मुंबई : (Sachin Ahir) उबाठा गटाचे विधानपरिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उपसभापतीपदाच्या निवडणूकीचा अर्ज दाखल केल्याने उबाठा गटाच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. विशेषत: सचिन अहिर यांची वरळी विधानसभेतील ताकद पाहता आदित्य ठाकरेंचे सिंहासन डळमळीत झाल्याचे चित्र आहे.(Sachin Ahir)
२०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीपूर्वीच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे २०१९ मध्येही सुनील शिंदेंनाच उमेदावारी मिळणार अशी चर्चा असताना आदित्य ठाकरेंसाठी त्यांचे तिकीट कापण्यात आले. या बदल्यात त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. तसेच सचिन अहिर यांनाही विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली.(Sachin Ahir)
कोण आहेत सचिन अहिर?
सचिन अहिर हे कुख्यात डॉन अरुण गवळी यांचे सख्खे भाचे आहेत. १९९३ मध्ये 'राष्ट्रीय मिल कामगार संघटने'च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. तसेच कामगार युनियनचे नेतृत्व करत त्यांनी कामगारांच्या पगारवाढीसाठी अनेक आंदोलने केली. १९९९ ते २०१९ या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत त्यांनी संयुक्त शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.(Sachin Ahir)