकसित होत जाणार आहे, तितका जास्त माणूस एकटा होत जाणार आहे, ही गोष्ट हळूहळू होत आहे. एका जीवाचा दुसर्‍या जीवाशी असलेला संपर्क कमी होत चालला आहे. हे बदल अत्यंत सूक्ष्म पातळीवर घडत आहे. म्हणजे आपलं जे भावविश्व आहे ना, ते फार संकुचित होत चाललं आहे. इथे साहित्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हातामध्ये पुस्तक असणं, कविता असणं, लिखित साहित्य असणं, हे त्या व्यक्तीला भेटणं आहे, त्यातून आपण संवेदनशील होत जातो, नाही तर ती संवेदनशीलता आजच्या युगामध्ये कमी होत जाणार आहे. मला असं वाटतं की, व्यक्त होणं फार गरजेचे आहे. आपण जर व्यक्त नाही झालो, तर घुसमटून जाऊ. समाजमाध्यमांवर हल्ली आपली मतं मांडणं अवघड होऊन बसलं आहे. सोशल मीडियावर आपण बघितलं, तर माणसं अशी गिधाडासारखी आहेत, जी तुम्हाला तुमची मतं मांडूच देत नाही. तेच साहित्याच्या माध्यमातून आपण जर व्यक्त झालो, तर तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळतं आणि तुमची घुसमट कमी होते. त्याचबरोबर समाजाला सुदृढ ठेवण्याचं काम साहित्य करते. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की, वाचत राहा आणि लिहीत राहा, साहित्याचा हात सोडू नका!




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर